अशोक चव्हाणांचा संवाद किती उपयुक्‍त? पी. एन.- आवाडे काय करतील? 

अशोक चव्हाणांचा संवाद किती उपयुक्‍त? पी. एन.- आवाडे काय करतील? 

कोल्हापूर : कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीवर जाहीर भाष्य करण्याचे टाळत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची चाचपणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या दौऱ्यात केली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखणाऱ्या या जिल्ह्यात पुन्हा एकदा कॉंग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. माजी मंत्री पतंगराव कदम यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या "घरवापसी'बद्दल सूचक भाष्य करून न कळत आमदार सतेज पाटील यांनाही धक्का देण्याचे काम केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा जिल्ह्यात दौरा झाला. आमदार सतेज पाटील यांनी सतेज कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांच्या अंतर्गत वादात पक्षाची वाताहत झाली आहे. कॉंग्रेसला अंतर्गत मतभेदाने ग्रासले आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद या निवडणुकांत कॉंग्रेसला या मतभेदाचा फटका बसला. पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे यांच्यातील मतभेद कॉंग्रेसमध्ये सुरूच आहेत. आमदार सतेज पाटील यांनी कॉंग्रेसचा किल्ला ""एकला चलो रे..'' म्हणत सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि महापालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले. परंतु, पी. एन. पाटील व त्यांच्यामधील मतभेद अजूनही पुढे येत आहेतच. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत पाटील गटाच्या एकाही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नव्हते. आवाडे आणि पी. एन. पाटील यांच्यातील दरी कायम आहे. आवाडे यांनी आपल्याला कसा त्रास झाला, याचा पाढा जनतेसमोर वाचला आणि पक्षापेक्षा आता स्वतःचा गट म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले. 

सध्या आमदार सतेज पाटील यांनी पक्षाच्या वाढीसाठी आणि आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पी. एन. पाटील यांनीही आपल्या पातळीवर स्वतंत्र हालचाल ठेवली आहे. 

खासदार श्री. चव्हाण यांच्या कालच्या दौऱ्यात हे सगळे नेते एकत्र दिसले. त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला. काल रात्री हॉटेल सयाजी येथे श्री. आवाडे यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पी. एन. पाटील यांच्या घरीही भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. एकूणच श्री. चव्हाण यांनी आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीची पायाभरणी करण्याच्या दृष्टीने काल सगळीकडे पावले टाकली. आमदार श्री. पाटील यांना महाडिकांविरुद्ध सगळ्या नेत्यांची मोट बांधायची असल्याने त्यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने त्याची सुरवातही केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com