ज्या राधानगरीने महाडिकांना डोक्यावर घेतले त्यांनीच आपटले!

या विजयाने आमदार प्रकाश आबिटकर यांचा युतीतून मार्ग मोकळा झाला आहे.
ज्या राधानगरीने महाडिकांना डोक्यावर घेतले त्यांनीच आपटले!

भोगावती (कोल्हापूर): राधानगरी विधानसभा मतदारसंघाने गेल्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना अक्षरशः डोक्‍यावर घेतले. इथून मिळालेले मताधिक्‍यच त्यांना विजयी करून गेले. मात्र या निवडणुकीत राधानगरीने त्यांना जोरदार झटका दिला. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना 39 हजाराचे मताधिक्क्य दिले. परिणामी मंडलिक मोठ्या मताधिक्क्याने कोल्हापूरचे खासदार झाले.  

राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाडिक यांच्या बाजूने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बजरंग देसाई, के. पी. पाटील, 'गोकुळ'चे संचालक अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, धैर्यशील देसाई यांच्यासह कृष्णराव किरुळकर, उदयसिंह पाटील व भोगावती व बिद्री साखर कारखान्यासह पी. एन. पाटील यांची टीम राबली. तर मंडलिक यांच्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर, दिनकरराव जाधव, सतेज पाटील गटाचे विजयसिंह मोरे, सदाशिवराव चरापले, नंदकिशोर सूर्यवंशी, मारुतराव जाधव, दीपक शिरगावकर, बाळासाहेब नवणे आदींनी रान उठवले. सुरुवातीला एकतर्फी असलेली भगवी हवा बदलण्यात नेते काहीसे यशस्वी ठरले. परंतु, मतदारांच्या मनातलं वादळ ते रोखू शकले नाहीत. इथे आघाडीच्या विरोधात आणि शिवसेनेच्या बाजूने असे नव्हे तर महाडिकांच्या विरोधात म्हणून मंडलिकांच्या बाजूने असेच ठरवले आणि ठरवले तसेच केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीत या विजयाने आमदार प्रकाश आबिटकर यांचा युतीतून मार्ग मोकळा झाला आहे. तरीही भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राहुल देसाई यांचे काय? हा प्रश्‍न उरतोच. विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील की जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील असतील हा मुख्य मुद्दा आहे 

2014 चे मताधिक्‍य : 
- एकूण मतदान : 2 लाख 25 हजार 993 
- धनंजय महाडिक : 1 लाख 17 हजार 292 
- प्रा. संजय मंडलिक : 93 हजार 
- मताधिक्‍य : 24 हजार 288 (महाडिक). 
-- 
2019 चे मताधिक्‍य : 
- एकूण मतदान : 2 लाख 29 हजार
- धनंजय महाडिक : 86 हजार 945
- प्रा. संजय मंडलिक : 1 लाख 26 हजार 
- मताधिक्‍य : 39 हजार 215

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com