Maharashtra News Live Update : इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजूरी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवारी दिनांक ६ मे २०२६ रोजीच्या देशासह राज्यभरातील सर्व राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊ या.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

आळंदी नगरपरिषदेचा ढिसाळ कारभार! अग्निशमन गाडी नादुरुस्त असल्याने पाईप गोडाऊन भस्मसात

उन्हाचा तडाखा वाढत असतानाच आळंदी-वडगाव रस्त्यावरील साई मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एका पाईप गोडाऊनला भीषण आग लागली. मात्र, या आपत्कालीन परिस्थितीत आळंदी नगरपरिषदेची एकमेव अग्निशमन गाडी नादुरुस्त असल्याने ती वेळेत पोहोचू शकली नाही. परिणामी, मदतीअभावी हे गोडाऊन डोळ्यांसमोर पूर्णतः जळून खाक झाले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपरिषदेच्या या बेजबाबदार कारभारामुळे आळंदीकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

घरकुलासाठी लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाचा व्हिडिओ व्हायरल...

मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथे घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्याकडून ग्रामसेवकाने पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित ग्रामसेवकाने एक हजार रुपयाची मागणी केली होती मात्र लाभार्थ्याकडे केवळ पाचशे रुपये होते तेवढेच ग्रामसेवकाने घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या व्हिडिओची चौकशी करून दोषी ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे...

मुलांना शाळेत प्रवेश घेण्याआधी पालकांना सावधान करणारी बातमी... पुण्यातल्या 13 बोगस शाळांची यादी जाहीर

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शहरातील १३ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये, असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय...

१०० रूपये एफआरपी वाढविण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : राजू शेट्टी

“राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला “ अशी अवस्था देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे.आगामी गाळपातील हंगामासाठी केंद्र सरकारने १०० रूपये एफआरपी वाढविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि महागाई पाहता केंद्र सरकारने किमान ३०० रुपये प्रति टन वाढ करणे अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

दुष्कृत्य करणाऱ्यांच्या मनात ‘काहीही होणार नाही’ हा विश्वास निर्माण करण्यात फडणवीस यशस्वी

नसरापूरच्या ३ वर्षांच्या चिमुकलीला न्याय कधी आणि कसा मिळेल या वर कोणी काही बोलले का ? त्यानंतर कालची ९ वर्षांच्या मुलीची पुण्यातील घटना, अकोल्यातील पाचूर तालुक्यात १० वर्षीय मुलीवर झालेली अत्याचाराची घटना. पालघर मध्ये भोंदूबाबाने अघोरी पुजासाठी बोलवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला, खरात, ऋषीकेश वैद्य, व इतर ढोंगी बुवाबाबांनी महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना, यांसारख्या बातम्या आता रोजच येत आहेत. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच कायद्याची भीती राहीली नाही. दुष्कृत्य करणाऱ्यांच्या मनात ‘काहीही होणार नाही’ हा विश्वास निर्माण करण्यात फडणवीस यशस्वी झालेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

तूर, हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ

राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी ५८ हजार ६३२ मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. तूर खरेदीची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत २९ मे २०२६ पर्यंत वाढवून दिली आहे.

Maharashtra Government : इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजूरी

इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

Nashik news : आज धर्मध्वज फडकणार

नाशिकमधील काळाराम मंदिरात धर्मध्वज फडकविला जाणार आहे. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.

Hindi Exam For Maharashtra Officers : सरकारी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी होणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द; मंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी होणारी हिंदी भाषेची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती. मनसे आणि शिवसेना ठाकरेंसोबत मराठी भाषा अभ्यास केंद्राने विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात सरकारी अधिकाऱ्यांना हिंदी परीक्षेची गरज आहे का नाही याची पडताळणी करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Jalna Crime : जालना धर्मांतर प्रकरण; मुख्य आरोपीसह त्याच्या भावाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात एका 25 वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतर करण्यास दबाव टाकल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पीडितेच्या तक्रारीवर पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी शेख इम्रान शेख हबीब आणि त्याचा भाऊ, याला आज पोलिसांनी जालनाच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केल. न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Ahilyanagar Update : उपमहापौर जाधवांचा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेचे भान ठेवण्याच्या सूचना

अहिल्यानगर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी, आज सकाळी १० वाजता अचानक भेट देत, प्रवेशद्वारावर उभे राहून उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. अचानक झालेल्या या तपासणीमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी थेट जाब विचारत पुन्हा तसं आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.

Nashik Politics : 'भाषणाला जास्त वेळ घेतला, तर इथं असलेल्या चौघांपैकी कुणालाही 'कुंभमेळा मंत्री' करेल'; मंत्री महाजनांची टिपणी अन् एकच हशा!

कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असून, तिथं त्यांनी वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात कोटींचे करार केले. या वेळी मंत्री गिरीश महाजन देखील होते. मंत्री महाजन यांनी या वेळी केलेल्या मिश्किल टिपणीनं राज्याचे लक्ष वेधून घेतलं. 'मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की, भाषणाला जास्त वेळ घेतला, तर इथं उपस्थितीत असलेल्या चौघांपैकी कुणालाही कुंभमेळा मंत्री करून टाकेल,' अशी मंत्री गिरीश महाजन यांनी टिपणी करताच, तिथं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Ahilyanagar Update : अहिल्यानगर शहराचा महिन्याभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत, महापौरांचे प्रशासनाला नियोजनाचे कडक आदेश

अहिल्यानगर शहरात एक महिन्यापासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर महापौर ज्योती गाडे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेत नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करून सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले. महापौर ज्योती गाडे यांनी वसंत टेकडी इथं भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

Akola Politics : अकोला जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर 84 गावातील ग्रामस्थांसह शिवसेना ठाकरे सेनेचं ठिय्या आंदोलन...

अकोला शहरातल्या जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या शिवसेनेसह गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही अकोट तालुक्यातील 84 गावांना, अद्याप पाणीपुरवठा सुरू झाला नाही. यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलं. "पुढील तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरू झाले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करू आणि तोपर्यंत इथून उठणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Parbhani Politics : पिक विम्यासाठी शिवसेना ठाकरे सेना आमदारांचा आंदोलनाचा इशारा

खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाली, यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही अद्याप शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. सरकारची भागीदारी असलेल्या पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांवर विविध निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळणं कठीण झालं आहे. पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही, तर मोठं आंदोलन उभं करून कृषी मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन केलं, जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी दिला आहे.

Washim Rain : वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान...

वाशिमच्या रिसोड शहरासह कंकरवाडी, आगरवाडीसह तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पडलेल्या अवकाळी पावसामुळे केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसात, केळीचे उत्पादन सुरू होणार होते. मात्र निसर्गाच्या माऱ्यामुळे उभ्या केळींची झाडे उन्मळून पडून होत्याचे नव्हते झाले. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Pune Crime Update : चार आरोपींकडून 9 गावठी पिस्तूल, 5 मॅगझिन अन् 47 जिवंत काडतूस जप्त

पिंपरी चिंचवड इथल्या देहुरोड परिसरात व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध शस्त्रांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. या कारवाई अंतर्गत पिंपरी चिंचवड इथल्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून नऊ देशी कट्टे, पाच मॅक्झिन आणि 47 जिवंत काडतुसे, असा एकूण आठ लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

एडीएमकेमध्ये फूट, टीव्हीकेला पाठींबा देण्याची मागणी

एडीएमके पक्षात फूट पडण्याची चिन्हे आहेत. पक्षातील तब्बल 30 आमदारांनी विरोधी पक्षात न बसता टीव्हीकेला पाठींबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षाची आजची बैठक उद्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Thalapathy Vijay Tamilnadu Politics: विजय यांच्या शपथेआधीच हायव्होल्टेज ड्रामा

थलपती विजय यांच्याकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू असून दुसरीकडे आता मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. निकालाच्या ३६ तासामध्ये विरोधी बाकावरील मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसू लागले आहे.

भाजपने मुंबई विभागासाठी राजेश पांडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे-कोकण विभागात योगेश सागर यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रमोद जठार संयोजक तर संजय वाघुळे सहसंयोजक असतील.

THALAPATHY VIJAY : थलपती विजय यांची विधिमंडळ गटनेता म्हणून एकमतानं निवड

थलपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. थलपती विजय यांची विधिमंडळ गटनेता म्हणून एकमतानं निवड करण्यात आली

भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहराचे पहिले संस्थापक शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक गुलशन जग्गी (वय 80) यांचे पुणे इथं खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

पुण्यातील पाणीकपात 31 मेपर्यंत लांबणीवर

पुणे महापालिकेने ३१ मेपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेत पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. ‘एल निनो’मुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने १५ टक्के कपातीची मागणी केली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कपात टाळण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. तर आज त्या राज्यसभेचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बंगालमध्ये हिंसा भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ज्ञानेश कुमार यांचे निर्देश

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंसा भडकवणाऱ्यांवर आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Narsapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार आहे. यासाठी विशेष पथकाकडून फिर्यादी आणि आरोपींच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविण्याचे काम वेगात सुरू आहे.

Pune Parvati Crime : पुण्यात 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

नसरापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटना ताजी असतानाच पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पीडित मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com