कॉम्रेड, लेनिनग्राड वाट पाहतेय..! 

राजधानी दिल्लीतील मुघलकालीन लाल किल्ला आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) गणना महत्त्वाच्या राजकीय वास्तूंमध्ये होते. एका वास्तूचा लाल रंग दरवर्षी राष्ट्रीय सणांच्या दिवशी दिसतो तर दुसरीचा अभ्यासण्यासाठी तिच्या कॅम्पसमध्ये जावं लागतं. सामाजिक आणि राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान असलेल्या याच "जेएनयू'च्या कॅम्पसमध्ये 9 फेब्रुवारी 2016 रोजी "आझादी'चे नारे दिले गेले तेव्हा त्याचे प्रतिध्वनी संपूर्ण भारतवर्षात उमटणे साहजिक होतं.
कॉम्रेड, लेनिनग्राड वाट पाहतेय..! 

झालंही तसंच या घटनेनंतर चार दिवसांत देशद्रोहाच्या आरोपाखाली विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमारला तुरुंगात टाकण्यात आलं. सत्ताधाऱ्यांच्या "राष्ट्रवादी' रक्‍ताला उकळी फुटली. धंदेवाईक माध्यमांना ब्रेकिंग न्यूज मिळाली. अभ्यासकांच्या गटात तुंबळ वैचारिक संघर्ष पेटला. "जेएनयू'तील त्या कथित देशद्रोही इव्हेंटला आता दोन वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला तरीसुद्धा सरकारला कन्हैय्यावरील आरोप सिद्ध करता आलेले नाहीत. 

तसंही सत्ताधाऱ्यांना स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शत्रू हवा होता त्यांनी तो आधी "जेएनयू'त शोधण्याचा प्रयत्न केला आता "अर्बन नक्‍सल' हा त्याच सूडपर्वाचा दुसरा अध्याय आहे. कालपरवापर्यंत केवळ "जेएनयू'पर्यंत मर्यादित असलेलं कन्हैय्याकुमार नावाचं "लाल वादळ' आता देशभर घोंघावू लागलं आहे. कन्हैय्या केवळ दिल्लीचा राहिलेला नाही. तो परभणी, नगर आणि औरंगाबादचाही झाला आहे. 

मुंबईतही तो जे काही बोलतो ते ऐकलं आणि शेअर केलं जातंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्य राजकीय प्रवाहातील विरोधी पक्षांनाही त्यानं संसदीय राजकारणात यावं असं वाटू लागलंय. त्यामुळे बिहारचे "लेनिनग्राड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगुसरायमधून कन्हैय्याला लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास आम्ही माघार घेऊ असं लालूंनी जाहीर केलं, तर कन्हैय्या ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही त्याच्या उमेदवारीला मूकसंमती दिली आहे. बेगुसराय मतदारसंघातील तेघडा आणि बछवाडा हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ कधीकाळी डाव्यांचे बालेकिल्ले होते. बेगुसरायच्या लाल मिरचीच्या अर्थकारणाला समतेचं वळण सर्वप्रथम डाव्या विचारांनीच दिलं. तेव्हा तेथे प्रस्थापित भूमिहारांच्या वर्चस्वाला त्यांच्याच जातभाईंनी आव्हान देऊन ते मोडीत काढले होतं. 

जातीय ध्रुवीकरणामुळे 2010 मध्ये तेघडाचा आणि 2015 मध्ये बछवाडाचा राजकीय गड कोसळला, पण तेथील डावा विचार संपला नाही, तो परत कन्हैय्याच्या रूपाने पुन्हा "जेएनयू'त प्रकट झाला. आता तोच कन्हैय्या पुन्हा बिहारच्या लेनिनग्राडमधून लढू पाहतोय. कन्हैय्याने खुशाल निवडणूक लढवून खासदार व्हावं. यासाठी प्रसंगी त्यानं कर्मठ डाव्या चौकटींचीही तमा बाळगू नये. कारण याच तत्त्वांपायी कधीकाळी कॉ. ज्योति बसू आणि सोमनाथ चटर्जींसारख्या धुरंधरांचा बळी गेला होता हे वास्तव आहे. डाव्यांनीही काही ऐतिहासिक चुकांची पुनरावृत्ती टाळली तर बेगसुरायचा खासदार पुन्हा एकदा एक कॉम्रेड असेल यात शंका नाही, कारण पिचलेली जनता आपल्यासाठी कोण प्रामाणिकपणे लढतेय हे पाहते आहे. भविष्यातही तीच आपला नेता निवडेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com