मनसेच्या इंजिनाला कोणाचा पाॅवर सप्लाय?

राज्यात भाजपच्या विरोधात विरोधकांची आघाडी उघडण्याचा जो प्रयत्न राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चालवला आहे त्यास मनसेचीही साथ मिळण्याची शक्‍यता आहे. अर्थात परप्रांतियांच्या मुद्यावरुन कॉंग्रेस त्यांना सोबत घेण्याबाबत कितपत राजी होईल यावर बरेच काही अवलंबून आहे.
मनसेच्या इंजिनाला कोणाचा पाॅवर सप्लाय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोदी मुक्त महाराष्ट्राची हाक दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा देणाऱ्या राज यांनी आता मोदी मुक्त महाराष्ट्राची घोषणा देत यू टर्न घेतला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीही आगामी निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येतील असे संकेत दिले होते. राज ठाकरे यांनी मेळाव्याच्या आदल्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी केलेले गुफ्तगु, तसेच मेळाव्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेससह शिवसेनेवर काहीच टीका केली नाही. त्यामुळे राज्यात भाजपच्या विरोधात विरोधकांची आघाडी उघडण्याचा जो प्रयत्न राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चालवला आहे त्यास मनसेचीही साथ मिळण्याची शक्‍यता आहे. अर्थात परप्रांतियांच्या मुद्यावरुन कॉंग्रेस त्यांना सोबत घेण्याबाबत कितपत राजी होईल यावर बरेच काही अवलंबून आहे. परंतु, सध्या भाजप हटाव या मुद्यावर विरोधकांत एकमत आहे. त्यामुळे शहरी भागातील मनसेची ताकद भाजप विरोधात वापरण्यासाठी कॉंग्रेस नेतृत्व सकारात्मक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. 

एरवीही राज ठाकरे यांची सभा म्हटली की शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, अशोक चव्हाण आदी नेत्यांवर टीका हे समीकरण होते. तसेच शिवसेनेवरही टीका करण्याची संधी ते सोडत नसतात. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज यांनी व्यंगचित्र काढून शिवसेनेवर शरसंधान केले होते. मेळाव्यातही ते शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडतील अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. परंतु, राज यांनी साऱ्या शक्‍यतांना छेद देत केवळ भारतीय जनता पक्षाला धारेवर धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरच राज यांचा रोख राहिला. एरवीही पवार काका पुतण्या, अशोक पवार, पृथ्वीराज चव्हाण यांची सभेतून टिंगलटवाळी करणाऱ्या राज यांनी यावेळी त्यांच्याबाबत काहीच टिपण्णीदेखील केली नाही. केवळ भाजपवरच त्यांचा रोख होता. भाजपला झोडपून काढत त्यांनी सन 2019 ला मोदी मुक्त महाराष्ट्र करण्याचे आवाहन केले.

 
राज्यात भाजप सरकारविरोधात वातावरण तापत आहे. केंद्रातील मोदी सरकारनेही जनतेची तसे म्हटले तर निराशाच केली आहे. ज्या अपेक्षेने जनतेने त्यांना निवडून दिले होते त्या त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यातच उत्तर प्रदेशात झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने एकत्र येत चौफेर उधळलेल्या भाजपचा वारू रोखला. यामुळे भाजप विरोधातील पक्ष एकत्र आल्यास त्यांना मात देता येते हे सिद्ध झाले.

महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या आधीपासूनच तशी रणनीती आखण्यात येत आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसने नागपूर अधिवेशनावर शेतकऱ्यांचा मोर्चा एकत्रितरीत्या काढून ते एकत्र येत असल्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही त्याबाबत बोलणी सुरू केली आहे. तसेच दोन्ही कॉंग्रेसवर जोरदार टीका करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांनाही आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात भाजप विरोधकांची मोट बांधण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यास मनसेचीही साथ मिळू शकते. मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे शहरात मनसेची ताकद आहे. तिचा लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने निश्‍चितच उपयोग होऊ शकतो. वरील शहरांमधील सर्वाधिक जागा कॉंग्रेसचे उमेदवार लढवित असतात. त्यामुळे लोकसभेतील जागा वाढविण्यासाठी कॉंग्रेस मनसेला सोबत घेऊ शकते. मनसे स्वबळावर खासदार निवडून आणू शकत नाही. मात्र, त्यांची मते दोन्ही कॉंग्रेससाठी उपयुक्त ठरू शकतात. 
त्यादृष्टीने दोन्ही कॉंग्रेसचे नेते कशी पावले टाकतात यावर पुढील राजकीय चित्र अवलंबून आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com