जवानाच्या हतबल बापाची दखल कोण घेणार? जिल्हाधिकारी की नेते मंडळी?

सैन्य दलातील जवान अनिकेत मोळेचा बेळगावच्या मिलिटरी कॅम्प मध्ये सराव करताना मृत्यू झाला. पाच महिने पूर्ण झाले तरीही अद्याप त्यांच्या विम्याची सुमारे तीस लाख रुपयांची मदत वडिलांना मिळालेली नाही. वडिल सुभाष मोळे यांनी कागदपत्रांची पुर्तता करून ही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे
Father of Martyr Aniket Mole not getting Insurance Amount
Father of Martyr Aniket Mole not getting Insurance Amount

कोल्हापूर : सैन्य दलातील जवान अनिकेत मोळेचा बेळगावच्या मिलिटरी कॅम्प मध्ये सराव करताना मृत्यू झाला. पाच महिने पूर्ण झाले तरीही अद्याप त्यांच्या विम्याची सुमारे तीस लाख रुपयांची मदत वडिलांना मिळालेली नाही. वडिल सुभाष मोळे यांनी कागदपत्रांची पुर्तता करून ही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. अपडेटसाठी केलेल्या फोनला सुद्धा अधिकारी दाद देत नसल्यामुळे ते हतबल झाले आहेत. प्रजसत्ताक दिनी जवानांना अभिवादन केले जाईल. पण या हतबल बापाची दखल जिल्हाधिकारी, नेते मंडळी घेणार काय ?

घरपण (ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथील सुभाष मोळे हे शेतकरी आहेत. देशप्रेमापोटी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना देशसेवेसाठी अर्पण केले. मोठा मुलगा सीमा सुरक्षा दलात आहे. तर छोटा बावीस वर्षाचा अनिकेत भूदलात अरुणाचल प्रदेशात होता. त्याची पी.टी. चांगली होती. त्याला ऍवॉर्ड सुद्धा मिळाले. अरुणाचल प्रदेशातून तो पुढील ट्रेनिंगसाठी बेळगावला आला होता. तेथे कवायत करतानाच त्याचा मृत्यू झाला. 28 ऑगस्ट 2019ला मृत्यू झाल्यानंतर मृतदेह घरपण येथे आणण्यात आला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. प्रशासकीय फौज तेथे उपस्थित होती. सांतवणासाठी नेतेमंडळींनी सुद्धा रांग लावली होती. एक गेला की एक नेता येत होता. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. मात्र, ते मृत्यूनंतरचे बारा दिवस संपल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही पाहिले नाही.

अनिकेत मोळे जेव्हा भरती झाले तेंव्हा त्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडले होते. याचवेळी त्याचा तीस लाख रुपयांचा विमा उतरला होता. त्याची कागदपत्रे घेवून सुभाष मोळे बॅंकेत गेले. त्यांनी विमा कंपनीसाठी आवश्‍यक सर्व कागदपत्रे दिली. तीन महिन्याच्या आत सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र, अद्याप ही कोणतेही प्रत्युत्तर मिळालेले नाही. त्यामुळे सुभाष मोळे हतबल झाले आहेत. सध्या बॅंकेतील आणि विमा कंपन्यांचे अधिकारी त्यांचा फोन ही घेत नाहीत. आता पुढील पाठपुराव्यासाठी मोळे यांनी मोठ्या मुलाला घरी बोलवून घेतले आहे. आजच तो कोल्हापुरात दाखल झाला आहे. एका जवानाच्या बापाला मुलाच्या विम्याच्या पैशासाठी यातना होत असताना प्रशासकीय अधिकारी नेते मंडळी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणार की त्यांना तातडीने मदत करणार हे लवकरच दिसून येईल.

मुलाच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी वारंवार पाठ पुरावा केला. तरीही बॅंकेतील आणि विमा कंपन्यांतील अधिकाऱ्यांकडून काहीच प्रत्युत्तर मिळत नाही. शवविच्छेदनाचा अहवाल, एफआयआर, पॉलिसी याबाबत आवश्‍यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली आहे. तरीही दाद लागू देत नाहीत. एसबीआयच्या ट्रेझरी शाखेतून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे पाठ पुरावा केला आहे. तीस लाख रुपयांचा विमा होता. आत्ता मात्र कोणच दाद घेत नाहीत - सुभाष मोळे (घरपण,ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com