नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. या निराशानजक परिस्थितीत संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने (DRDO) भारतीयांना आनंदाची बातमी दिली आहे. डीआरडीओने कोरोनावर 2-डीजी (2-DG) हे नवीन औषध आणले असून, त्याच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. (DCGI has granted permission for emergency use of 2 DG)
डीआरडीओ आणि हैदराबादस्थित डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीने हे 2-डिऑक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) हे औषध विकसित केले आहे. हे औषध पावडर स्वरुपात सॅशेमध्ये येते आणि पाण्यात मिसळून ते घ्यावे लागते. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्याच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय औषध महानियंत्रकांनी घेतला आहे. हे औषध घेतलेले बहुतांश रुग्ण हे निगेटिव्ह आले आहेत. या औषधामुळे रुग्णालयात दाखल रुग्ण लवकर बरे होतात आणि त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची फारशी आवश्यकता भासत नाही.
या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबरमध्ये झाल्या. यात हे औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले. तसेच, औषध घेतलेले रुग्ण लवकर बरे होत असल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या 110 रुग्णांवर तर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 6 रुग्णालयात झाल्या.
देशात 24 तासांत 4 लाखांहून अधिक नवीन रुग्ण
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 270 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 78 रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाख 23 हजार 446 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.01 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.90 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 79 लाख 30 हजार 960 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे.
देशातील राज्यनिहाय 24 तासांतील मृत्यू (एकूण मृत्यू 2,38,270)
महाराष्ट्र : 898
कर्नाटक : 592
उत्तर प्रदेश : 372
दिल्ली : 341
छत्तीसगड : 208
तमिळनाडू : 197
पंजाब : 165
राजस्थान : 164
हरियाना : 162
उत्तराखंड : 137
झारखंड : 136
गुजरात : 119
पश्चिम बंगाल : 112
देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे
20 लाख : 7 ऑगस्ट (2020)
30 लाख : 23 ऑगस्ट
40 लाख : 5 सप्टेंबर
50 लाख : 16 सप्टेंबर
60 लाख : 28 सप्टेंबर
70 लाख : 11 ऑक्टोबर
80 लाख : 29 ऑक्टोबर
90 लाख : 20 नोव्हेंबर
1 कोटी : 19 डिसेंबर
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)
2 कोटी : 4 मे
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.