

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील 'रामगिरी' बंगल्याच्या परिसरात एक साप आढळून आला. हा साप दिसून आल्यानंतर काही काळासाठी सर्वत्र तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. धामण प्रजातीचा हा साप होता. तो आढळून आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांना कॉल केला. यानंतर तिथे आलेल्या सर्पमित्रांनी तो साप पकडला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी (ता.10) शपथ घेतली. राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. जिष्णू देव वर्मा यांनी यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री देखील राहिले आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे प्रोपेन आणि ब्यूटेनच्या पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे गॅस टंचाई दूर झाली असल्याने शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी गॅस दाहिन्यांचा वापर महापालिकेने सुरु केला आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.
Crime News : हाॅटेल बंद करून घरी जात असताना अज्ञातांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा राठोड यांना अडवून त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकात हा हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीतून हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्योजकांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यातच काल मध्यरात्री कामगार चौकात हाॅटेल चालक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या उपतालुकाप्रमुखावर अज्ञातांनी चाकू हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांचा मित्रही जखमी झाला होता.
इराण-इस्त्राईल युद्धाचा फटका हॉटेल उद्योगाला बसला आहे. मुंबईतील जवळपास २० टक्के हॉटेल अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे ठप्प झाला आहे.
आखाती देशातील युद्धाचा परिणाम देशातील सामान्य जनेतवर परिणाम होता कामा नये. सर्व मंत्र्यांनी परस्पर समन्वयाने काम करून या संघर्षाचा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत आज सर्व मंत्र्यांना दिले आहेत.
जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी जिष्णू देव वर्मा यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ दिली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते.
अर्थसंकल्पातील ५९ टक्के निधी हा भारतीय जनता पक्षाकडील खात्यांना मिळालेला आहे. शिवसेनेला २२. १४ टक्के, तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघा १९.२० टक्के निधी मिळाला आहे. त्या वेळी सत्ताधारी बाकावरू कोणीतरी राष्ट्रवादी आता महायुती असल्याचे स्पष्ट केले, त्यावर कुठेही गेले तरी ते आमचेच ना, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिले.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक येत्या १२ मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष आपलाच होणार असल्याची खात्री भाजपकडून व्यक्त केली जात आहे. रायगडमध्ये शिंदेसेनेला दूर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. अलिबागमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विजयी मेळावा होणार आहे.
सचिनभाऊ किती वेळ....त्यावर मी एकच प्रश्न विचारला, असे उत्तर सचिन अहीर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिले. तुम्ही बोलणार म्हणून अर्थसंकल्पातील भाषण एक तास पुढे ढकलण्याची घोषणा करू का मी, असा सवाल गोऱ्हेंनी करताच माझ्या लक्षवेधीला न्याय द्या, असे म्हणताच आता खूप झाला न्याय. तुम्ही थांबतच नाही. तुमचं झालं की शिंदे की परत परब...एक तास झालं तुमची लक्षवेधी सुरू आहे, असा संताप गोऱ्हेंनी व्यक्त करताच तुम्ही शांत झालात की मी बोलतो, अशी टिपण्णी केली. त्यावर मी शांतच आहे, आता मी थंड पडायची वेळ आलीय, असे उत्तर गोऱ्हेंनी दिले.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत देशाच्या अन्नधान्य उत्पादनाबाबत माहिती दिली. गेल्या 10 वर्षांत अन्नधान्य उत्पादनात 44% वाढ झाली आहे. देशाचं अन्नधान्य उत्पादन 357 दशलक्ष टन गाठलं. तांदुळ उत्पादनात भारताने चीनला मागे टाकलं असून, डाळींच्या उत्पादनात 19 दशलक्ष टन वरून 26 दशलक्ष टन पर्यंत वाढ झाली आहे. प्रधानमंत्री धनधान्य योजना अंतर्गत 100 जिल्ह्यांमध्ये संतुलीत अन्नधान्य उत्पादनावर भर दिला जात आहे. शेतकऱ्यांना योग्य दरात खतांचा पुरवठा करण्यासाठी 1,86,000 कोटी रुपयांचे अनुदान आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा कार्यक्रम पार पडला आहे. डहाणू इथल्या महालक्ष्मी माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आचार्य महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदजी सरस्वती यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा आणि धार्मिक विधी पार पडले. भारत विकास संगम ट्रस्ट आणि वनबंधु ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सोलापूरमधील नेते शरद कोळी यांनी, एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर जोरदार टीका केली. "उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची ठाण्याच्या नरेश म्हस्केंची औकात नाही. नरेश म्हस्के हा ठाण्याचा दलिंदर आहे, त्याने अशा गोष्टी बोलू नये. उद्धव ठाकरे हे आमदार-खासदार तयार करणारी फॅक्टरी आहे. गद्दारी केल्याने नरेश मस्के खासदार आहेत. अन्यथा त्यांना कुत्रंही विचारलं नसतं. उद्धव ठाकरेंच्या पत्रानेच तुम्ही, शाखाप्रमुख, नगरसेवक झालात," असा घणाघात शरद कोळी यांनी केला.
इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असतानाच, बांगलादेशने भारताकडे डिझेलची मोठी मागणी केली आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनने भारताकडून येणाऱ्या 6 महिन्यांच्या डिझेलचा कोटा अवघ्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याची मागणी केली असून, यामुळे भारताच्या इंधन नियोजनावर ताण येण्याची शक्यता आहे.
'राज्यात नवीन उद्योग आणताना राज्यातील या कारखान्यांकडे मायेच्या नजरेने पाहायला पाहिजे. कारखाने का तोट्यात येतात, कारण एमएसपी ठरवण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे, एमएसपी वाढली पाहिजे. केंद्राने आता इथेनॉल योजना आणली आहे. साखर कारखान्यांनी कर्ज काढलं, कारखाने उभे राहिले, इथेनॉल किती घ्यायचं हेही तेच ठरवातात. आता सरकार म्हणतंय की इथेनॉल हे कारखान्यांकडून 30 टक्के घ्या आणि अन्नधान्यापासून 70 टक्के घ्या,' असे म्हणत साखर कारखान्यांचाही मुद्दा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित केला.
"VSR विमान कंपनीच्या मालक व्ही. के. सिंग याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली, तो काल मॅच बघायला होता. माळी कुटुंबियांना त्यांच्याकडून धमक्या येत होत्या. मी मुख्यमंत्री यांना भेटून माळी कुटुंबियांच्या संरक्षणाबाबत बोलणार आहे. व्ही. के. सिंग यांचे अंडरवल्डशी संबंध आहे, असा संशय आहे," असं खळबळजनक दावा आमदार अमोल मिटकरींनी केला.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपला डावलून जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत शिंदे शिवसेना आणि शिवसेना ठाकरे या दोन्ही गटांनी हातमिळवणी केली आहे. या 'शिवसेना-शिवसेना' युतीमुळे भाजप सत्तेपासून दूर राहिली असून, पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे.
गंगाखेड तालुक्यातील आकोली पंचायत समिती गणमधून निवडून आलेल्या युवा मनोज मुंडे याला भाजपकडून बिनविरोध निवड करत सभापतीपदी विराजमान करण्यात आली आहे. युवा चेहऱ्याला संधी देऊन भाजपने राजकीय भवितव्य ठरवले आहे.
जालना जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा नसून पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याची माहिती गॅस असोसिएशन अध्यक्ष भगवान देशमुख यांनी दिली आहे. आज गॅस असोसिएशन आणि पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर गॅस असोसिएशनच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे. पुढील अडीच दिवस पुरेल एवढा गॅससाठा कायम ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात एकूण 32 गॅस एजन्सी असून दररोज जवळपास 6 हजार 190 घरगुती सिलिंडर लागतात. दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये सध्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तो थोडा नसल्याची माहिती अध्यक्षांनी दिली आहे.
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात युद्धामुळे भारत केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. साखर कारखान्यांचा निर्यात कोटा जवळपास ठप्प झाला आहे. परिणामी स्थानिक बाजारात साखरेचा साठा वाढला असून साखरेचे दरही मोठ्या प्रमाणात घसरलेत काही दिवसांपूर्वी 3 हजार 700 रुपये प्रति क्विंटलने विकली जाणारी साखर आता 3 हजार 200 रुपयांपर्यंत खाली आली आहे. निर्यात थांबणे, बाजारभाव घसरणे आणि साखरेचा वाढलेला साठा या तिहेरी संकटामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केली.
विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण सुरू आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महिला शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी पहिल्यांदाच एकत्रित येत सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर चर्चेला सुरूवात झाली आहे. या प्रस्तावावर दहा तास चर्चा होणार आहे. काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरूवात केली.
अमेरिका इज्राइल व इराणच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाने जळगावमधील लघु व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून व्यावसायिक सिलेंडर न मिळाल्यामुळे अनेक लघु व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 हजार 98 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालंय. बदलापूरच्या नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी 11.76 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. महत्वाचं म्हणजे मालमत्ता करात 50 टक्के सवलत आणि नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेसारख्या महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आलीय.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात सध्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पोलिसांचा वचक संपल्याचे चित्र दिसत आहे. तुमसर बसस्थानकावर एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी भरदिवसा लांबविण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी घटना असूनही पोलिस प्रशासन गाढ झोपेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिटेवानी येथील रहिवासी हिरुबाई पारधी (७०) या खुर्शीपार येथे लग्नासाठी निघाल्या होत्या. तुमसर बसस्थानकावर बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी एका अज्ञात महिलेने त्यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची एकदाणी शिताफीने चोरली. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पळ काढला. पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
इराण आणि इजराइल युद्धजन्य परिस्थितीचा लातूरमध्ये देखील घरगुती गॅस यांना फटका बसलाय, अनेक कंपनीच्या गॅस एजन्सीवर गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय, तर हॉटेल व्यवसायिकांसाठी वापरात येणाऱ्या कमर्शियल गॅस देखील वेळेत मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांची ओरड आहेत, गॅस एजन्सी कार्यालय बंद करण्याची वेळ एजन्सी मालकांवर आली आहे. तर सकाळपासून नागरिकांनी एजन्सी बाहेर रांगा लावल्या आहेत. ऑनलाइन बुकिंग देखील बंद झाल्याची माहिती नागरिक देत आहेत.
पुण्यात गोरक्षकांच्या नावाखाली एका ट्रक चालक तरुणाला अमानुष मारहाण करून त्याला चक्क शेण खाऊ घातल्याचा आरोप झाला असून तसेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत आंबेगाव पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिव्यांग व्यक्तींना रोजगारासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय घेतला असून दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी १५ हजार रुपये मिळणार आहेत. याबाबत दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी माहिती असून स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य मिळणार आहे. तर दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून डीबीटीद्वारे थेट खात्यावर हा निधी जमा होणार आहे.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम हा देशातील हॉटेल व्यवसायावर होताना दिसत असून गॅस एजन्सी ना मिळणारा व्यवसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर आला आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांच्या सिलेंडरचा पुरवठ्यावर मर्यादा येताना दिसत आहेत. रत्नागिरी शहरातील हॉटेल व्यवसायिकांच्या गॅस सिलेंडर पुरवठा निम्म्यावर आला असून शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यवसायिक सिलेंडरचा कोटा दिला जात आहे. दरम्यान दिवसाला 600 ते 700 व्यवसायिक गॅस सिलेंडर आवश्यक असताना ते जेमतेम 60 ते 70 आल्याने शहरातल्या हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इराण-इस्रायल-युद्धाचा परिणाम आता भारतातील हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे. या संघर्षामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईतील जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती आहार या संघटनेने दिली आहे.
पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मधील एका पोलिस उपनिरीक्षकाने 2 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने कारवाई केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या त्याच्यावर आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.