`आता लढायचं` म्हणणाऱ्या महाडिक बंधूंचा नवा सारीपाट!

`सर्वांनीच महाडिक गटाला प्रसंगानुसार गोड बोलत हाताळून अथवा एखादे आश्‍वासन देऊन त्या गटाचा वापर केला`
`आता लढायचं` म्हणणाऱ्या महाडिक बंधूंचा नवा सारीपाट!

इस्लामपूर : शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आजवर "सपोर्टर' च्या भूमिकेत असलेले महाडिक कुटुंब आता शिराळा विधानसभा मतदारसंघात एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहे.

सम्राट व राहुल महाडिक या दोन्ही बंधूंनी "आता लढायचं' ही घेतलेली भूमिका त्यांचे व महाडिक गटाचे मनोधैर्य वाढवणारी ठरली. त्यामुळे या पुढे महाडिक सपोर्टर नसून शिराळा मतदारसंघात एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले. त्यांची दखल सर्वच राजकीय पक्षांना घेऊन आपला सारिपाट मांडावा लागेल.

येलूरचे रहिवासी असलेल्या महाडिक कुटुंबाचे कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांत राजकीय लागेबांधे आहेत. या तीन जिल्ह्यांत महाडिकांचा स्वतंत्र असा एक गट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महादेवराव महाडिक, मुन्ना ऊर्फ धनंजय महाडिक हे राजकारण पाहतात. सांगली जिल्ह्यात नानासाहेब महाडिक हे आजवर राजकारण व समाजकारणात सक्रिय होते. तर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मुन्ना महाडिक सोलापूर जिल्ह्यात राजकारणाला पूरक भूमिका घेत आले आहेत.

तीन जिल्ह्यांत सक्रिय असलेल्या या कुटुंबाने सांगली जिल्ह्यात मात्र आजवर पंचायत समिती व जिल्हा परिषद इथपर्यंत दमदार कामगिरी केली. विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी त्यांनी शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आजवर अनेकांना ताकद देऊन वेळोवेळी निर्णायक मदत करत आमदारकीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले होते. मात्र नानासाहेब महाडिक यांचा गट या दोन्ही मतदारसंघात सपोर्टर म्हणूनच सर्वांनी वापरला. मग ते मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख असोत, की जयंत पाटील अथवा जयंत पाटील यांचे पारंपरिक विरोधक असो. 

सर्वांनीच महाडिक गटाला प्रसंगानुसार गोड बोलत हाताळून अथवा एखादे आश्‍वासन देऊन त्या गटाचा वापर केला. नानासाहेब महाडिक यांनी अनेकवेळा स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना आवर घालत इतरांना मदत केली. प्रत्येकवेळा "पुढच्या वेळी तुम्ही' असा शब्द समोरच्यांनी दिला. मात्र महाडिकांची वेळ आली, की सर्वांनीच हात आखडते घेतले हा झाला इतिहास. या इतिहासाला कंटाळूनच गेल्या पाच वर्षांपासून शिराळा मतदारसंघात विधानसभेची जोरदार तयारी केलेल्या सम्राट महाडिक यांनी यावेळी मात्र "आता थांबायचं नाय, आता लढायचं' हा घेतलेला पवित्रा कायम ठेवत मतदारसंघ लढवला. या लढतीत सम्राट महाडिक यांना 47 हजार मते मिळाल्याने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ज्यांना सपोर्टरच्या भूमिकेत दरवेळी पाहणारे शिराळा मतदारसंघातील सर्व विरोधी उमेदवार सुद्धा यामुळे अचंबित झाले. 47 हजार मतदान हे महाडिक गटाला भविष्यातील शिराळा मतदारसंघातील प्रबळ दावेदार म्हणून शिक्कामोर्तब करून गेले.

वाळवा तालुक्‍यातील 48 गावांसह शिराळा तालुक्‍यातील बहुतांश गावात सम्राट महाडिक यांनी निर्णायक मते घेतली. त्यामुळे यापुढे सम्राट नावाचे वादळ शिराळा मतदारसंघात घोंगावत राहून लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येऊ शकते. तर शिराळा मतदारसंघात एक अधिक एक बरोबर विजय हे समीकरण आहे. त्यानुसार सम्राट यांनी यापुढे देशमुख अथवा नाईक गटाला बरोबर घेऊन बेरीज केली तर नवल वाटायला नको.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com