विश्वजित कदम यांनी दाखवून दिली ताकद

तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींच्या भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवत कॉंग्रेसने सर्व ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता मिळविली.
Vishwajit Kadam showed strength in Gram Panchayat Election
Vishwajit Kadam showed strength in Gram Panchayat Election

कडेगाव : तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवत कॉंग्रेसने सर्व ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता मिळविली. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने एकूण 79 पैकी 69 जागा जिंकत आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे.

तालुक्यातील मजमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेसच्या बाजुनेच प्रत्येक निकाल लागत गेला. तालुक्‍यातील सोनकीरे, शिरसगाव, ढाणेवाडी व अंबक या चार गावांत कॉंग्रेसने सत्ता कायम राखली, तर रामापूर, कान्हरवाडी, कोतीज, शिवणी, येतगाव या पाच ग्रामपंचायतींत सत्तांतर घडवून भाजपला दणका दिला.

पहिल्या फेरीमध्ये रामापूर ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. येथे नऊ जागांपैकी सहा जागा जिंकत कॉंग्रेसने परिवर्तन घडविले, तर भाजप-राष्ट्रवादी आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. ढाणेवाडी ग्रामपंचायतीत सर्व सात जागा जिंकल्या. सोनकीरे येथे तीन जागांवर काँग्रेसचे तीन उमेदवार बिनविरोध निवडूण आले होते. निवडणूक झालेल्या सहा जागांपैकी कॉंग्रेसने तीन जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीची एक व भाजपची दोन जागांवर सरशी झाली. 

शिरसगाव येथे कॉंग्रेसने सर्व नऊ जागा जिंकत सत्ता कायम राखली. कान्हरवाडीत कॉंग्रेसची एक जागा बिनविरोध झाली होती. अन्य सहापैकी पाच जागा कॉंग्रेसने जिंकल्या तर एक जागा भाजपला मिळाली. अंबक येथे दहा जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. 

अंबकची पुनरावृत्ती येतगाव ग्रामपंचायती मध्येही झाली. कॉंग्रेसने दहा तर भाजपने एक जागा जिंकली. शिवणी येथे कॉंग्रेसने सर्व नऊ जागांवर विजय मिळविला. कोतिज येथे कॉंग्रेसने एक जागा बिनविरोध मिळविली होती. उर्वरित सहापैकी पाच जागा मिळवित सत्ता काबीज केली. एका जागेवर भाजपने विजय मिळविला. 

तालुक्यात काँग्रेसला मिळालेला विजय विश्वजित कदम यांची ताकद दाखविणारा ठरला आहे. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवित विरोधकांना धुळ चारली.

राष्ट्रवादीतील नाराज गटानेच उडविली जिल्हाध्यक्षांची दांडी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्या मनुर बुद्रूक गावात त्यांचे बंधू पंजाबराव पाटील यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गटाच्या महाविकास आघाडीनेच पाटील यांना दणका दिला.

चंद्रकांत पाटलांच्या गावातच शिवसेनेचा झेंडा 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर (ता. भुरदगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील या पॅनेलाला विरोध करण्यासाठी भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 

आमदार मिटकरी यांचे वर्चस्व

अकोला जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या अकोट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वर्चस्व मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने 13 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com