राणेंसारख्या जेष्ठ नेत्याची भाजपकडून अवहेलना : जयंत पाटील

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपवाल्यांनी काँग्रेस सोडायला लावली. काँग्रेस सोडल्यावर तुम्हाला पक्षात घेण्यास काही अडचणी आहेत, असे सांगितले. हे जर आधी सांगितले असते तर त्यांनी पक्ष सोडला नसता. राणेंसारख्या जेष्ठ नेत्याची अवहेलना भाजपच्या नेत्यांनी केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी येथे केली.
राणेंसारख्या जेष्ठ नेत्याची भाजपकडून अवहेलना : जयंत पाटील

विटा : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपवाल्यांनी काँग्रेस सोडायला लावली. काँग्रेस सोडल्यावर तुम्हाला पक्षात घेण्यास काही अडचणी आहेत, असे सांगितले. हे जर आधी सांगितले असते तर त्यांनी पक्ष सोडला नसता. राणेंसारख्या जेष्ठ नेत्याची अवहेलना भाजपच्या नेत्यांनी केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी येथे केली. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेशी खेळ करुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी, जीएसटीबाबत सरकारची धोरणे पूर्णपणे फसलेली आहेत, असाही आरोप पाटील यांनी केला.

येथील श्रेयस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, ताजुद्दीन तांबोळी, हणमंतराव देशमुख, माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर, बबन हसबे, दिलीप बागल, बलवडीचे उपसरपंच तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन दिवटे, तालुका उपाध्यक्ष नानासाहेब मंडलिक, अॅड. संदीप मुळीक उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले, ''मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढतो असे सांगत नोटाबंदी केली. दहशतवादाचे कंबरडे मोडले जाईल, असे नोटाबंदीनंतर सांगितले गेले. नक्षलवाद थांबला जाईल अशीही अटकळ बांधली गेली होती. पण नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, असे आम्ही नाही तर कॅगचा अहवाल सांगतो आहे. दहशतवाद व नक्षलवाद संपुष्टात आला नाही, हे शासकीय संस्थांच्या अहवालातून उघड होत आहे. काही लोक नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध कोर्टात गेली. पण भाजप सरकार कोर्टातही तोंडावर पडले आहे. बेकायदेशीर कॅश बाहेर काढतो, असे सांगत भारतभर छापे मारले त्यातही हाती भोपळा आला आहे. त्यामुळे सामान्य लोकांना त्याचा मोठा दणका बसला आहे,"

ते पुढे म्हणाले, "मोदींचा कोणताच मुद्दा खरा ठरलेला नाही. मोदी सरकार शेतकरी, नोकरदार, व्यापारी अशा सर्व पातळींवर अपयशी ठरली आहे. एका बाजूला भाजप सरकार गोरगरीबांचा पिळवणूक करीत असताना शिवसेनाही सत्ता मात्र उपभोगत आहे आणि सरकारविरोधात टीका करीत आहे. ही सरकार चालविण्याची त्यांची कोणती पद्धत आहे. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट ही वैयक्तिक स्वरुपाची आहे. कुणी त्याचा राजकीय अर्थ काढू नये. शिवसेना जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत त्यांना राजकीय तोटा सहन करावा लागेल,"

नारायण राणेंबाबत बोलताना ते म्हणाले, "भाजपाने नारायण राणेंसारख्या मुख्यमंत्री पद भोगलेल्या व्यक्तीची अवहेलना केली आहे. राणे यांना काँग्रेस पक्ष सोडायला लावला. भाजपा प्रवेश न देता त्यांना दुसरा पक्ष स्थापन करायला लावला आणि मंत्रीपदाची त्यांच्यावर टांगती तलवार ठेवली आहे. आता मिळालेच तर अतिशय दुय्यम दर्जाचे मंत्रीपद त्यांना दिले जाईल त्यामुळे भाजपवर कोणीही विश्‍वास ठेवायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे."

जयंत पाटील म्हणतात...

* भाजपाकडून नारायण राणे यांची अवहेलना

* सत्तेत राहून सरकारच्या कामावर टीका करणे ही उद्धव ठाकरे यांची सरकार चालविण्याची कसली पद्धत?

* स्थानिक कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेवून सांगली महापालिका निवडणुका लढविण्याचा निर्णय घेणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com