शतप्रतिशतसाठी भाजपकडून शिवसेनेचाच वापर

Shivsena
Shivsena

उस्मानाबाद : शिवसेनेचे राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत पसरलेले कार्यकर्त्यांचे जाळे, कडवट, निष्ठावंतांची फौज याचा चाणक्‍यनितीने पुरेपूर वापर करत भाजपने शतप्रतिशतकडे कासवगतीने का होईना वाटचाल सुरु केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील यापुर्वीच्या कुठल्याही निवडणुकीत युतीशिवाय मैदानात न उतरणाऱ्या भाजपने नगरपालिका निवडणुकीत मात्र स्वबळाचा नारा दिला आणि 20 नगरसेवक निवडून आणले. भाजपची ही खेळी शिवसेनेने वेळीच ओळखली नाही तर भाजप जिल्ह्यात शिवसेनेला वरचढ ठरल्याशिवाय राहणार नाही. 


उस्मानाबादेतील एकाही पालिकेचे नगराध्यक्षपद भाजपला मिळालेले नसले तरी त्यांच्या नगरसेवकांची संख्या 5 वरुन 20 वर म्हणजेच चारपट झाली आहे. पुर्वी शिवसेनेशी युती करुन संपुर्ण जिल्ह्यात भाजपने हळूहळू पक्षाची बांधणी केली. राज्यातील विकासकामाचे हवाले देत नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि घवघवीत नाही पण लक्ष वेधण्या इतपत यश पदरात पाडून घेतले आहे. 
जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे प्रमुख चार पक्ष असले तरी दोन्ही कॉंग्रेसला प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेने आक्रमकपणे शह दिलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत नाळ जोडण्यात शिवसेना यशस्वी झाली. तुलनेत भाजपची ताकद जिल्ह्यात मर्यादित होती. परंतु अशाही ठिकाणी शिवसेनेशी युती केल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता.

यापूर्वी स्वबळावर लढूनही भाजपला अपेक्षित असे यश जिल्ह्यात कोठेच मिळाले नाही. गेल्या वेळी झालेल्या आठ पालिकांच्या निवडणुकीत केवळ पाच जागांवर भाजपला समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र 20 जागांवर या पक्षाने यश मिळविले आहे. केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा काही प्रमाणात का होईना या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेत झाला असेच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील भाजपचा वाढता प्रभाव शिवसेनेसाठी धोक्‍याची घंटा ठरु शकते. संख्याबळ वाढल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तर सेनेच्या गोटांत चिंता आहे. येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. सध्या जिल्हा परिषदेत 54 पैकी फक्त दोनच सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून भाजप यश मिळविण्यात यशस्वी होणार का? व भाजपच्या या खेळीला शिवसेना कसे उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com