कोल्हापुरात राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण : एकमेकांची पदे कापण्यातच धन्यता

महापौर निवडीत अॅड. सूरमंजिरी लाटकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर पक्षातील धुमसणारा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या संघर्षाचा फायदा मात्र विरोधी गटांना होत आहे. लाभाच्या पदासाठी सुरू असलेली ईर्षा आणि त्यातून एकमेकाला मदत करण्याऐवजी एकमेकाच्या पायात पाय अडकवून पाडण्याचे प्रकार घडत आहेत. पक्षातील या अंतर्गत लाथाळ्यांमुळे शहरातील राजकारणातून हा पक्ष हद्दपार होतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण : एकमेकांची पदे कापण्यातच धन्यता

कोल्हापूर : महापौर निवडीत अॅड. सूरमंजिरी लाटकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर पक्षातील धुमसणारा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या संघर्षाचा फायदा मात्र विरोधी गटांना होत आहे. लाभाच्या पदासाठी सुरू असलेली ईर्षा आणि त्यातून एकमेकाला मदत करण्याऐवजी एकमेकाच्या पायात पाय अडकवून पाडण्याचे प्रकार घडत आहेत. पक्षातील या अंतर्गत लाथाळ्यांमुळे शहरातील राजकारणातून हा पक्ष हद्दपार होतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. 2005 पासून पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची महापालिकेच्या राजकारणात 'एन्ट्री' झाली आहे. त्यांनी शहराच्या राजकारणात एक दबदबा निर्माण केला होता; पण आता त्याला छेद देण्याचे काम सुरू आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर आणि जिल्ह्याच्या गोटात चार, पाच नावे महत्त्वाची आहेत. यामध्ये जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, पक्षाचे स्वीकृत नगरसेवक प्रा. जयंत पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर, आदिल फरास यांचा समावेश होतो. यातील प्रत्येकात मतभेद आहेत. मला संधी नाही मिळाली तरी चालेल; पण त्यालाही मिळाली नाही पाहिजे, यासाठीच राजकारण सुरू असते. जिल्हा बॅंकेच्या राजकारणापासून हे शह-काटशाहचे राजकारण सुरू झाले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत प्रा. जयंत पाटील यांचा पराभव झाल्यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांना स्वीकृत सदस्य करून घेतले. त्याचबरोबर महापालिकेतही त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतल्यानंतर शह-काटशाहचे राजकारण सुरू झाले. 

प्रा. पाटील यांनाच दोन्ही पदे का? यावरून आर. के. पोवार, राजेश लाटकर यांनी मुश्रीफांकडे तक्रार केली. त्यामुळे जयंत पाटील यांना जिल्हा बॅंकेतील स्वीकृत सदस्याचा राजीनामा द्यावा लागला. त्या जागेवर पुन्हा आर. के. पोवार यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे पोवार, लाटकर, पाटील आणि जिल्हाध्यक्ष पाटील यांच्यातील मतभेद वाढत गेले. या मतभेदातून महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत त्याचा फटका जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील यांना बसला. बहुमत असताना राष्ट्रवादीतील दोन नगरसेवक फुटल्याने त्याचा फटका पाटील यांना बसला. राष्ट्रवादीतील हा धगधगणारा असंतोष शांत झाला नाही. यामुळे लाटकर यांना त्यांचे शहराध्यक्षपदही गमवावे लागले.

सतेज पाटील यांच्याशी जवळीक
आमदार मुश्रीफ यांच्याकडे दोन तरुण शिलेदार होते. एक आदिल फरास आणि दुसरे लाटकर; पण फरास आणि लाटकर यांचे कधीच पटले नाही. दोघेही एकमेकाला विरोध करत राहिले. महापालिकेच्या निवडणुकीत दोनवेळा पराभव झाला. यामुळे लाटकर हळूहळू मुश्रीफांपासून दूर जाऊ लागले. त्यांची लगट कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासोबत वाढत गेली. या सगळ्याचा परिणाम लाटकरांचा पत्ता कट होण्यावर झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com