दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडेंनी सर्वात आधी आपल्याच पक्षाला खडे बोल सुनावले. अलीकडे विरोधी पक्षाचा प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार असल्याचे सांगतो. पण सरकार आता पडणार, तेव्हा पडणार याचे मुहूर्त ठरवण्याच्या कामातून आता विरोधी पक्षाने बाहेर पडले पाहिजे. आपण विरोधी पक्षात आहोत हे स्वीकारून जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
तसेच, सत्ताधाऱ्यांनी ही सरकार भक्कम आहे हे सांगण्यात वेळ न घालवता राज्याच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला.
आज सायंकाळी शिवसेनेचाही दसरा मेळावा होणार आहे. राज्यातील तीन पक्षांचे आघाडी सरकार एकमेकांना खूष करताना जनतेला मात्र दुःखी करत असल्याची टीका पंकजा यांनी केली.
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा दोन समाजांमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहेत. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण पाहिजे आहे, तर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण हवे. या दोन्ही समाजाच्या आरक्षणासाठी आपण लढा देणार आहोत.
गेल्या दसरा मेळाव्याला आपण मुलींसाठी संकल्प केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला अभिप्रेत असे काम करण्याचे माझ्या मनात होते. यासाठी आजपासून आपल्या भागातील जाती-धर्माची प्रार्थनास्थळे, रुग्णालये आणि विद्यालये स्वच्छ ठेवण्याचा संकल्प आपण हाती घेऊयात.
स्वच्छता अभियानासोबतच त्यांनी जिल्ह्यात व्यसनमुक्ती अभियान राबवणार असल्याचे सांगितले.आपल्या जवळचा २९ वर्षाचा कार्यकर्ता कॅन्सरने हिरावून नेला, तेव्हा यापुढे गावागावात जाऊन व्यसनमुक्ती अभियान राबवून तंबाखूच्या पुड्यांची होळी करण्याचा शब्द देखील त्यांनी उपस्थितीत जनसमुदायाकडून घेतला.
“राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या घटना राजरोस होत आहेत. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही. आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर सरकारला जाब विचारायचा की नाही?,” असा सवालही पंकजा मुंडेंनी केला.
सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही. प्रत्येक नुकसानग्रस्तांच्या हातात मदत द्यावी आणि त्यांची दिवाळी गोड करावी. फक्त केंद्राकडून मदतनिधी येत आहेत. पण राज्य सरकारकडून कधी येणार? पण असे प्रश्न विचारले तर यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हालाच विचारणार ना, तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात.”
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.