सूरमंजिरी लाटकरांना महापौरपदापासून 'ताराराणी' रोखणार? 

महापौर सरिता मोरे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्या महापौरपदासाठी घडामोडी गतिमान झाल्या आहेत.
सूरमंजिरी लाटकरांना महापौरपदापासून 'ताराराणी' रोखणार? 

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार सौ. सूरमंजिरी लाटकर यांच्या पराभवासाठी ताराराणी आघाडीची व्यूहरचना सुरू आहे. सौ. लाटकर यांचे पती व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या विरोधी भुमिकेमुळे त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

महापालिकेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व आहे. या आघाडीसोबत शिवेसनेचे चार नगरसेवक आहेत. सद्याचे महापौर पद राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादीकडून सौ. लाटकर यांचे नांव आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडी त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या प्रयत्नात असून, राजू लाटकर यांचे प्रतिस्पर्धी मारुती माने यांच्या पत्नी सौ. स्मिता यांचे नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे. माने यांना उमेदवारी देऊन लाटकर यांना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे महापौरपदाची ही निवडणूक रंगतदार होणार आहे. 

या निवडीला लोकसभा निवडणुकीचे संदर्भ आहेत. 'राष्ट्रवादी'चे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात राजू लाटकर यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे ताराराणी आघाडीने लाटकर यांना विरोध करण्याचा निर्णय घेतला. मागच्या महापालिका निवडणुकीपासुनच लाटकर यांच्याविरोधात ताराराणी आघाडीने फिल्डिंग लावायला सुरवात केली आहे. 

गतवेळच्या महापौर निवडणुकीवेळी सरिता मोरे व लाटकर यांचे नाव होते. या वेळी मोरे यांना संधी दिली. सहा महिन्यांनंतर लाटकर यांना संधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार या वेळी लाटकर यांचेच नाव निश्‍चित होणार आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापतिपदाचीही निवडणूक याच दिवशी होईल. सभापतिपद आता 'राष्ट्रवादी'च्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे या पक्षातून कोणाचे नाव पुढे येते, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. 
 
नव्या महापौरांचा कालावधी सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांतच आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे दोन महिने आचारसंहितेत जातील. त्यानंतर कसाबसा महिना, दीड महिना मिळणार आहे. म्हणजे नव्या महापौरांना जेमतेम चार महिन्यांचाच कालावधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

 
चार वर्षे महापालिकेवर दोन्ही कॉंग्रेसचीच सत्ता आहे. ही सत्ता राखण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. गतवर्षी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी "राष्ट्रवादी'तील दोन नगरसेवकांनी भाजप-ताराराणीच्या आशिष ढवळे यांच्या बाजूने हात वर करून मतदान केल्याने स्थायी समितीत दोन्ही कॉंग्रेसला हादरा बसला होता. त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. हा अनुभव लक्षात घेता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अधिक सतर्क राहणार आहेत. 
  
महापालिकेती संख्याबळ असे:
कॉंग्रेस- 29 
राष्ट्रवादी - 13 
भाजपा-13 
ताराराणी आघाडी-19 
शिवसेना - 4 
रिक्‍त जागा - 2  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com