राधानगरी : मातब्बर नेते असूनही कॉंग्रेस बॅकफूटवर

राधानगरी : मातब्बर नेते असूनही कॉंग्रेस बॅकफूटवर

राशिवडे बुद्रुक : राधानगरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे जातो हे माहिती असूनही कॉंग्रेसमध्ये प्रत्येक निवडणुकीत उमेदवारीसाठी सुंदोपसुंदी होते. इच्छुकांची भाऊगर्दी आणि अखेरच्या क्षणी सगळ्यांचीच माघार ही परंपरा असताना यावेळीही ही संख्या लक्षणीय ठरत आहे. 

एकमेकांना पाण्यात पाहणे, उट्टे काढणे, पाय ओढण्याच्या वृत्तीमुळे येथे या पक्षाला संधी असूनही अपयश येते. आता तर हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा, अशी मागणी होत आहे. यासाठी मतदारसंघातील सर्व कॉंग्रेस नेत्यांमध्ये एकी हवी आणि एकच नाव निश्‍चित व्हायला हवे. असे घडेल असे चित्र सध्या तरी नाही.

राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस मजबूत आहे. येथे मातब्बर नेते आहेत. परंतु, कोण कुणाचे नेतृत्व मानत नाही. किंवा कॉंग्रेसचा तंबू एकखांबी असावा, असंही कुणाला वाटत नाही. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी. कोण आघाडी धर्माकडे तर कोण त्यांच्या विरोधात. कोण गोकुळसाठी जुळवतो, तर कुणाचा साखर कारखान्यावर डोळा. यामुळे येथे पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व आहे. 

काहीजण पी. एन. पाटील यांच्या विचाराला मानणारे आहेत; पण एकसंध होण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा आणि पक्षाला बळ द्यावे, असे कुणालाच वाटत नाही. या स्थितीत पक्षाची ताकद असूनही बुरूज ढासळल्यासारखे झाले आहेत.

कॉंग्रेसचे वर्चस्व असूनही येथे आमदारकी मिळत नाही. राधानगरीत तर पक्षाचा वरचष्मा असूनही गटामध्ये पक्षाचे तुकडे झाले आहेत. आजवर या पक्षाचा एकही आमदार या तालुक्‍याचा झालेला नाही. 

ऐन तारुण्यात उदयसिंह पाटील - कौलवकर यांना पक्षाची उमेदवारी मिळाली होती. तेव्हाही ही गटबाजी त्यांच्या पराजयाचे कारण ठरली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत वारेमाप इच्छुक होतात आणि माघार घेतात. एका कॉंग्रेसचे दोन पक्ष झाले आणि येथील जागा राष्ट्रवादीला गेली.

यावेळी नाही तर कधीच नाही ही भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली आहे. आता त्यांनी गोकुळच्या कारभारावर व नेत्यांवरच हल्ला चढवून लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. दीर्घकाळ कॉंग्रेसचे आमदार म्हणून राहिलेले बजरंग देसाई यांनी यावेळी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

इच्छुक नेते घेतात शेवटच्या क्षणी माघार
विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे येथील बक्कळ नेते इच्छुक आहेत. यामध्ये राधानगरी तालुक्‍यातून गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, विजयसिंह मोरे, हिंदूराव चौगले, भुदरगडचे सत्यजित जाधव, सचिन घोरपडे यांचा समावेश आहे. हे सगळेच एकमेकाला पाडण्याची भाषा करत शेवटच्या क्षणी अचानक माघार घेतात. याचा फायदा कधी राष्ट्रवादीला, तर कधी विरोधकांना होतो.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com