कोल्हापुरात काँग्रेससाठी सतेज पाटील ठरले किंगमेकर 

सतेज पाटील यांचे बेरजेचे राजकारण या निवडणुकीत कामी आले. यामुळे कॉंग्रेसच्या चार जागा निवडून आल्या आणि पाटील यांची जिल्ह्यातील तसेच प्रदेश कॉंग्रेसच्या स्तरावरील ताकदही वाढली
satej_patil.
satej_patil.

कोल्हापूर :  कॉंग्रेसचे नुकसान गटातटाच्या राजकारणामुळे झाले असे सातत्याने म्हंटले जायचे. या म्हणण्यात तथ्यही आहे. काळाच्या ओघात गटतट बाजूला ठेऊन एकत्रित आल्यास राजकारणातून आपण उध्वस्त होऊ ही बाब कॉंग्रेस नेत्यांच्या ध्यानी आल्यानेच यावेळी कॉंग्रेसच्या चार जागा निवडून आल्या. यातील करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरची जागाही आमदार सतेज पाटील यांच्या मुत्सदेगिरीमुळे पदरात पडल्या.


आपण एकत्रित आल्याशिवाय विरोधकांची दुकाने बंद होणार नाहीत. असे सतेज पाटील यांनी जाहीरपणे म्हंटले होते. कोल्हापूर दक्षिणमध्ये पुतण्या ऋतुराज पाटील यास रिंगणात उतरताना त्यांना उत्तरमधून चंद्रकांत जाधव यांचा विचार केला.

जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या सम्राटनगर प्रभागातून भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या. जाधव यांचा गट दक्षिणमध्ये कामी येतो म्हंटल्यावर उत्तरमधून जाधव यांना उमेदवारी दिली. नुसते तिकीट दिले नाही तर कसबा बावड्यातून मोठे मताधिक्‍य दिले. आमदार जाधव यांच्या एकूण मताधिक्‍यात निम्मा वाटा हा कसबा बावड्याचा आहे.


दक्षिणमध्ये पुतण्या ऋतुराज याच्या पाठिशी ते ठाम राहिले. 2014 च्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार याची काळजी घेताना कोणत्याही परिस्थितीत शंभर मतांचीही रिस्क घेण्यात सतेज पाटील यांची यावेळी तयारी नव्हती. गेल्या निवडणुकीत जे जे दुखावले गेले त्यांची समजूत काढून मोट बांधली. अमल महाडिक यांच्या पाठिशी महाडिक गटाचे कट्टर समर्थकच शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. सतेज पाटील यांच्यावर राग आहे म्हणून महाडिक गटात प्रवेश केला असेही एकही उदाहरण यावेळी दक्षिणेत घडले नाही.


करवीरमधून आमदार पी. एन. पाटील विजयी झाले. दरवेळी करवीर आणि कोल्हापूर उत्तर च्या कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव झाला की त्यास सतेज पाटील यांना जबाबदार धरले जायचे. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद पाटील यांच्याकडे आले. जबाबदारीचे पद आल्याने कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करणे हे पाटील यांच्या भावी राजकारणासाठी धोकादायक होते. त्यामुळे करवीरमध्ये पी. एन. पाटील यांच्या मागे सतेज पाटील यांनी ताकद  उभी केली. गगनबावडा तसेच जुन्या करवीरमध्ये त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांनी पी. एन. पाटील यांच्या बाजूने मते टाकली.


सतेज पाटील यांचे बेरजेचे राजकारण या निवडणुकीत कामी आले. यामुळे कॉंग्रेसच्या चार जागा निवडून आल्या आणि पाटील यांची जिल्ह्यातील तसेच प्रदेश कॉंग्रेसच्या स्तरावरील ताकदही वाढली.

एकमेकाच्या लाथाळ्यात कॉंग्रेसची ताकद गेल्या काही वर्षात वाया गेली. गेल्या निवडणुकीत भोपळाही न फोडू शकणारी कॉंग्रेसने यावेळी यश मिळविले. सोबत राष्ट्रवादी असल्याने जिल्ह्यातील दहा पैकी सहा जागा दोन्ही कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या. पूर्वी एकमेकाच्या जागा पाडण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसमध्ये इर्षा असायची. या निवडणुकीत भाजप शिवसेनेने हा वसा उचलून एकमेकाच्या जागा पाडण्याच्या प्रयत्न निकराने केला . त्यामुळे  आहे त्या पण जागा गमावण्याची वेळ युतीवर आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com