प्रदीप कंद, मंगलदास बांदल यांनी ठोकले शड्डू

विधानसभा निवडणूकदीड - दोन वर्षांवर आली आहे. शिरूरमधील नेत्यांच्या निवडणूकविषयक वक्तव्यांनी रणधुमाळीचीवातावरण निर्मितीहोऊ लागली अाहे. कंद, बांदल अशाबड्यानेत्यांच्या बड्या बाता प्रत्यक्षात आल्यास राजकीय पटलावर मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.
प्रदीप कंद, मंगलदास बांदल यांनी ठोकले शड्डू

शिरूर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व आपल्या दणकेबाज डावपेचांनी गंमत; तर चौफेर वक्तव्यांनी कायमच धांदल उडविणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांनी शिरूर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केले आहे.

कंद यांनी दौंड तालुक्‍यातील दौऱ्यात, कुठल्याही परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या काळात जिल्ह्यात व विशेषतः शिरूर - हवेली या घरच्या मतदारसंघात विकासकामांसाठी मोठा निधी दिला असून, या विकासकामांतून स्थानिक लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. शिवाय चांगल्या कामाच्या माध्यमातून जिवाभावाच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाल्याने त्यांच्याकडूनही आता विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रेमळ दबाव वाढू लागला असल्याचे सांगतानाच; या कार्यकर्त्यांना आश्‍वस्त करण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला शाश्‍वत विकासाची वाट दाखविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

"मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कट्टर कार्यकर्ता असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा माझ्यावर गाढ विश्‍वास आहे. मी मागेल ते आजवर मला मिळत आले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना व नेत्यांना भेटून लवकरच कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घालणार आहे. त्यातून आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नक्कीच मिळेल', असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या लोकाभिमुख प्रतिमेमुळे मला विधानसभेची उमेदवारी मिळण्यात कुठलीही अडचण नसून, मतदार संघातील सगळ्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेऊन लवकरच "स्ट्रॅटेजी' जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बांदल यांनी वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्‍याचा बराचसा भाग पिंजून काढला. आपल्या झंझावाती धावत्या दौऱ्यात ठिकठिकाणी झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात तुफानी टोलेबाजी करीत त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाला, प्रत्युत्तरादाखल "शिरूर तालुक्‍यातील त्याच - त्याच नेत्यांपासून स्वातंत्र्य द्या', असे म्हणत त्यांनी स्वतःची उमेदवारी जनमानसात व प्रामुख्याने युवावर्गात रूजविण्याचा प्रयत्न केला.

शिरूर मधील कार्यक्रमात, विधानसभेच्या प्रतिकृतीचा केक त्यांच्या हस्ते कापण्यात आला. केकवर सुरी चालविण्यापूर्वी आता इथे वार करायचे नाही; तर याठिकाणची वारी करायची, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. "कापून नव्हे; तर या ठिकाणी जपून जावे लागणार आहे', या त्यांच्या वाक्‍याने त्यांच्या समर्थकांत हास्याची लकेर उमटली. 

ठिकठिकाणी झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात, बांदल समर्थकांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांनी आमदारकी भूषवावी, अशाही शुभेच्छा दिल्या. "आमदार साहेबांचा बर्थ डे' या नावाने त्यांच्या समर्थकांनी व्हॉटस्‌ ऍप ग्रुप स्थापन केला असून, या ग्रुपवरही त्यांना आमदारकीसाठी शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र काल दिवसभर पाहायला मिळाले. 

मंगलदास बांदल यांनी आपल्या भाषणात स्थानिक राजकारणावर टिप्पणी करताना स्थानिक नेत्यांचा नामोल्लेख टाळून तोंडसुख घेतले. "अ' आणि "ब' च्या ताब्यात हा तालुका कुठवर ठेवणार, अ, ब शिवाय "क' कुणी आहे की नाही, असा सवाल करताना अ आणि ब म्हणजे कोण तुम्हाला कळलेच असेल, असे ते म्हणताच उपस्थितांतून "अ' म्हणजे अशोक पवार आणि "ब' म्हणजे बाबूराव पाचर्णे का, असे विचारण्यात आले. त्यावर बांदल यांनी हसून "तुम्ही फार हुशार आहात, तुम्हाला सगळे समजते', असा दुजोरा दिला. तथापि, एका चाणाक्ष पत्रकाराने "क' म्हणजे कोण, कंद का ? असे विचारताच बांदल गडबडले व बाराखडीत "म' म्हणजेच मंगलदास देखील आहे, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.

वाचा अधिक बातम्या-

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com