विश्वजित कदम यांच्या निवडीने सांगलीत काॅंग्रेसला उभारी!

विश्वजित कदम यांच्या निवडीने सांगलीत काॅंग्रेसला उभारी!

कडेगाव : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी आमदार विश्वजित कदम यांची निवड झाली. त्यांच्याकडे राज्य पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसला उभारी मिळण्यास मदत होईल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.

कदम यांची पदावर निवड झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा आता पूर्णपणे थांबतील, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. 

दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ते सन 1998 मध्ये कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले. अल्पावधीतच त्यांनी कर्तृत्वाची चुणूक दाखवली. सर्वप्रथम पलूस-कडेगाव मतदारसंघात युवकांचे नेटवर्क निर्माण केले. सन 1999 मध्ये विधानसभा निवडणुकीत डॉ. कदम यांच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले. मग मागे वळून कधी पाहिले नाही. पुढे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांची राज्यभर ओळख झाली.

दुष्काळात बुलढाणा ते सांगली अशी दुष्काळी पदयात्रा काढली आणि ते लक्षवेधी ठरले. पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या व्यथा व वेदना शासन दरबारी पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. पदयात्रेची दखल थेट राहूल गांधींनी घेतली. कामाचे कौतुकही केले. त्यांनी कामातून राहुल यांच्या निकटवर्तीयात स्थान मिळवले. 

कॉंग्रेस सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही त्यांनी विविध प्रश्नांबाबत राज्यभर मोर्चे काढून भाजपाविरुद्ध आवाज उठवला. कॉंग्रेसमध्ये वेगळा ठसा उमटवला. श्रीमती सोनिया व राहुल यांच्याशी जवळीकही वाढली. 

त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रवेशाची ऑफरही दिली. "माझ्या रक्तात कॉंग्रेस आहे' असे सांगत त्यांनी "मी कॉंग्रेसमध्येच राहणार' असे सांगितले. भाजप प्रवेशाच्या अनेक ऑफर आल्या. परंतु ते कॉंग्रेसमध्ये राहिले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठे अपयश आले. कॉंग्रेससह इतर अनेक पक्षांचे नेते भाजप-शिवसेनेकडे गेले. परंतु विश्वजित कॉंग्रेसमध्ये कायम राहिले. ते कॉंग्रेसचे निष्ठावंत शिलेदार असल्याचे सिद्ध झाले. 

त्यांच्याकडे राज्य पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी आल्याने सांगली जिल्ह्यात मरगळलेल्या कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्याने उभारी मिळेल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com