धुळे भाजपमध्ये गृहयुद्ध भडकले : गिरीश महाजनांना  गोटेंचे आव्हान !

आमदार अनिल गोटे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कुरघोडीचे राजकारण सुरू असताना महापालिका निवडणुकीमुळे जलसंपदामंत्री गिरीशमहाजन यांची धुळ्यात 'एन्ट्री' झाली.
gote-danve
gote-danve

धुळे :  आमदार अनिल गोटे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कुरघोडीचे राजकारण सुरू असताना महापालिका निवडणुकीमुळे जलसंपदामंत्री गिरीशमहाजन यांची धुळ्यात 'एन्ट्री' झाली.

आमदार आणि मंत्र्यांमधील वादाचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होऊ नये, येथील सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने 'ट्रबल शूटर' मंत्री महाजन यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. हा निर्णय आमदार गोटे यांच्या पचनी पडला नाही आणि त्यांच्या विरोधकांच्या माळेत मंत्री महाजनांचा समावेश झाला. त्यामुळे मंत्री महाजन यांच्यापुढे आपल्याच पक्षाच्या आमदारांनी दिलेले आव्हान कसोटीचे  ठरत आहे. 

महापालिका निवडणुकीचे नेतृत्व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिल्याने, तसेच इतर पक्षातील विरोधकांसह काही नामचीन गुंड, गुन्हेगारांना थेट भाजपमध्ये प्रवेश देण्याचा धडाका मंत्री महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी लावल्याचा आरोप करणारे आमदार अनिल गोटे या मुद्यांवरून कमालीचे भडकले आहेत. त्यातून त्यांनी निमंत्रण नसताना पक्षाच्या महापालिका विजय संकल्प मेळाव्यात गोंधळ घातल्याने, पक्ष प्रवेशाचा वाद मुद्यावरून गुद्यावर गेल्याने भाजपची हवा खराब होऊ लागल्याचे मानले जाते. 

दीड वर्षांपासून भाजपचे आमदार अनिल गोटे हे वारंवार प्रदेशाध्यक्ष आणि तिघा मंत्र्यांवर बेछूट आरोपातून पक्षाची इभ्रत वेशीवर टांगत असल्याची भावना तीनही मंत्री समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. या स्थितीकडे केलेले दुर्लक्ष, सोक्षमोक्ष लावण्यासाठी केलेली टाळाटाळ  वरिष्ठ नेत्यांना आता महागात पडताना दिसत आहे.


विजय संकल्प मेळाव्यात वाद 
शहरात जे. बी. रोडवर शनिवारी रात्री साडेआठनंतर झालेल्या धुळे महापालिका विजय संकल्प मेळाव्यात आमदार अनिल गोटे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, निवडणूक प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यात उघडपणे झालेल्या वादाचे परिणाम पक्ष प्रतिमेला तडा देणारे, पक्षाची ऐन निवडणुकीत हवा खराब करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे राजकीय पटलावर मानले जाते. 

मंत्री डॉ. भामरे यांनी मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाचा, तर त्यांच्यासह मंत्री रावल यांनी सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेचा 'इश्‍यू' 'हायजॅक' केल्याने आमदार गोटे यांची अधिक जिव्हारी आल्याचे सर्वश्रुत आहे. त्यातून त्यांनी या मंत्र्यांवर टीकेचा भडिमार सुरू केला. 

भाजपची दोन प्रचार कार्यालये 
महापालिका निवडणुकीत सर्वेक्षण व पक्षीय ध्येयधोरणाप्रमाणे प्रक्रिया राबविली जाईल, असे मंत्री महाजन यांनी जाहीर केले असताना आमदार गोटे यांनी कल्याण भवनात प्रचार कार्यालय सुरू करत इच्छुकांकडून अर्ज मागवीत मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली. दुसरीकडे भाजपच्या गोटे विरोधी गटाने गल्ली क्रमांक पाचमध्ये सुवर्णकार भवनात प्रचार कार्यालय सुरू केले.

आपला पक्ष या निवडणुकीसह नेतृत्वापासून आपल्याला दूर ठेवत असल्याचे लक्षात आल्यावर आमदार गोटे यांनी शहर विकासाचा मुद्दा पुढे करत पंचवीस वर्षांपासून असलेले क्रमांक एकचे राजकीय शत्रू राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशी प्रसंगी युती करण्यास तयार असल्याची भूमिका जाहीर करून खळबळ उडवून दिली. मात्र, मुख्यमंत्री राजी असले तर ही युती करेल, असे सांगत त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना काय संकेत द्यायचे ते दिले. 

गुंडांचा पक्ष प्रवेश कळीचा मुद्दा 
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही नगरसेवक आणि शहरातील काही नामचीन गुंड, गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याने भाजपला विजय कसा मिळेल, महापालिकेत सत्ता कशी मिळेल, असा प्रश्‍न आमदार गोटे उपस्थित करीत आहेत. त्यांनी पंचवीस वर्षांपासून गुंडगिरीच्या मुद्यावरून सतत राष्ट्रवादी कॉंग्रेसला "टार्गेट' केल्याचे सर्वश्रुत आहे. तोच आमदारकीच्या निवडणुकीत त्यांना हमखास विजय मिळवून देणारा मुद्दा ठरला आहे. नेमक्‍या महापालिका निवडणुकीत या मुद्याची धार कमी होत असल्याची जाणीव त्यांना होत आहे.

भाजपमधील आपल्याच विरोधकांनी इतर पक्षातील विरोधकांना (काही नामचीन गुंड, गुन्हेगारांसह) पक्ष प्रवेश देऊन ही धार कमी केल्याचे आमदार गोटे यांना वाटते. त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे.  परिणामांची कुठलीही चिंता न करता महापालिका निवडणुकीत भाजपच्याच कमळ चिन्हावर राजकीयदृष्ट्या कोऱ्या पाट्या असलेल्यांनाच उमेदवारी देऊ, असे सांगत पक्षीय विरोधकांची कोंडी आमदार गोटे यांनी  कोंडी केली. 

कुरघोडीच्या राजकारणाचा कळस 
आचारसंहिता लागू असल्याने, सभा उशीरा सुरू झाल्याने वेळ कमी असल्याचे कारण पुढे करत आमदार गोटे यांना अटकाव करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांसह इतरांकडून झाला. या वादात परस्परांमध्ये रेटारेटी, ढकलाढकली सुरू झाल्यावर पोलिसांनी आमदार गोटे यांना सभेबाहेर नेले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बॅनरसह मेळाव्यास्थळी व्यासपीठावर असलेल्या बॅनरवर आमदार गोटे यांचे छायाचित्र नसणे, त्यांना निमंत्रण नसणे या कारणावरून आमदार गोटे यांनी व्यासपीठाचा ताबा घेत प्रदेशाध्यक्षांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात कुरघोडीच्या राजकारणाचा कळस गाठला गेल्याने भाजपची हवा खराब झाल्याचा सूर विविध पातळीवर उमटू लागला आहे. गोटे यांना बोलू दिले पाहिजे होते किंवा नाही हा निवडणुकीत खमंग चर्चेचा नवा मुद्दा ठरला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com