तमिळनाडूतही भाजपला सापडले 'एकनाथ शिंदे'? तब्बल २५ खासदार मिळणार असल्याचा दावा

Tamilnadu | BJP | Eknath Shinde : भाजपचे दक्षिण भारताचे बहुप्रतिक्षित स्वप्न होणार होणार?
Narendra Modi News, Amit Shah News in Marathi, Rajya Sabha Latest News
Narendra Modi News, Amit Shah News in Marathi, Rajya Sabha Latest NewsSarkarnama

चेन्नई : राज्यात शिवसेनेत मोठे बंड यशस्वी झाल्यानंतर या बंडाचे वारे आता तमिळनाडूमध्येही वाहणार असल्याचे चित्र आहे. तामिळनाडू भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकट आणि द्रमुकमधील "घराणेशाहीच्या राजकारणातील" साम्यता दाखवत दावा केला की इथेही एक "एकनाथ शिंदे" (Eknath Shinde) उदयास येऊ शकतात. अन्नामलाईंच्या दाव्याचा राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या पक्षात बंड होणार असा अर्थ लावला जात आहे.

वल्लुवर कोट्टममध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अन्नामलाई म्हणाले, "अडीच वर्षांपूर्वी, महाराष्ट्रात तीन पक्षांनी द्रमुक (DMK) आणि काँग्रेससारखी (Congress) आघाडी करत हातमिळवणी केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत १०५ आमदार असलेल्या भाजपला सत्तेतून बाजूला ठेवले. ५६ आमदारांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. मात्र त्यानंतर या अनैसर्गिक आघाडीमध्ये जास्त दिवस न राहता शिवसेनेचे एकनाथ शिंदे काही आमदारांसह बाहेर पडले आणि ते सुरतला गेले. हा राजधर्म होता. जेव्हा ती गोष्ट व्हायची असते तेव्हा होते. महाराष्ट्रात अडीच वर्षांनी घडली, ती आता तामिळनाडूमध्ये कधी होते ते पाहू."

अन्नामलाई यांनी पुढे बोलताना शिवसेना आणि द्रमुकच्या "घराणेशाहीच्या राजकारणाची" तुलना करत तमिळनाडूमध्येही एक बंडखोर नेता लवकरच उदयास येईल, असा दावा केला. शिंदेंचे समर्थन करत अण्णामलाई म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन 'राजधर्म' पाळला, तमिळनाडूतही असेच होईल. लोकसभा निवडणुकीत आम्हाला (तामिळनाडू भाजपला) २५ खासदार मिळतील, जे राज्यात विधानसभेतील १५० आमदारांच्या बरोबरीचे असतील.

"दोन्ही घराण्याचा इतिहास सारखाच आहे"

अन्नामलाई म्हणाले, " शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा मुलगा बिंदुमाधव ठाकरे यांना चित्रपटांमध्ये काम करायचे होते, पण त्यांचे चित्रपट चांगले चालले नाहीत. त्याचप्रमाणे करुणानिधी यांचा मोठा मुलगा एम. के. मुथू यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती, पण त्यांची योजना फलद्रूप झाली नाही. बाळ ठाकरे यांचा दुसरा मुलगा जयदेव ठाकरे हे पक्षापासून दूर आहेत. तर करुणानिधींचाही दुसरा मुलगा एम. के. आझगिरी हे देखील पक्षाबाहेर आहेत.

बाळ ठाकरेंचा तिसरा मुलगा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. करुणानिधींचा तिसरा मुलगा एमके स्टॅलिन यांनाही मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. शिवाय उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी याला राजकीय महत्वकांक्षा असल्याचे सांगितले. दोघेही जण आपल्या पक्षाच्या युवा विभागाचे नेते आहेत. त्यामुळेच आता तमिळनाडूमध्ये नेमके कोण शिंदे होणार याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com