मिरजेत वर्षानुवर्षे सत्तेला वेटोळे घालून बसलेले नेते यंदा आमने-सामने 

काहींनी मुलांना तर काहींनी तडजोड म्हणून सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रणांगणात आणले आहे. वारसदारांची राजकीय एंट्री होत असल्याने नेते बरेच सावध आहेत. पहिल्याच निवडणुकीत तोंडघशी पडून अपशकुन व्हायला नको यासाठी स्वतःचा सुरक्षित व हक्काचा मतदारसंघ पत्नी-मुलांसाठी राखीव ठेवला आहे. या गडबडीत स्वतःसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे.
sangli-miraj
sangli-miraj

मिरज :  महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेने अनेक दिग्गजांपुढे सुरक्षित मतदारसंघाचे संकट उभे ठाकले आहे. वर्षानुवर्षे सत्तेला वेटोळे घालून बसलेले नेते यंदा आमने-सामने उभे ठाकणार आहेत. एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव निश्‍चित असल्याने अनेक नामवंतांचे पत्ते कट होणार आहेत.

प्रभाग निश्‍चितीपुर्वी बांधलेले सर्व आराखडे संपुष्टात आले आहेत. महापालिकेत अनेक वर्षांपासून ठिय्या मारुन असलेले गटनेते किशोर जामदार यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपेक्षित होती.

तेथे मुलगा करणला लॉंच करण्याचा निर्णय घेतल्याने स्वतःसाठी सुरक्षित प्रभाग शोधावा लागत आहे. ऐनवेळी प्रभाग सातमध्ये एन्ट्री घेतली आहे; त्यामुळे तेथे पुर्वीपासून तयारीत असलेल्यांना चिंता लागून राहीली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या गणेश माळी, आनंदा देवमाने यांच्या अडचणीत यामुळे भर पडू शकते.

गेली अनेक वर्षे सत्तेची चव चाखणाऱ्या सुरेश आवटी यांनी चिरंजीव संदीप आवटी याच्या रुपाने आणखी एक सदस्य राजकीय रिंगणात उतरवला आहे. प्रभाग तीनमध्ये सोय करण्याचा प्रयत्न केला असला तरी आव्हान मोठे असेल.

सचिन जाधव, शिवाजी दुर्वे, गोगा बागवान, राकेश कोळेकर असे ताकदवान कार्यकर्ते येथे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत; त्यामुळे संघर्ष जोमाचा असेल. विद्यमान नगरसेवक निरंजन आवटी याला प्रभाग चारमधून पुढे केले आहे.

या प्रभागात अनिलभाऊ कुलकर्णी, विकास सूर्यवंशी, विवेक शेटे, शुभांगी रुईकर असे ताकदवान उमेदवार असल्याने आवटी कुटुंबाचा कस लागेल. अन्यत्र सुरक्षित प्रभाग नसल्याने पर्यायही राहीलेला नाही.

अशीच स्थिती प्रभाग क्रमांक पाचमध्ये आहे. सुरक्षित प्रभाग नसल्याने रथीमहारथींना परस्परांच्या विरोधता यावे लागले आहे. करण जामदार, अकबर मोमीन, हेमंत म्हेत्रे, समेधा देशपांडे, बबिता मेंढे, इद्रिस नायकवडी, संजय मेंढे, संभाजी मेंढे, चंद्रकांत मैगुरे यांच्यात संघर्षपुर्ण लढती येथे रंगणार आहेत. प्रभाग सहामध्ये अभिजीत हारगे, अतहर नायकवडी, मैनुद्दीन बागवान, अल्लाउद्दीन काझी, अकबर मोमीन, जैलाब शेख हे नशिब आजमावणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com