'दक्षिणेतील राक्षस' गाडून सतेज पाटलांचे उपकार फेडणार!

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे आपला प्रचार केल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवावी असा आग्रह केला होता. पण मी शिवसेनेतच योग्य असल्याचे सांगितले.
'दक्षिणेतील राक्षस' गाडून सतेज पाटलांचे उपकार फेडणार!

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जे उपकार केले त्याची शतपटीने परतफेड येत्या विधानसभेत निवडणुकीत केली जाईल. माझ्या खासदारकीसाठी पाटील यांनी आपले जीवन पणाला लवले. राजकीय जुगार खेळला. त्यांच्या मागील पराभवाची जखम अजूनही भळभळत आहे. दक्षिणेतील राक्षस गाडूनच पराभवाचा वचपा काढू आणि ही प्रवृत्ती कायमची हद्दपार करू, अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज दिली.

संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पाटील यांच्या मेळाव्याला शिवसेनेच्या खासदारांनी उपस्थिती लावल्याने ते नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले होते. मंडलिक म्हणाले, या व्यासपीठावर जे जे आहेत त्यांनी सर्वानी मिळून मला खासदार केले आहे. 'आमचं ठरलयं'चा पहिला भाग लोकसभा निवडणुकीत झाला. आता दूसरा भाग विधानसभेसाठी शिल्लक राहिला आहे. लोकसभा निवडणूक ही एक ट्रेलर होती. 2014 ला सतेज पाटील यांचा पराभव झाला त्याची जखम अजून भळभळत आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हा पराभव होता. पाटील यांना अनुमोदन देण्यासाठी मी येथे आलो आहे. लोकसभा निवडणुकीत निगवे गावापासून कोल्हापूर दक्षिणचा दौरा सुरू केला. मात्र कामाबाबत फार काही चांगले कानावर पडले नाही. पूर्वी सतेज पाटील तसेच आम्ही गोकुळसह सगळया निवडणुका एकत्रित लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत स्वाभिमान जिवंत ठेवला. मी विरोधी पक्षात असलो तरी आमचा मैत्री पक्ष कायम राहणार आहे. पराभवाचा वचपा काढण्याचा संधी चालून आली आहे. दक्षिणमध्ये मला 43 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. सतेज पाटील जो उमेदवार देतील तो 50 हजारांहून अधिक मताधिक्‍याने निवडून येईल. दक्षिणेतील राक्षस गाडायची आमची भुमिका आहे. लोकसभेवेळी खुपिरे येथे भाकणूक झाली होती. लोकसभा हातातून गेली तर गोकुळ आणि दक्षिणही हाती राहणार नाही अशा स्वरूपाची भाकणूक होती. सतेज पाटील यांनी जे उपकार केले त्याची शतपटीने परतफेड विधानसभा निवडणुकीत केली जाईल. त्यांनी सोलापूरमध्ये भाजप प्रवेश केला आहे. यापुढे ते सोलापूरचेच राजकारण करतील असे वाटते.

नव्या पिढीला आमच्याकडे द्या
ऋतुराज पाटील यांचे नाव न घेता नव्या पिढीला आमच्याकडे द्या, असे मंडलिक यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यास सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यासारखे दलबदलू असा शिक्का आपल्याला नको. एका घरात दोन वेगवेगळे पक्ष नको असे उत्तर समारोपाच्या भाषणात दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com