भारत-पाक तणावाकडे जागतिक माध्यमे कशी पाहतात? 

भारत-पाक उभय देशांतील तणावाच्या परिस्थितीकडे गेल्या तीन आठवड्यांपासून जागतिक माध्यमे कोणत्या दृष्टीतून पाहत आहेत, याचा धांडोळा घेतला असता, "वस्तुनिष्ठ' असे उत्तर देणे धाडसाचे ठरेल.
भारत-पाक तणावाकडे जागतिक माध्यमे कशी पाहतात? 

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने मुक्त केल्यानंतर भारत-पाकमध्ये वाढलेला तणाव निवळेल, असे वाटत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादेत केलेल्या वक्तव्यामुळे ही शक्‍यता धूसर झाली आहे. 

पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना "जैश-ए-मोहम्मद'ने 14 फेब्रुवारी 2019 रोजी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 40 जवानांना हौतात्म्य आले. देशभरात उसळलेल्या संतापाची लाटेचा अचूक अंदाज पंतप्रधान मोदींनी घेतला आणि पाकव्याप्त काश्‍मीरमधील बालाकोट येथील "जैश'चा प्रशिक्षण तळ 26 फेब्रुवारी रोजी पहिला एअर स्ट्राईक करीत उद्‌ध्वस्त केला. दुसऱ्या दिवशी भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा कांगावा पाकने केला. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकच्या हाती सापडले. 

भारताने केलेल्या हल्ल्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानातील राजकारण्यांनी आणीबाणीची स्थिती असल्याचे म्हटले. त्यामुळे पाकिस्तान संसदेच्या संयुक्त सत्रातील चर्चेमध्ये पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरमाईची भूमिका घेत विंग कमांडर वर्धमान यांना मुक्त करण्याची घोषणा केली आणि तशी कृतीही केली. जिनिव्हा कनव्हेनशनमध्ये युद्धकैद्यांविषयी (प्रिझन ऑफ वॉर) असलेल्या तरतुदींनुसार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडावे लागले असले, तरी पाकविषयी सकारात्मक संदेश गेला. पाकिस्तानने सातत्याने दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे आणि दहशतवाद्यांकडून भारतात होत असलेल्या कारवायांना पाकचे बळ मिळते, यावर तात्पुरता पडदा टाकण्यात या चालीमुळे पंतप्रधान इम्रान खान यशस्वी झाले आहेत. 

भारत-पाकमधील तणावपूर्ण स्थितीमुळे दक्षिण आशिया खंडात अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे साहजिकच जागतिक स्तरावर भारत-पाक हाच चर्चेचा केंद्रबिंदू आहे. याच दरम्यान व्हिएतनामची राजधानी होनाईमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जॉंग उन यांच्यातील महत्त्वपूर्ण शिखर बैठकीकडेही प्रसारमाध्यमांचे फारसे लक्ष गेले नाही. या बैठकीतून ना अमेरिकेच्या, ना उत्तर कोरियाच्या हाती काही लागले. 

भारत-पाक उभय देशांतील सध्याच्या परिस्थितीकडे गेल्या तीन आठवड्यांपासून जागतिक माध्यमे कोणत्या दृष्टीतून पाहत आहेत, याचा धांडोळा घेतला असता, "वस्तुनिष्ठ' असे उत्तर देणे धाडसाचे ठरेल. 

"गार्डियन'ने भारत-पाकमधील तणावाच्या परिस्थितीवर दोन अग्रलेख लिहिले. ट्रम्प-किन यांच्या भेटीची किनारही या अग्रलेखात आहे. दक्षिण आशियातील परिस्थितीवर भाष्य करताना "गार्डियन'ला अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्‍लिंटन यांच्या "काश्‍मीर हा जगातील सर्वाधिक धोकादायक भौगोलिक भाग आहे,' विधानाची आठवण झाली. 1999 मध्ये कारगिल युद्धावेळी क्‍लिंटन यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीकडेही लक्ष वेधले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लष्करी आवेशाने (मिलिटरिस्टिक ऍप्रोच) भारताला विनाशाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे' असे सुनावतानाच इम्रान खान यांच्याबाबत किंचितशी सौम्य भूमिका घेतल्याचे दिसते आहे. प्रत्येक ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये "आण्विक हल्ल्या'ची शक्‍यता बोलून दाखवली जाते. त्यामुळे या दोन्ही देशांना त्यापासून परावृत्त करणे खूप गरजेचे आहे. अमेरिकेचे पाकबरोबर खालावलेल्या संबंध; तसेच चीनची पाकिस्तानशी असलेली सदासर्वकाळ मैत्री आणि भारताबरोबर असलेले तणाव यांवर बोट ठेवताना चीन, युरोपियन युनियन, रशिया, सौदी अरेबिया आणि इतर देश तणाव निवळण्यासाठी काही करणार आहेत का, असाची प्रश्न उपस्थितीत करण्यात आला आहे. टोकाची राष्ट्रवादी माध्यमे आणि सोशल माध्यमांतील तिखट प्रतिक्रियांमुळे नेत्यांना प्रखर भाषा बोलणे भाग पडत आहे. हे जरी खरे असले, तरी ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली आहे, त्यांच्यावरच परिस्थिती पूर्व पदावर आणण्याची जबाबदारी आहे, हेही निक्षून सांगितले आहे. 

"फायनान्शियल टाइम्स'ने भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. मध्यस्थ (विशेषतः अमेरिका) म्हणून प्रभाव निर्माण करू शकेल, अशी भारत-पाक उभय देशांबाहेरील तिसऱ्या बाह्य शक्तीचा अभाव, ही एक बाब. भारतातील राजकीय परिस्थितीचा पाकिस्तानला उत्तर देण्याचा पंतप्रधान मोदींवर असलेला रेटा, ही दुसरी बाब. अमेरिका प्रभावहीन झाल्याने निर्माण झालेली मध्यस्थाची पोकळी भरून कशी निघणार, या भोवती हा अग्रलेख फिरतो आहे. 

"चायना डेली'ने भारत-पाकमधील तणावावर वरवरची काळजी व्यक्त केली आहे. चीन-पाकमधील मैत्रीचे संबंध लक्षात घेता, "चायना डेली'ने पाकचीच री ओढली आहे. "दहशतवादामुळे पाकिस्तानचेही खूप नुकसान झाले असून, पाकला त्याची किंमत मोजावी लागली आहे,' असा उमाळा चायना डेलीला आला आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी बोलावले होते; तथापि, मोदी यांनी निमंत्रण नाकारल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे. 

"इकॉनॉमिस्ट'ने "मोदींची धोकादायक वेळ' असे म्हणत कव्हर स्टोरी केली आहे. "आगीशी खेळत'च मोदींचे राजकीय करिअर घडले आहे. प्रत्यक्ष युद्ध न करता, पाकिस्तानबाबत कडक भाषा बोलून लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मोदींचा मनोदय असू शकेल. मात्र, मोदी खरेच देशभक्त असतील, तर त्यांनी माघार घ्यायला हवी. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेले चर्चेचे निमंत्रण स्वीकारायला हवे. युद्धसदृश विपरीत स्थितीत मानसिक समतोलपणा आणि जबाबदारीची जाणीव, या गुणांची आवश्‍यकता असते. परंतु, याचा मोदींकडे अभाव असल्याचे इकॉनॉमिस्टने स्पष्ट म्हटले आहे. 

न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली नसली, तरी सखोल वार्तांकन केले आहे. ट्रम्प आणि किन यांच्या शिखर बैठकीच्या बातम्यांतही भारत-पाकमधील घटनांना स्थान मिळाले, हे विशेष. बीबीसी, सीएनएन, एबीसी न्यूज, आरटी, डीडब्ल्यू, फ्रान्स 24, अल जझिरा, एबीसी ऑस्ट्रेलिया, एनएचके वर्ल्ड, चॅनेल न्यूज एशिया या वृत्त वाहिन्यांनी वार्तांकन केले आहे. त्यावर विशेष चर्चा किंवा विश्‍लेषण नाही. अल जझिराने भारतामधील माध्यमांनी कव्हर केलेल्या वार्तांकनावर भाष्य केले आहे, एवढेच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com