शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्षच किंगमेकर ठरणार ! 

लोकसभेच्या आगामी निवडणुकात प्रादेशिक व स्थानीय पक्षांचे महत्त्व वाढणार आहे. याचे कारण केंद्रात सत्तेत यायचे असेल, तर भाजप व कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना त्यांचा पाठिंबा घेतल्याशिवाय व त्यांच्याशी निवडणूक पूर्व समझोते केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्षच किंगमेकर ठरणार ! 

प्रादेशिक पक्षांचे महत्त्व अधोरेखित करणारे ताजे उदाहरण म्हणजे भाजप व शिवसेना यांच्यात जागांविषयी झालेला समझोता. तत्पूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणातून मोदी-शहांवर टीकेचे आसूड ओढत होते. परंतु एकत्र आल्याशिवाय देशात युतीचे सरकार कदापि येणे शक्‍य नाही, हे कळून चुकल्याने ठाकरे- शहा गळाभेट झाली. अशाच ऐनवेळीच्या गळाभेटींची पुनरावृती उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडूत झालेली दिसते. 

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष व मायावती यांचा बहुजन समाज पक्ष एकत्र आला. पश्‍चिम बंगालमध्ये हाडवैर असलेले तृणमूल कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व कॉंग्रेस एकत्र आले. तर, तामिळनाडूमध्ये भाजपने आण्णाद्रमुकबरोबर समझोता केला. तामिळनाडूतील फॉर्म्युलात आणखी भर पडली आहे, ती स्थानीय पक्षांची. भाजप व आण्णाद्रमुकने 25-15 असे जागांचे वाटप करण्याचे ठरविले आहे. पण त्यातही स्वतः पदरातील जागा अन्य स्थानीय पक्षांना देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

उदा. भाजप 8 जागा लढवेल, तर 4 जागा अंबुमणी रामदास यांच्या पट्टली मक्कल काची व 3 जागा अभिनेते विजयकांत यांच्या देसीय मुरपोक्कू द्राविड कझगम यांना देण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे आण्णाद्रमुकला 25 पैकी काही जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागणार आहेत. त्यात जी.के.वासन यांचा तामिळ मन्निला कॉंग्रेस, के.रंगास्वामी यांचा अखिल भारतीय एन आर कॉंग्रेस व के.कृष्णस्वामी यांचा पुथीय थामिझाकमया या पक्षांचा समावेश आहे. 

दुसरीकडे, कॉंग्रेसने द्रमुकशी समझोता केला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व द्रमुकचे अध्यक्ष स्टालीन यांच्या भेटीदरम्यान त्याची घोषणा करण्यात आली. तामिळनाडूतील राजकारणाकडे पाहता, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकीर्दीपासून कॉंग्रेसने आण्णाद्रमुकचे संस्थापक अभिनेते एम.जी रामचंद्रन यांच्याबरोबर समझोते केले होते. पी.व्ही.नरसिंह राव यांनी जयललिता यांच्याबरोबर समझोता केला होता. परंतु, त्यावेळी त्या इतक्‍या बदनाम झाल्या होत्या, की समझोता केल्याचे नुकसान कॉंग्रेसला सोसावे लागले होते. 

आता भाजपने अण्णाद्रमुकशी समझोता केला आहे. याचे कारण, साडेचार वर्षात भाजप दक्षिणेतील कोणत्याही राज्यात पाय रोवू शकली नाही. यात लोकसभेच्या एकूण 545 जांगापैकी 129 जागा आहेत. केंद्रात पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर या पाच राज्यातून किमान 20 ते 25 जागा भाजपला मिळवाव्या लागतील. तेलंगणातील तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव निवडणुकीनंतर भाजपच्या युतीत कदाचित सामील होतील, अथवा बाहेरून पाठिंबा देतील. आणखी एका अंदाजानुसार, आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसबरोबर भाजप समझोता करण्याची शक्‍यता अधिक. 

अलीकडे "सी व्होटर" या संस्थेने लोकसभेच्या संभाव्य निकालांचा अंदाज प्रसिद्ध केला. त्यानुसार, केंद्रात त्रिशंकू लोकसभा येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. त्यानुसार, भाजपला 203, कॉंग्रेस महागठबंधनला 167 व अन्य राजकीय पक्षांना 143 जागा मिळतील. दरम्यान, झालेल्या पोटनिवडणुकात भाजपचा पराभव झाल्याने त्यांची सदस्य संख्या 270 वर आली. सर्वसाधारण अंदाजानुसार, भाजपच्या सत्तर ते ऐंशी जागा कमी होतील. 

म्हणजे भाजप 190 ते 200 च्या आसपास असेल, असे गृहित धरले, तरी केंद्रात सरकार बनविण्यासाठी 272 म्हणजे 72 जांगाची गरज भाजपला भासेल. आज शिवसेना, अकाली दल, आण्णाद्रमुक व लोकजनशक्ती हे पक्ष प्रामुख्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आहेत. त्यांचे एकूण बळही पुरेसे पडणार नाही. 
लोकसभेत मुलायम सिंग यांनी ""मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे,"" अशी इच्छा प्रगट केली. 

तथापि, राजकीय दृष्ट्या ते जवळ जवळ निष्प्रभ झाले आहेत. हरियानात ओमप्रकाश चौताला यांच्या इंडियन नॅशनल लोकदल पक्षात फूट पडून त्यांचे नातू दुष्यंत चौताला यांनी अलीकडे जननायक जनता पक्ष स्थापन केला. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव तुरूंगात असले, तरी तेथे भाजप व जनता दल विरूद्ध राष्ट्रीय लोकदल असा तिरंगी सामना सत्तारूढ दोन्ही पक्षांना भारी पडेल. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष काय किमया करणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com