रणजितसिंह, की संजयमामा; सोलापूरवर वर्चस्व कोणाचे ? 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील आणि शिंदे गटांत होणाऱ्या संभाव्य लढायांमुळे बऱ्याच राजकीय घडामोडीदृष्टिक्षेपात येणार आहेत. या लढायांच्या उदरातच भविष्यातील नवीन राजकीय समीकरणे लपलेली आहेत.
रणजितसिंह, की संजयमामा; सोलापूरवर वर्चस्व कोणाचे ? 

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेल्या मोहिते-पाटील घराण्यातील रणजितसिंहांनी अखेर आज बुधवारी 20 मार्च 2019 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आपले संबंध तोडले आणि भाजपशी घरोबा केला. शेवटी एकदाचे रणजितसिंहांनी बंडाचे धाडस केलेच. माजी खासदार, माजी आमदार, सोलापूर जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष एवढी पदे गेल्या वीस वर्षांत रणजितसिंहांनी सांभाळली. त्यामुळे असा धाडसी, बंडखोर निर्णय घेण्याची कधी वेळच त्यांच्यावर आली नव्हती. परंतु, आज स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्नच उभा राहिल्याने रणजितसिंहांना लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर निर्णय घ्यावा लागला, हे स्पष्ट आहे. 

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या घराण्याचा प्रवास शेकाप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप असा झाला आहे. रणजितसिंहांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे सोलापूरच्या राजकीय वाटचालीचा भविष्यातील पट बदलला आहे. पुढील दहा ते पंधरा वर्षांसाठी जिल्ह्याचे राजकीय कथानक पूर्णतः बदलून गेले आहे. सोलापूर जिल्ह्यावर एकेकाळी कॉंग्रेसची पकड होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कॉंग्रेसच्या हातातून हा बालेकिल्ला निसटला. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड बनला. मोहिते-पाटील भाजपला जाऊन मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यात मोठी पडझड झाली आहे. आता या जिल्ह्यावर कोणत्याच एका पक्षाचा वरचष्मा राहिलेला नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना आणि शेकाप यांच्यात हा जिल्हा विभागला गेला आहे. 

गटांच्या राजकारणाचा विचार करता, कॉंग्रेस असो किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस असो; मोहिते-पाटील घराण्याचा दबदबा जिल्ह्याच्या राजकारणावर राहिला. त्यामुळे सत्तेचा केंद्रबिंदू माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हेच राहिले. जिल्हा सहकारी बॅंक, सहकारी साखर कारखाने, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती यांच्यावर मोहिते-पाटील गटाचेच वर्चस्व होते. दुसरा कोणताही प्रभावी गट मोहिते-पाटील यांच्याविरोधात तयार झाला नाही. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापनेवेळी मोहिते-पाटील यांची सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील ही पकड इतकी मजबूत होती, की नजीकच्या भविष्यात त्यांना अस्तित्वासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच सोडावी लागेल, असे कधी कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. मतदारसंघ फेररचनेनंतर मोहिते-पाटील यांचा हक्काचा माळशिरस मतदारसंघ राखीव झाला आणि तेथूनच मोहिते-पाटील यांच्या वर्चस्वाच्या तडे जाऊ लागले. दुसऱ्या मतदारसंघात त्यांची डाळ काही शिजली नाही. विरोधक तयार झाले; प्रबळही झाले. त्यापैकीच एक प्रमुख प्रबळ विरोधक म्हणजे भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले संजयमामा शिंदे. 

सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील विरुद्ध शिंदे गट असेच राजकारण सुरू आहे. रणजितसिंह भाजपमध्ये गेल्यामुळे लोकसभा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे गणितच बदलून गेले आहे. जिल्ह्याचे राजकारण एका नव्या वळणावर येऊन थांबले आहे. 

लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणी का असेना, जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व मोहिते-पाटील गटाचे, की शिंदे गटाचे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. विधानसभा निवडणुकीत त्यावर आणखी ठोस शिक्कामोर्तब होईल. रणजितसिंह आणि संजयमामा या दोन बाहुबलींमध्ये ही वर्चस्वाची, अटीतटीची लढाई होणार आहे. भाजपच्या मदतीने मोहिते-पाटील गट आपले पुनर्वैभव मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. त्याचवेळी शिंदे गट शक्तिशाली बनण्यासाठी जोर लावणार आहे. 

लोकसभा आणि विधानसभेच्या या निवडणुकांतच सोलापूर जिल्ह्याच्या पुढील दहा ते पंधरा वर्षांच्या सत्तेची बीजे रोवली जाणार आहेत. जिल्ह्याच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे, हे अधोरेखित करणाऱ्या या निर्यायकी निवडणुका आहेत. मोहिते-पाटील आणि शिंदे गटांत होणाऱ्या संभाव्य लढाईमुळे जिल्ह्यात येत्या सहा महिन्यांत बरीच राजकीय उलथापालथ दृष्टिक्षेपात येणार आहे. या लढायांच्या उदरातच भविष्यातील नवीन राजकीय समीकरणे लपलेली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com