फोडाफोडी झाली आता युती होणार का...?

.
thakrey_Fadanvis
thakrey_Fadanvis

महाराष्ट्रात सध्या सर्वच राजकारणी एकच प्रश्‍न खासगीत एकमेकांना  विचारत आहेत, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होईल का. कारण या एकाच प्रश्‍नावर राज्याच्या राजकारणाचे तसेच अनेक दिग्गजांसह नवोदित नेत्यांचेही राजकीय भवितव्य ठरणार आहे.

जसजशी विधानसभेची निवडणुक जवळ येऊ लागली आहे, तसतसा युती होणार की नाही हा प्रश्‍न अनेकांना सतावत आहे. याला कारणही तसेच आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षात अन्य पक्षातील अनेक नेते डेरेदाखल झाले आहेत. विरोधी नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याची जणू चळवळच भाजप व शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून मोठ्याप्रमाणात राबवली आहे.

त्यातही ती पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक राबवली गेली. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर आणि सोलापूर या जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेमधील अनेक दिग्गज नेते भाजप - शिवसेनेच्या गळाला लागले. आता यातील जवळपास प्रत्येकाने पक्षांतर करण्यापूर्वी त्या त्या पक्षाकडून स्वतःच्या राजकीय भवितव्याविषयी काही नां काही शब्द संबंधित पक्षप्रमुखांकडून,पक्षश्रेष्ठींकडून घेतलेलाच आहे.

तरीही जर भाजप - शिवसेनेतील युतीची बोलणी फिस्कटली तर आपलं काय होईल, ही अनामिक भितीही पक्षातरीत अनेक नेत्यांना सतावत आहे. ती भिती एका दृष्टीने योग्यही आहे. कारण यात पक्षांतरीत नेत्याचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.

आणखी एका अंगाने विचार करता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, पक्षांतराची ही चळवळ भाजप - शिवसेनेने सर्वात जास्त प्रमाणात पश्‍चिम महाराष्ट्रातच राबवली. त्यातही त्यांचे टार्गेट हे प्राधान्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस हाच पक्ष असल्याचे दिसून येते. हे असे का, याचा अधिक खोलात जाऊन अभ्यास केला तर एक गोष्ट प्राधान्याने पुढे जाणवली, ती म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. 

तसाच तो महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा आत्माही आहे. या सहकारातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी आर्थिक रसद तर मिळतेच, शिवाय सहाकाराच्या नाड्या हाती असल्यामुळे ग्रामीण भागातील मोठी 'व्होट बॅंक' राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभी राहाते. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पश्‍चिम महाराष्ट्रात मोठी राजकीय ताकद तर मिळते. त्या ताकदीवर हा पक्ष सत्ताधाऱ्यांना हवे तसे वाकवू शकतो.

नेमकी ही बाब हेरून भाजप - शिवसेनेने पश्‍चिम महाराष्ट्रात त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट करत या पक्षाचे सर्वाधिक नेते फोडून स्वपक्षाकडे वळवून घेतले. यासाठी भाजप - शिवसेना युतीने नेमके काय केले हे अद्याप तरी समोर आले नाही. तरी अभ्यासांती असा निष्कर्ष पुढे येतो की, सत्तेच्या जोरावर तर हे फोडाफोडीचे काम झालेच, तसेच  राष्ट्रवादी कॉग्रेसमधील सत्तापिपासू नेत्यांनी सत्तेच्या आशेने निष्ठेला तिलांजली दिली  .

तीच  परिस्थीती कॉंग्रेस पक्षाबाबत आहे. तेथे दिल्लीश्‍वरांच्या दरबारी राजकारणाचा फटाका आमदार, मंत्री या घटकांना अनेकदा बसला. त्यातच कॉंग्रेसच्या भवितव्याविषयी फारसे चांगले चित्र सध्यातरी दिसून येत नसल्याचा परिणामही याच कारणीभूत आहे.

एकूणच काय भाजप - शिवसेना या दोन्ही पक्षांकडून सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण फॉर्मात आहे. यामुळे या दोन्ही पक्षांचे शिर्षस्थ नेते जरी खूषीत असले तरी पक्षांतरीत नेत्यांना मात्र भाजप - शिवसेना युती होणार का हीच चिंता भेडसावत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com