अमरावती : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

मालेगाव, नांदेड या शहरांमध्ये सध्या परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात असून या ठिकाणी तणावपुर्ण शांतता आहे.
Dilip walse patil
Dilip walse patil Sarkarnama

अमरावती : त्रिपुरामधील घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. मालेगाव, नांदेड या शहरांमध्ये सध्या परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात असून या ठिकाणी तणावपुर्ण शांतता आहे. मात्र अमरावती शहरात अजूनही हिंसक निदर्शने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. तसेच यात जे कोणी दोषी आहेत याची चौकशी केली जाईल, कोणालही पाठिशी घातले जाणार नाही, असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून इतर ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. अमरावतीसाठी आवश्यक कुमक तैनात करण्याची सुचना देण्यात आली असून पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या सतत संपर्कात आहे. सर्व राजकीय पक्षांशी बोलून शांतता राखण्यासाठी संवाद साधण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे. अमरावती आणि इतर ठिकाणी घडलेल्या हिंसक घटना अतिशय दुर्देवी आहेत. याचा राजकीय फायदा घेण बरोबर नाही.

केवळ सामाजिक संघटनांचे निवेदन देण्याचे नियोजन होते. मात्र ते देत असताना काही समाज कंटकांनी वातावरण बिघडवले. त्यामुळे ऐनवेळी अपेक्षेबाहेर गर्दी वाढल्याचे ही वळसे पाटील यांनी मान्य केले. मात्र या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, कोणालही पाठिशी घातले जाणार नाही, असेही आश्वासन त्यांनी दिले.

ऐन दिवाळी दरम्यान त्रिपुरा राज्यातील पानीसागर उपविभागात विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे त्रिपुरा राज्यासह आता महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे. मालेगाव, नांदेड, अमरावती या शहरांमध्ये काही या घटनेचे पडसाद उमटल्याचे दिसून आले.

त्रिपुरातील या घटनेविरोधात अमरावती शहरात काल जमात-ए-अहले सुन्नत संघटनेच्यावतीने मुस्लिम समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान काही समाजकंटकांनी जयस्तंभ चौक, चित्रा चौक परिसरातील दुकानावर दगडफेक करून नुकसान केले. या संपूर्ण प्रकारामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आजही शहर बंद दरम्यान राजकमल चौक, जवाहर गेट परिसरात मोठ्या जमावाकडून दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com