"गाव तिथे राष्ट्रवादी'च्या अभियानात कलगीतुरा!

"गाव तिथे राष्ट्रवादी'च्या अभियानात कलगीतुरा!

शिरपूर ः जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा रुजण्यास सुरवात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत खदखद नुकत्याच "गाव तिथे राष्ट्रवादी' अभियानाच्या उद्‌घाटन समारंभात उघड झाली. पक्षाचे दोन गट समोरासमोर आल्याने वरिष्ठांना दोन स्वतंत्र बैठका घेणे भाग पडले. पक्षाशी नव्यानेच जुळलेल्या युवक कार्यकर्त्यांमध्ये या सुंदोपसुंदीनंतर अस्वस्थता पसरली आहे.

गाव तिथे शाखा उघडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तालुकानिहाय बैठका घेण्यात येत आहेत. शहरातील पक्ष कार्यालयात तीन फेब्रुवारीला कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या बॅनरवरून शाब्दिक ठिणगी पडली. माजी तालुकाध्यक्ष दिनेश मोरे समर्थकांसह निघून गेले. त्यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे व अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन स्वतंत्र बैठकीची मागणी केली. परिणामी कार्यालय आणि विश्रामगृहात दोन स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. नमनालाच अशी माशी शिंकल्याने विस्तार अभियानाचे काय, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

"बायपास'चा वाद
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ही खदखद तात्कालिक नाही. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी एकमेकांना "बायपास' करून राज्य कार्यकारिणीपर्यंत पोहोचत असल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते काहींचा नुकताच पक्षप्रवेश झाला. यापुढे पक्षात प्रवेशासाठी प्रत्येक जण शरद पवारांच्या उपस्थितीची अट टाकेल, मग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचे महत्त्व काय असा प्रश्‍न अनेकांना भेडसावतो आहे. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी सुरू असलेला हा "बायपास'चा प्रयत्न पक्षात दुही माजविण्यास कारणीभूत ठरला आहे.

उमेदवारीवर डोळा
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचारासाठी आलेले मंत्री जयंत पाटील यांनी भाषणात तब्बल चारदा डॉ. जितेंद्र ठाकूर यांना उद्देशून तेच पुढचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यानंतर उमेदवारीवर डोळा ठेवून असलेल्या इतर इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे मानले जाते. त्यातूनच पक्षपातळीवर स्वतःचे महत्त्व वाढविणे, इतरांचे पंख कापणे असे उद्योग सुरू झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.

युवक कार्यकर्ते अस्वस्थ
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या झंझावाताने प्रभावित होऊन युवक लक्षणीय प्रमाणात राष्ट्रवादीकडे वळले. मात्र, पक्षातील अनुभवी म्हणविणाऱ्यांकडून सुरू असलेले शह- काटशहाचे धोरण त्यांना गोंधळात पाडणारे ठरले आहे. जुने- नवे, आतले- बाहेरचे असा भेदाभेद घड्याळाचे काटे पुढे सरकू देणार नाही. जुन्या जाणत्यांमधील मतभेद सांधण्यासाठी वरिष्ठ प्रयत्न करतील की मतभेदांची दरी आणखी रुंदावते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com