

भाजपचे नेते किरीट सोमय्या मंगळवारी (ता.24 ) मालेगावात आले होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सोमय्यांमुळे मालेगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पत्रकारांनी सोमय्यांना घेरलं आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने त्यांच्या बॉडीगार्डची पत्रकारांशी बाचाबाची झाली,तसेच धक्काबुक्कीही केली. त्यामुळे वातावरण आणखीच तापलं होतं.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यात मोठा डाव टाकल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेत देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. याचवेळी राहुरीतील विविध पक्षाच्या नेत्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
ठाणे महापालिकामध्ये महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते जाहीर झाल्यानंतर आता 5 मार्च रोजी स्थायी समिती सदस्यांसह विविध समित्यांच्या निवडी एकाच दिवशी होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचे कोडे सुटल्यानंतर सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेता देखील जाहीर करण्यात आले आहेत. परंतु आता येत्या 5 मार्च रोजी स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसह, स्विकृत नगरसेवक, शिक्षण, परिवहन, विषय समित्या, प्रभाग समिती आदींमधील सदस्यांची निवड देखील एकाच दिवशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईत भाजपने ज्या पध्दतीने परिवहनमध्ये आपल्याच पक्षातील सदस्यांची निवड केली. त्याप्रकारे परिस्थिती ठाण्यात शिंदे सेनेकडून निर्माण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
नाशिकच्या स्थायी समिती सभापती पदासाठी अजित दादांची राष्ट्रवादीदेखील आग्रही
नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स कायम आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून नोंदणी केलेले अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांची माघार नाही.
सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवडणूक लढण्यावर मुकेश शहाणे ठाम
सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा घेतल्यानंतरच निर्णय होणार
भाजपाच्या बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांवर पाणी
राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे.
लाडकी बहीण योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
विधीमंडळात विरोधकांना एकत्र बसण्याची जागाच कुठे उपलब्ध करून दिलेली नाही. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. विरोधी पक्षाच्या लोकांना एकत्र जेवण्यासाठी जागा नाही. सर्व आमदार एकत्र जेवायला बसतात. घरून आणलेला डबा एकत्र वाटून खातात, अशी परिस्थिती गेली पन्नास वर्षे होती. पहिल्यांदा असं झालं आहे की, काँग्रेस पक्ष सत्तेत नाही आणि जेवायलासुद्धा जागा उपलब्ध नाही, हे दुर्दैवी आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे हा त्याच्या गावात येऊन जातो, ही माहिती अंजली दमानिया यांना मिळते आणि पोलिसांनी ती मिळत नाही, हे दुर्दैवी आहे, असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या पोलिसांना लगावला. कृष्णा आंधळे न सापडणे हे पोलिसांचे अपयश आहे, असेही आव्हाडांनी म्हटले आहे.
अजितदादांसारखे थोर नेते फार कमी होतात, पुढच्या पिढीला या नेत्याबाबत आणि या नेत्याने महाराष्ट्राची जी सेवा केलेली आहे, त्यांनी ज्या पद्धतीने आपले राजकीय जीवन जगलेले आहे, त्याची जाणीव ठेवण्यासाठी अजितदादांचं स्मृतिस्थान विधीमंडळाच्या आवारात होणं आवश्यक आहे, असं मला वाटतं, त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री, गटनेते आणि बोर्डासमोर हा प्रस्ताव ठेवून योग्य निर्णय घेईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
अकोल्यातील काँग्रेस आमदार साजीद खान पठाण यांना बिश्णोई गॅंगकडून दहा कोटी रुपये दे; नाही तर तुझे हाल बाबा सिद्धीकी यांच्या प्रमाणे करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे.
संभाजीनगरच्या जठवाडा भागातील जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी अर्ज आलेला आहे. तो अर्ज जावेद रसूल शेख यांनी केलेला आहे. त्याला जमिनीच्या मूळ मालकांनी हिबानामा करून दिलेला आहे. त्याच्या आधार कार्डवर जन्मतारीख ही १९८५ आहे आणि हिबानामा १९७१ मध्ये झाला आहे. या जमिनीचा मोबदला ११५० कोटी रुपये इतका आहे. १९८५ मध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा १९७१ मध्ये होईल का. पण त्या मोबदल्याचा प्रस्ताव महसूल विभागाने बनवलेला आहे.
याच जावेदच्या नावावर सहा महिन्यांपूर्वी झालेला एक हिबानामा पुढे आला होता. संभाजीनगर ते कारिडा कॉर्नरच्या जवळपास दीड-दोनशे कोटींची जमीन होती, तो संदीपान भूमरेंचा चालक असल्याचे समोर आले होते. मात्र, त्या वेळी भूमरेंनी माझा त्याच्याशी संबंध नाही, असे सांगून हात वर केले होते. मग या प्रकरणामागचा बोलविता धनी कोण, असा माझा प्रश्न आहे, असे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारले आहे.
सेवा तीर्थ येथे झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वेच्या तीन मोठ्या विकास योजनांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांसाठी तब्बल 12,236 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रेल्वे सुविधा अधिक सक्षम होणार असून प्रवाशांना चांगली सेवा मिळणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेला वेग आणि सुरक्षितता मिळणार आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीतील विश्रामबाग परिसरातील काही दुकाने व अतिक्रमणांवर अल्प मुदतीची नोटीस देत कारवाई केल्यामुळे व्यापाऱ्यांत नाराजी पसरली आहे. केवळ 24 तासांची नोटीस देऊन दुकाने हटवल्याचा आरोप करत नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला.
पुण्यात वाढत्या धूळ आणि धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. आरएमसी प्लांट आणि बांधकामांमधून उडणारी धूळ परिसरात पसरत आहे. रस्त्यावर मिक्सर, टिप्पर आणि डंपर यांसारख्या मोठ्या वाहनांची सतत ये-जा होत असल्याने प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होत असून काहींना घरातच राहावे लागत आहे.
सिन्नर येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे हिंदू संघटनांनी नाशिक-पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार आणि पोलिसांनी आठवडाभरात मुलगी व संशयिताला ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रस्ता रोको थांबल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातल्या 7 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे, त्यातील 6 जागा महायुतीकडे असून 1 जागा राष्ट्रवादीकडे येईल.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77 हजार कोटी रुपयांची थकबाकी अद्याप कायम आहे. कंत्राटदरांच्या आक्रमक पवित्र्यानंतर थकबाकीतील काही रक्कम देण्याचे सरकारने जाहीर केले. मात्र वर्षाभरात केवळ 10 टक्केच रक्कम अदा झाली आहे. तर काही विभागातील थकबाकीसाठी शासनाने चेक दिलेत मात्र ट्रेजरीकडे पैसेच नसल्याने हे चेक वटत नसल्याचा आरोप राज्य कंत्राटदार महासंघाने केला. मागील वर्षापर्यंत कंत्राटदरांचे जवळपास 89 हजार कोटींचे देयके प्रलंबित होती. शासनाच्या या भूमिकेविरोधात 9 मार्च रोजी शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांची बैठक आयोजित केल्याची माहिती राज्य शासकीय अभियंता आणि कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कार्यरत लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी 16 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाकडून अद्यापही या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील 400 लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनामुळे गडचिरोली जिल्हा परिषदसह पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय कामकाज पूर्णता ठप्प पडले आहे. प्रशासनाचा आधारस्तंभ असलेल्या लिपिक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह आदी मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या बनावट जन्म दाखला, बांगलादेशी, रोहिंगेप्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिकच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत. किरीट सोमय्या यांच्या हातात कागदपत्रांची फाईल आहे. अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांची भेट घेताना, किरीट सोमय्या यांच्याबरोबर भाजपचे स्थानिक पदाधिकारी होते.
भारतीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आण निफ्टी 50 मध्ये मोठी घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला तर, निफ्टी 50 निर्देशांक 25500 च्या खाली आला होता. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरले. भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात झालेल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 469 लाख कोटींवरुन 465 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच अवघ्या तासाभरात गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले.
भाजपकडून राज्यसभेचे आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठकीत आज 4 उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित आहे. तर इतर तीन उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नंदुरबारमधील शहादा पंचायत समितीचा कर्मचारी 2 लाख 50 हजारांची लाच घेताना पकडले आहे. शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ सहायक अभिजित भावसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. कामाचा अहवाल बाजूने पाठवण्यासाठी ही लाच मागितील. शहादा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7, 7(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण अधिकाऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिशा बैठकीत धारेवर धरलं आहे. कार्यक्रमाला बोलावत नसल्याने केंद्रीय राज्यमंत्री यांचा संताप झाला. 'तुम्ही आम्हाला कमी समजू नका. एक पत्र द्यायची बोली आहे. तुम्हाला हे महागात पडेल,' अशा कडक शब्दात मंत्री रक्षा खडसे यांनी सुनावलं. केंद्राच्या निधीवर योजना करताना, उलट आमदारांना महत्त्व दिले जाते. खासदारांना कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत नाही, असा संताप रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
चोरांनी पूर्ण एटीएम मशीनच पळवण्याचा प्रकार केला. नांदेड शहरातील एसबीआय बँकेचे अख्खे एटीएम मशीनच चोरांनी पळवले. या एटीएम मशीनच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नव्हता. एटीएम मशीन पळवल्याची बाब आज सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिस आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यापूर्वीही नांदेड जिल्ह्यात अशाप्रकारे संपूर्ण एटीएम मशीन पळवण्याच्या तीन घटना झाल्या आहेत.
चंद्रपूर महापालिकेतील ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. दुपारी 12 वाजता ते उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार आहेत. चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणूक ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी वाढली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव-कोळगाव रोडवर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर, एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ट्रक अन् कारची समोरा-समोर धडक झाली. मृतांमध्ये चालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. नितीन कोकाटे (कारचालक), गजानन पायघन, ध्रुपता पायघन, वैभव पायघन, अशी मयत व्यक्तींची नावे असून, करण पायघन या तेरा वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी - अतुल काळसेकर,भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा अध्यक्षपद कृष्णराज महाडिक यांच्याकडे देण्यात आलंय. तर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष या चित्रा वाघ असणार आहेत.
कर्तृत्ववान, शिस्तप्रिय असलेल्या अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक संपूर्ण क्षमता, दृढनिश्चय आणि प्रामाणिकता होती. त्यांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला मात्र तो आता आपल्यामध्ये नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या, ते विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बोलत होते.
Maharashtra Budget LIVE : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात अजित पवारांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला. यावेळी अनेक नेत्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. तर आजपासून सभागृहात प्रश्नोत्तरे आणि तारांकित प्रश्नानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एका ‘मेडीकल चार्टर्ड’ विमानाला झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसारिया भागात भीषण अपघात झाला आहे. या विमानात एका रुग्णासह एकूण सात जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून हे विमान दिल्लीतील रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे होते. तर या विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.