पीएमपीने लावली पुण्यातील दोन आमदारांत भांडणे

पीएमपीने लावली पुण्यातील  दोन आमदारांत भांडणे

पुणे : पीएमपी प्रशासनाने पुण्यातील दोन आमदारांत भांडणे लावली आहेत. भाजपचे आमदार विजय काळे यांच्या आमदार निधीतून दिली गेलेली बस पीएमपीने स्वीकारली. मात्र कांग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी देऊ केलेली बस पीएमपीने नाकारली. त्यामुळे गाडगीळ संतप्त झाले आहेत.

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेली जास्तीत जास्त बस मार्गावर धावतील असा प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या पीएमपी प्रशासन पुणेकरांपुढे उभे राहात आहेत. शहरातील सार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बसची संख्या वाढविणे हा अंतिम मार्ग असल्याचेही प्रशासनतर्फे सांगण्यात येते. त्यासाठी राजकीय मदत घेतल्याचीही अनेक उदाहरणे घडली आहेत.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी बस देऊन याची सुरवात केली. त्या पाठोपाठ आमदार विजय काळे यांनीही त्यांच्या आमदार निधीतून मिनी बस पीएमपीच्या ताफ्यात दिली. एकीकडे पीएमपी प्रशासन बस खरेदीची प्रक्रिया करत असतानाच त्यांच्या ताफ्यात एक-एक बस या मार्गाने दाखल होत आहेत. शहरातील वाहतुकीसाठी अरुंद रस्ते लक्षात घेता मिनी बसला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे दाखले पुढे येत आहे.


त्यामुळे या पार्श्‍वभूमिवर राज्याच्या विधान परिषदेतील आमदार अनंत गाडगीळ यांनीही आपला आमदार निधी बसकडे वळविण्याचा विचार केला. आमदार काळे यांच्या पाठोपाठ त्याच पेठेत राहणाऱ्या गाडगीळ आमदार निधीतून मिनी बस देत असल्याबद्दल पीएमपी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. पण, गेल्या आठवड्यात पीएमपी प्रशासनाने त्यांच्या पत्राला दिलेले उत्तर चक्रावून सोडणारे आहे.

त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, आम्हाला मिनी बस नको. तर, मीडी बस हवी आहे. त्यामुळे सत्ताधाराऱ्यांची मिनी बस पीएमपीला चालते कॉंग्रेसची चालत नाही का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. 

या बाबत गाडगीळ म्हणाले, ""आमदार निधीतून 15 लाख रुपयांची विकास कामे करता येतात. रस्ते, पेव्हर ब्लॉक अशी कामे आमदार निधीतून केली जाणार नाहीत, हे निश्‍चित केले आहे. शहराच्या विकासाला, त्याच्या सुशोभीकरणाला हातभार लागेल. सामान्य रुग्णांना दिलासा मिळेल अशा कामासाठी निधी खर्च करण्यास प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयातील लहान मुलांच्या उपचारांसाठी व्हेंटिलेटर देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी बसची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी आमदार निधीतून मिनी बस देण्याचे निश्‍चित केले. पंधरा लाख रुपये किमतीला ही बस मिळते. त्यामुळे आमदार निधीतून ही बस देणे शक्‍य आहे. पण, आता पीएमपी प्रशासनाने कळविले आहे की, आम्हाला मिनी नको, तर मीडी बस हवी आहे. ही बस आहे 33 लाख रुपयांना. ती काही आमदार निधीत बसत नाही. त्यामुळे भाजपचे आमदारांची मिनी बस घेतली. पण, माझ्या आमदार निधीतील मिनी बस प्रशासन नको म्हणत आहे.'' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com