मनसे रायगड जिल्हा सचिव लता कळंबे यांना बेदम मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल

सुधागड तालुक्यातील पिलोसरी येथील दगडखाणीवर डंपर चालक म्हणून नोकरी करीत असलेल्या प्रमोद माने यांना त्याच्या मालकाने नोकरीवरुन काढून टाकले. या प्रकरणी मध्यस्थी करण्यास गेलेल्या लता कळंबे यांच्यासह डंपर चालकास सबंधीत खाणमालक व त्याच्या चार साथीदारासह इतरांनी बेदम मारहाणकरुन अंगावरील मौल्यवान वस्तू हिसकावून नेल्याची तक्रार केली आहे.
Mns Raigad Zilla Secretary Lata Kalambe Beaten
Mns Raigad Zilla Secretary Lata Kalambe Beaten

पाली : सुधागड तालुक्यातील पिलोसरी येथील दगड खाणीवर सोमवारी (ता. 23) रात्री तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हा महिला आघाडी सचिव लता कळंबे व विठ्ठलवाडी येथील रहीवासी प्रमोद माने हे जखमी झाले आहेत. यापैकी प्रमोद माने हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी आलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर लता कळंबे यांना मुकामार लागला आहे.

सुधागड तालुक्यातील पिलोसरी येथील दगडखाणीवर डंपर चालक म्हणून नोकरी करीत असलेल्या प्रमोद माने यांना त्याच्या मालकाने नोकरीवरुन काढून टाकले. या प्रकरणी मध्यस्थी करण्यास गेलेल्या लता कळंबे यांच्यासह डंपर चालकास सबंधीत खाणमालक व त्याच्या चार साथीदारासह इतरांनी बेदम मारहाण करुन अंगावरील मौल्यवान वस्तू हिसकावून नेल्याची तक्रार केली आहे. या संदर्भात पाली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लता कळंबे व त्यांच्या सहकार्यांविरोधात देखील मारहाण व तोडफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लता कळंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील साक्षिदार प्रमोद माने (रा. विठ्ठलवाडी ता. सुधागड) हे पिलोसरी येथील दगड खाणमालक सुरेंद्र पाटील यांचे दगडखाणीवर डंपर चालक म्हणून नोकरी करीत होते. ते 14 डिसेंबरला कामास असताना खडी डंपरच्या फेर्या न मारता झोपलेले मिळून आले. त्यामुळे प्रमोद माने यास खान मालक सुरेंद्र पाटील यांनी कामावरुन काढून टाकले. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. म्हणून डंपरचालक प्रमोद माने यांनी लता कळंबे या समाजसेविका म्हणून काम करीत असल्याने सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. 

त्याबाबत खाणचालक अनिल डाकी, सुरेंद्र पाटील, नितीन केदारी, संदेश शिंदे यांनी लता कळंबे यांना चर्चेसाठी बोलाविले होते. त्याप्रमाणे कारचालक गजानन आंबेकर रा. चिवे, सुभाष सदू पवार रा. खवली आदिवासीवाडी, दत्ता लक्ष्मण वाघमारे, रा. खवली आदिवासीवाडी यांना सोबत कारमध्ये घेवून त्यांच्या बरोबर प्रमोद माने व त्यांचे 7 ते 8 सहकारी मित्र यांना घेवून गेले होते. त्यावेळी 'खाणचालक अनिल डाकी, सुरेंद्र पाटील यांच्यासह अन्य 30 ते 40 सहकारी यांनी  प्रमोद माने यांस लोखंडी शिगेने व इतरांनी लाकडी दांडक्याने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. व फिर्यादी लता कळंबे या कारमध्ये बसल्याचे पाहून त्यांच्या कारचा दरवाजा उघडून बाहेर खेचून काढले व हाताबुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ व सोन्याची कुडी खेचून घेवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. कारचालक गजानन आंबेकर यांना सुध्दा कारमधून बाहेर खेचून हाताबुक्क्याने मारहाण करण्यात आली व जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आणि गाडीच्या दरवाजावर लोखंडी शिगेने फटके मारुन तोडफोड केली,' अशी फिर्याद लता कळंबे यांनी दिली. 

त्यानुसार सबंधीतांविरोधात पाली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच लता कळंबे यांच्या विरोधात देखील अक्षय राजेश शिंदे रा. पाली- सुधागड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी हे पिलोसरी येथील सुरेंद्र पाटील यांचे दगडखाणीवर कॅशियर म्हणून काम करीत आहेत. त्याच दगड खाणीवर प्रमोद माने हे डंपरचालक म्हणून नोकरी करीत आहेत. 14 डिसेंबरला रात्री 2.00 वाजताचे सुमारास प्रमोद माने हा खडी डंपरच्या फेर्या न मारता झोपलेला मिळून आला व रात्री प्लॅन्ट ऑपरेटर यांच्याकडून डंपरच्या फेऱ्या वाढवून घेतल्या हे सुपरवायजर विकेश पवार यांचे निदर्शनास आले. ती बाब त्याने मालक सुरेंद्र पाटील व खाणचालक अनिल डाकी यांना सांगितली. त्यांनी प्रमोद माने यास कामावरुन काढून टाकले. त्यावरुन वाद निर्माण झाला. 

'यातील प्रमोद माने, लता कळंबे, व त्यांचे 10 ते 12 सहकारी यांनी संगनमत करुन दगडखाणीवर येवून प्रमोद माने यांना कामावरुन काढून टाकल्याचा राग मनात धरुन हाताबुक्क्याने मारहाण केली व त्यांच्या हातातील लोखंडी पट्टीने ऑफीसचे काचेवर फटके मारुन काच फोडून नुकसान केले व शिवीगाळ केली,' अशी फिर्याद दिली. त्यानुसार सबंधीतांविरोधात देखील पाली पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा तपास पाली पोलीस निरिक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पि. डी. भालेराव करीत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com