चंद्रकांतदादांच्या कुंडलीत राहू-केतू नसावा!

श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यात कोणाचे काय पण ठरू दे, मुख्यमंत्री कोणाचा हे पण त्यांच्यात ठरलंय म्हणे, पण ते आम्हाला माहीत नाही. मात्र जिल्ह्यात 'माझं आणि दादाचं' ठरलंय. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करून कोल्हापूर देशात नंबर एकचा जिल्हा बनवण्यासाठी एकमेकांनी हातात हात घालून काम करायचं, असं आमचं ठरलेलं आहे.
चंद्रकांतदादांच्या कुंडलीत राहू-केतू नसावा!

गडहिंग्लज (कोल्हापूर) : पुढील पाच वर्षे तरी कॉंग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही. यामुळे अनुभवी व अल्पसंख्यांक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आणखीन पाच वर्षे वाया न घालवता त्यांना भाजपात अधिक संधी मिळेल, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना जाहीर निमंत्रणच दिले. 

विशेष म्हणजे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची व्यासपीठावरावर उपस्थिती असतानाच मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांना दिलेले आवतण जिल्ह्यातील राजकारणात विशेष चर्चेची ठरली आहे. 

येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील, आमदार मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, म्हाडाचे अध्यक्ष श्री. घाटगे, जनता दलाचे नेते ऍड. श्रीपतराव शिंदे आज एकाच व्यासपीठावर होते. यावेळी मुश्रीफ व श्री. पाटील यांच्यात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली. 

मुश्रीफ यांनी पहिल्यांदा भाषणातून दादांची राजकीय कळ काढली. ते म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दादा पहिल्यांदाच माझ्या कागल विधानसभा मतदारसंघात आल्याबद्दल त्यांचे स्वागत आणि अभिनंदनही करतो. परंतु, मला चांगल्या कामाच्या शुभेच्छा त्यांना देता येणार नाहीत. कारण मी त्यांच्या उलट्या पक्षात आहे. सोलापूरच्या दौऱ्यात दादांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. परंतु, मी काय त्यात नाही. दादांनी यापूर्वीच खासगीत मला निमंत्रण दिले होते. आमच्याकडे मुस्लिम चेहरा नाही, यामुळे तुम्हाला संधी आहे असे सांगून त्यांनी भाजपात येण्याचा सल्ला दिला होता. परंतु, भाजपाला आमच्यासारख्या विरोधकांची गरज आहे. यामुळे भाजपानेही राज्यात काही विरोधक शिल्लक ठेवावेत. एखाद्या माणसाची पाच वर्षात किती प्रगती व्हावी, याचे उदाहरण म्हणून दादांकडे पहावे लागेल. आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्षपदापर्यंत त्यांची वाटचाल अवघ्या पाचच वर्षात झाल्याने त्यांच्या कुंडलीत राहू-केतू नसावा, असे वाटते. शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष आपलाच मुख्यमंत्री होणार म्हणून सांगत आहेत. या मुद्यावर अमित शहा, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं काय ठरलंय, हे काय आम्हाला माहीत नाही. 

श्री. मुश्रीफ यांच्या या टोलेबाजीला स्पर्श करून चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार बॅटींग केली. ते म्हणाले, चंदगड मतदारसंघात भाजपाकडून इच्छूकांची संख्या जास्त असल्याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले. परंतु लोकसभा निवडणुकीत अधिक इच्छूक असलेल्या काही मतदारसंघात सर्वांनाच एका माळेत बांधून टाकले आणि यशही मिळविले. यामुळे चंदगडमधील इच्छुकांनाही एका माळेत आम्ही बांधणार आहोत. याची काळजी नसावी. मुळात मुश्रीफ यांचे काम आणि अनुभव पाहता त्यांनी आहे त्या पक्षात न राहता त्यांचा अधिक उपयोग आमच्या पक्षात होईल. पुढील पाच वर्षे तरी आघाडीचे सरकार येणार नाही हे नक्की आहे. युती सरकारने तसे कामच केल्याने आघाडीला सत्तेत असणार नाही. मी बोलतो ते खरे करून दाखवितो. यामुळे मुश्रीफ यांनी आपली पाच वर्षे आणखीन वाया न घालवता भाजपात आल्यास त्यांना अधिक संधी मिळेल. आता दहा लोकांची यादी तयार आहे. मुश्रीफ आल्यास ही संख्या 11 पर्यंत जाईल, असा टोला हाणताच उपस्थितांत एकच हशा पिकला. 



 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com