तात्या थोरात नावाचा वाघ विसावलाय!

तात्यांनी राजकारण केलं, निवडणुका लढल्या तेही खुल्या दिलानं. पूर्वीच्या जनसंघाच्या आणि आताच्या भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात तात्यांनी अनेकदा झुंज दिली. त्यातल्या काही अपयशी जरूर ठरल्या, पण त्यात त्यांचा लढाऊ बाणा लक्षात राहिला.
तात्या थोरात नावाचा वाघ विसावलाय!

"तात्या...,पुण्यातील गणपतीच्या मिरवणुकीत तुमच्याकडं पाहून गाण्याच्या एका ओळीची आठवण येते...'' 
तात्यांना म्हणत असे आणि तात्या म्हणजे वसंत थोरात विचारत, ""कोणत्या ?'' त्यावर "" "नमवी पहा भूमी हा चालताना...' याची''. या माझ्या उत्तराला तात्या आत्मविश्वासपूर्वक हसत दाद देत. 

माझ्या त्या उपमेचं कारणही तसंच असायचं. विसर्जन मिरवणूक चालू होऊन काही तास लोटलेले असत, संध्याकाळ दाटून आल्यावर मंडईच्या शारदा-गणेशाची आरती होई अन दिव्यांनी उजळलेला रथ लक्ष्मी रस्त्याकडं कूच करी. रस्त्यावरच्या माणसांच्या महापुरातून बिनीचे कार्यकर्ते पुढे वाट काढत असतानाच गर्दीला छेद जाई अन त्या वाटेवरून एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आपल्या डोईवरच्या डौलदार फेट्याची दिमाखदार हालचाल करीत पुढं सरके. ""ए, तात्या आले, तात्या आले...'' अशी कुजबुज होई अन आदरयुक्त भीतीनं कार्यकर्तेही बाजूला होत.
 
आम्ही पत्रकारही त्या गर्दीचाच एक भाग झालेलो असायचो अन् आमच्याकडं त्यांची नजर गेल्यावर ""काय माळी, पान खायचं का ?'' असं विचारून त्यांच्या तयार विड्यांनी भरलेल्या पिशवीतून नेमकं साधं पान काढून हाती ठेवतं. त्या रूबाबदार-भारदस्त व्यक्तिमत्त्वाकडं, गर्रकन वळणाऱ्या मानेबरोबर डोलणाऱ्या फेट्याच्या तुऱ्याकडं पाहात असताना माझ्या तोंडी नकळत नाट्यगीताची ओळ येई..."नमवी पहा भूमी हा चालताना...' 

तात्या म्हणजे माणसातले वाघ होते. या वाघाच्या डरकाळीपुढं कार्यकर्ते कापत तर पोलिस अधिकारीही आदब राखून बोलत. त्यांच्याकडं आठवणींचा खजिना होता अन् मंडईच्या कट्ट्यावर, काही वर्षांपूर्वी बांधलेल्या समाजमंदिराच्या दारात तो ऐकताना रात्र सरून जात असे. या गप्पांना ऐन उत्सवात तर खूपच बहर येई. त्या चर्चा मग राजकारणाच्या असत, पुण्यातील जुन्या सामाजिक घटनांच्या असत. कधी ते महापौर असतानाच्या आठवणी ते सांगत. 

तात्यांनी राजकारण केलं, निवडणुका लढल्या तेही खुल्या दिलानं. पूर्वीच्या जनसंघाच्या आणि आताच्या भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात तात्यांनी अनेकदा झुंज दिली. त्यातल्या काही अपयशी जरूर ठरल्या, पण त्यात त्यांचा लढाऊ बाणा लक्षात राहिला. तात्या 1968 मध्ये महापालिकेची निवडणूक लढले ते बदामी हौद वॉर्डातून. त्यावेळी जनसंघाचे अण्णा जोशी यांचा 350 मतांनी विजय झाला. निकाल जाहीर झाला आणि सायंकाळी तात्या मोटारसायकलीवरून अण्णांच्या घरी हार घेऊन गेले. अण्णा तेव्हा लोखंडे तालमीजवळ राहात होते. तात्यांनी त्यांना घरी हार घातला.

तसेच 1972 मध्ये शुक्रवार पेठ मतदारसंघातून जनसंघाच्या रामभाऊ म्हाळगी यांच्या विरूद्ध झालेल्या लढतीत वसंतरावांचा अकराशे मतांनी पराभव झाला. मंडईत जमलेल्या कार्यकर्त्यांना भेटून ते तडक तांबडी जोगेश्वरीजवळच्या जनसंघाच्या कार्यालयात गेले अन तेथे व्यासपीठावर जाऊन शेकडो जणांच्या साक्षीने रामभाऊंना हार घातला. त्यावेळी त्यांच्या खिलाडूवृत्तीला शेकडो टाळ्यांची दाद मिळाली.

महापालिकेच्या 1974 मध्ये लढवलेल्या निवडणुकीत मात्र त्यांच्या लढाऊ वृत्तीला मतदारांनी दाद देत त्यांना डॉ. कोटणीस वॉर्डातून विजयी केले. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 1975 मध्ये महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. महापौरचषक कबड्डी स्पर्धांचे प्रथमच आयोजन करून तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठीही उपक्रम राबवून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. महापौर झाल्यानंतर सत्कारात जाणारा वेळ लक्षात घेता त्यांनी या सत्कारसत्राला नकार दिला. आणिबाणीनंतर कॉंग्रेसविरोधी लाट असतानाही 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षाच्या मोहन धारिया यांच्या विरोधात अयशस्वी लढत दिली. विधानसभेची 1991 मधील त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून जिंकलेली पोटनिवडणूक हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सुवर्णक्षण होता. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला, पण भाजपच्या गिरीश बापट यांना हरवून तात्यांनी कॉंग्रेसला हा मतदारसंघ मिळवून दिला, त्याची नोंद इतिहासानं घेतली.

कॉंग्रेसमध्ये त्यांनी केलेल्या धडाडीच्या कामामुळं पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडं सोपवली गेली. मात्र सडेतोड स्वभावामुळं त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. ""तिथं व्यक्तिगत राजकारण सुरू झाल्यानं आपण ते पद सोडलं,'' असं ते सांगत. 

गणेशोत्सवाशी तात्यांचं नातं ते कार्यकर्ते झाल्यापासूनचं. मंडईतील गाळ्यावर बसून भाजीविक्री करणारा तरूण 1963 मध्ये उत्सवात उतरला आणि गेल्या पन्नासहून अधिक वर्षे उत्सवाला वळण देण्याचा प्रयत्न करत राहिला. तात्या महापौर झाले त्या वर्षी मिरवणुकीत त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी होती. उत्सवात उत्साही कार्यकर्ता म्हणून भाग घेण्याबरोबरच महापौर म्हणून रात्री बाराच्या आत मिरवणूक संपवण्याची. साधारणतः महापौर केवळ टिळक चौकात मिरवणुकीतील मंडळांना मानाचा नारळ देत. तात्यांनी मात्र रस्त्यावर येऊन टिळक चौक ते बेलबाग चौकापर्यंत अनेकदा फेऱ्या मारल्या आणि मिरवणुकीत चैतन्य आणलं तसंच तिला गतीही दिली.

मिरवणूक लवकर संपावी, यासाठी पुढे काही वर्षांनी तात्यांनी मंडईचा गणपती लक्ष्मी रस्त्याऐवजी कुमठेकर रस्त्याने नेण्याचा प्रयोग केला. तो एकच वर्ष टिकला तरीही त्यातून मिरवणूक वेळेवर संपावी, याची धडपड त्यातून दिसली.

 
"झुणका भाकर' ही योजना राज्यभर गाजली, पण तिची सुरवात मंडईतून झाली आणि त्या योजनेला तात्यांचा मोठा हातभार होता. हिंदू-मुस्लिम दंगलीत जमावापुढं निधड्या छातीनं जाऊन दंगल शमवण्याची तडफ त्यांच्यात होती. 

तात्यांचं बोलणं रोखठोक होतं, वागणं वाघासारखं होतं. त्यामुळं ठोस मुद्दे नसतील तर त्यांच्यापुढं जाऊन बोलायचं धाडस भल्याभल्यांना होत नसे. त्यांचा हा स्वभाव मला खूप आवडे. त्यांच्या मुद्‌द्‌यांबाबतची दुसरी बाजू शांतपणानं समजावून सांगितली तर ते ऐकत. त्यामुळं त्यांच्याबरोबरच्या गप्पा तासनतास रंगत. धार्मिक विषयांवर बोलताना ""आम्ही रामदासी आहोत,'' असं ते अभिमानानं सांगत. काहींना ग्राम्य वाटले तरी सरळ मनापर्यंत जाणारे शब्द वापरायला प्रसंगी ते कचरत नसत. 

तात्यांच्या अंत्यदर्शनाला गेलो. आपल्याच मस्तीत, मनसोक्त जगणारा, बसण्याचीही खास शैली असलेला हा वाघ पहुडला होता. "वाघ विसावलाय...' माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com