केसरकरांच्या घरासमोर प्रवेशबंदी .. पण त्यांच्या पराभवासाठी आदित्य यांनी फिल्डिंग लावलीच!

Aditya Thackeray यांचा सिंधुदुर्ग दौरा झाल्याने शिवसेनेत चैतन्य
Aditya Thackeray
Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

सावंतवाडी : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा आज सिंधुदुर्गपासून सुरू झाला. मात्र सावंतवाडी येथील दौऱ्यात बंडखोर नेते दीपक केसरकर यांच्या घरासमोरून मिरवणूक नेण्यास बंदी घालण्यात आली होती. तरी केसरकर यांच्या पराभवासाठीची मोर्चेबांधणी या दौऱ्यात झाली. केसरकर यांच्याविरोधात ठाकरे यांनी कोणते वक्तव्य केले नाही. पण शिवसैनिकांनी आतापासूनच केसरकर यांच्याविरोधातील फिल्डिंग लावली आहे.

येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे केलेले स्वागत चर्चेचा विषय ठरला. शिवसेनेचे अनेक लढे पाहिलेल्या गवळीतिठा येथील छत्रपती शिवाजी चौकात भर पावसात ही भेट झाली. साळगावकर यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली होती.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर मात्र केसरकरांच्या घरासमोरून जावू शकणार नाहीत; कारण..

सावंतवाडी तालुक्यात शिवसेना वाढवण्यात श्री. साळगावकर यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याकाळात शिवसेनेची शाखा याच गवळीतिठा परिसरात होती. संघटनेच्या माध्यमातून अनेक लढे उभारले गेले. यात साळगावकर यांचे नेतृत्व उदयाला आले. त्याकाळात साळगावकर हे विधानसभेच्या उमेदवारीचे दावेदार मानले जायचे; मात्र शिवसेनेने शिवराम दळवी यांना तिकीट दिले. यानंतर पुढे साळगावकर शिवसेनेपासून दूरावत गेले. ते सावंतवाडी शहराच्या राजकारणात सक्रिय झाले.

आमदार दीपक केसरकर यांच्या साथीने नगराध्यक्षही झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. पुढे केसरकर शिवसेनेत गेल्यानंतर साळगावकर बराचकाळ शिवसेनेत जायचे की नाही या संभ्रमावस्थेत दिसले; मात्र नंतर शिवसेनेच्या पाठबळावर त्यांच्याकडे नगराध्यक्षपद आले. त्यांनी शिवबंधन बांधले नसल्यावरून त्याकाळात टिकाही झाली. गेल्या विधानसभेत साळगावकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या तिकीटावर केसरकरांविरूद्ध निवडणूक लढवली. यानंतर केसरकर व साळगावकर यांच्यातील दुरावा वाढत गेला. आता साळगावकर राष्ट्रवादीत आहेत.

Aditya Thackeray
जनतेच्या डोळ्यात अश्रू होते, तेव्हा हे ४० गद्दार निर्लज्जपणे टेबलावर नाचत होते...

शिवसेनेने जुन्या शिवसैनिकांना परतण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गात पूर्वीचे शिवसैनिक सक्रिय होताना दिसत आहेत. येथील पालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. केसरकर यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने येथील चुरस नेमकी कोणात होईल याबाबत उत्सुकता आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सुतोवाच केले आहे. भाजपचे येथील नेतृत्व करणारे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केसरकरांच्या मांडीला मांडी लावून काम करणार नाही असे जाहीरही केले आहे. केसरकरांच्या भूमिकेमुळे पालिकेत महाविकास आघाडीची ताकदही पूर्वी इतकी दिसणार नाही. यामुळे पालिकेची पुढची गणिते अस्पष्ट झाली आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर साळगावकर काय भूमिका घेणार? याचीही उत्सुकता आहे. कारण त्यांनी दीर्घकाळ शहराचे नगराध्यक्षपद भूषविले आहे.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर साळगावकर यांची दोनच दिवसापूर्वी आमदार तथा जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांची भेट झाली होती. आता त्यांनी आदित्य ठाकरे यांचे केलेले स्वागत चर्चेचा विषय ठरले. येथील गवळी तिठ्यावर भर पावसात त्यांनी आदित्य यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, बंटी माटेकर, रवी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी साळगावकर हे कट्टर शिवसैनिक आहेत असे सांगितले. आदित्य यांनीही त्यांना सोबत राहण्याचे आवाहन केले.

Aditya Thackeray
Shivsena : आधी आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, मग मी देतो ; सत्तारांनी दिले आव्हान..

गवळी तिठ्यावरच स्वागत
गवळी तिठा येथील शिवाजी चौकात या आधी शिवसेनेची अनेक आंदोलने झाली. येथे असलेली शाखा, शिवसेना आणि साळगावकर यांचे एक वेगळे नाते होते. आदित्य यांच्या स्वागताची मिरवणूक याच भागातून काढण्याचा शिवसेनेचा विचार होता; मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा विचार करून ही मिरवणूक चिटणीस नाक्यावरून पुढे नेण्याची विनंती केली होती. शिवसेनेने ती मानली; मात्र साळगावकरांनी शिवाजी चौकातच थांबून आदित्य यांचे स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com