कोल्हापूर मनपा : बड्या नेत्यांचे  सेफ राजकारण आणि  दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा बळी

लोकसभा निवडणुकीतील या जय-पराजयाचे परिणाम आता राजकारणात उमटत आहेत. महापालिकेतील महापौर निवड हा त्यातला एक भाग होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कारभाऱ्यांचा एक गट धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय होताच. त्यांच्या जोडीला ताराराणी आघाडीचेही नगरसेवक होते. महापालिकेत आता हे दोन्ही घटक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्यांनी खासदार महाडिक यांचा प्रचार केला नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीला आता ताराराणी आघाडीची साथ मिळत आहे. त्याचा पहिला अंक आज पाहायला मिळाला. पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची मात्र आज कोंडी झाली.
कोल्हापूर मनपा : बड्या नेत्यांचे  सेफ राजकारण आणि  दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा बळी

महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस, ताराराणी आघाडी आणि भाजप अशी नवी युती आज पाहायला मिळाली. या युतीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार माधवी गवंडी या आज बिनविरोध निवडून आल्या. गेल्या चार वर्षांत महापालिकेच्या राजकारणात प्रथमच अशी युती पाहायला मिळाली. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला राजेश लाटकर यांनी मदत केल्याचा सूड उगविण्यासाठी ताराराणी आघाडीने महापौरपदाची निवडणूकच न लढविता माधवी गवंडी यांच्या विजयाचा मार्गच मोकळा केला, तर लाटकरांसारख्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला डावलून पक्षाने नेमके काय साधले? असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवसेनेचा प्रचार करूनही लाटकरांना उमेदवारी दिली तर लाटकरांना हसन मुश्रीफ यांचीच फूस होती, असे संदेश बाहेर जाऊ नयेत, यासाठीच ही सेफ गेम मुश्रीफांकडूनच खेळली गेली आहे का? असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या राजकारणात नेहमीच वेगळे काहीतरी घडते. एक वर्षापूर्वी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक झाली. ऐनवेळी भाजपचे उमेदवार अशिष ढवळे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी उघडपणे ढवळे यांना मतदान करून खळबळ उडवून दिली होती. आमच्याकडून हे ढवळे यांना गिफ्ट होते, असे या दोन नगरसेवकांचे मत होते; पण एवढ्या मोठ्या निवडणुकीत या दोघांनीही सहजपणे हात वर केले नव्हते, हे जाणकारांना कळल्यावाचून राहत नाही. पुढे त्याचे परिणाम या दोघांना भोगावे लागले. दोघांचेही नगरसेवकपद रद्द झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर वेगळे चित्र होते. राज्यात भाजप-सेना यांची युती, तर कोल्हापुरात मात्र कॉंग्रेस, शिवसेना, भाजप अशी एक आघाडी पाहायला मिळाली. राष्ट्रवादीतीलही अनेकांनी शिवसेनेचाच प्रचार केला. तत्कालीन खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी ते एकाकी पडले. केवळ महाडिक गट म्हणूनच त्यांनी या निवडणुकीत टक्कर देण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत महाडिक पराभूत झाले.

लोकसभा निवडणुकीतील या जय-पराजयाचे परिणाम आता राजकारणात उमटत आहेत. महापालिकेतील महापौर निवड हा त्यातला एक भाग होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कारभाऱ्यांचा एक गट धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय होताच. त्यांच्या जोडीला ताराराणी आघाडीचेही नगरसेवक होते. महापालिकेत आता हे दोन्ही घटक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्यांनी खासदार महाडिक यांचा प्रचार केला नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीला आता ताराराणी आघाडीची साथ मिळत आहे. त्याचा पहिला अंक आज पाहायला मिळाला. पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची मात्र आज कोंडी झाली. अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना उमेदवारी दिली तर पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर झाला असता. त्यामुळे गवंडी यांना उमेदवारी देऊन मुश्रीफ यांनी सेफ गेम खेळली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

लोकसभेपूर्वीच्या राजकारणाचा विसर
लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांनीही पक्षासोबत न राहता ताराराणी आघाडीसोबत, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने ताकद लावली होती. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी ही खदखद बोलून दाखविली होती; पण त्याचा विसर सर्वांना पडला आहे. मोठ्या नेत्यांच्या चुका लपल्या जातात; पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र त्याची फळे भोगावी लागतात. मोठ्या नेत्यांना सेफ राहण्यासाठी काही वेळा दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा बळी द्यावा लागतो. आजची निवड त्याचाच एक भाग होता, असेच म्हणावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com