Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Political Breaking Live Marathi Headlines Updates : मंगळवार (ता.31) राज्य, देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठीमधील ब्रेकिंग, महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Live Update 2
Live Update 2Sarkarnama
Published on
Updated on

सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; पाऊण तास झाली चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. मुंबईत देवगिरी बंगल्यावर या दोन नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. पण या भेटीमागचा अजेंडा नेमका काय होता? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘फ्रुटवाला नर्गिस’ ४ लाखांचा कॅमेरा ओला कॅबमध्ये विसरली! मनसेनं २४ तासात शोधून दिला 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘फ्रुटवाला नर्गिस’चा ४ लाखांचा कॅमेरा ओला कॅबमध्ये गहाळ झाला होता. हा कॅमेरा मनसेनं २४ तासात शोधून दिला आहे. कॅमेरा परत देण्यास कॅब चालकाने नकार दिल्याचा आरोप नर्गिसनं केला होता. तक्रारीसाठी चेंबूर, MIDC आणि RCF पोलिस ठाण्यांचे उंबरठेही तिनं झिजवलं. पण पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही तिनं केला. त्यानंतर मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार नर्गिसनं मनसेकडं मदत मागितली. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी सक्रिय झाले. मनसे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी नवी मुंबईतून कॅब चालकाचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी चालकाच्या घराची झडती घेऊन कॅमेरा ताब्यात घेतला. अशा प्रकारे २४ तासांत मौल्यवान कॅमेरा परत मिळाल्याने नर्गिसनं मनसेचे आभार मानले आहेत.

सांगलीच्या दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडीआधीच राजकारण चांगलच तापलं

सांगलीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीनंतर आता विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडी होत आहेत. पण त्याआधीच सांगलीतलं राजकारण चांगलच तापलं असून भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. जयंत पाटील यांना लक्ष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी, जयंत पाटील जिथे जिथे शक्य आहे, तिथे बिब्बा टाकायचं काम करतात असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर केला आहे.

मोठी बातमी! भोंदू अशोक खरातच्या घरातून १ जण ताब्यात

 राज्यात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण आले आहे. शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत खरातसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी तपास पथके नाशिकसह पुण्याकडे रवाना झाला आहे. दरम्यान अटकेची कुणकुण लागताच कल्पना खरात फरार झाल्या आहेत. मात्र नाशिक येथील घरातून एकाला तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. तर ही व्यक्ती अशोक खरातचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे.

अशोक चव्हाणांचा प्रभाव असलेल्या नांदेडमध्ये शिवसेनेला बुस्टर?

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महत्वाची घडामोड घडली. शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या हातून धनुष्यबाण स्वीकारला. लोहा येथील शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वला धक्का देण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असल्याची चर्चा होत आहे.

गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही : मंत्री चंद्रकांत पाटील

गोकुळच्या निवडणुकीवरून राजकारण तापले असून काँग्रेस नेते सतेज पाटील यांना घेरलं जात आहे. दरम्यान आता भाजपला वगळून गोकुळचं राजकारण होणार नाही, गोकुळच्या निवडणुकीवर आम्ही महायुती म्हणून निर्णय घेऊ असे वक्तव्य भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना इशारा असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील स्वतः जमीन खरेदी केली होती मात्र आमदारकी धोक्यात येणार, म्हणून त्यांनी तातडीने ती परत केली

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप असून या प्रकरणात जळगावातील बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर त्यांनी सास्ताधाऱ्यांना जिल्ह्यात एकनाथ खडसे हा एकमेव विरोधक असल्याने मला अडकवण्यासाठी कट कारस्थान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील स्वतः जमीन खरेदी केली होती, मात्र आमदारकी धोक्यात येणार म्हणून त्यांनी तातडीने ती परत केली, असाही गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.

उल्हासनगच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटर बंद, गोरगरीब रुग्णांचे हाल

उल्हासनगच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटर हे गेले आठ ते दहा दिवसापासून बंद असल्याने गोरगरीब रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे यांना जाब विचारला. तसेच रुग्णालय प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर...

साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस गाठला गेला आहे. रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाली असून एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे आता जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.

हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीमध्ये आणला ट्विस्ट

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षासह अन्य काही पक्ष आग्रही आहेत. असं असताना ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही असा पवित्रा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे. तर त्यांनी या निवडणुकीत उतरवण्याबाबत सुतवाच करताना अनेक राष्ट्रीय पक्ष आमच्या संपर्कात आहेत. यामध्ये आप, बसप आणि काँग्रेस सारखे पक्ष असल्याचे म्हटले आहे

लातूर जिल्हा परिषदेत सभापती पदांसाठी भाजप-राष्ट्रवादीचा ‘फिफ्टी फिफ्टी’ फॉर्म्युला कायम

लातूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांनंतर आता विषय समिती सभापती पदांमध्येही दोन्ही पक्षांनी समान वाटा ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रमुख नेत्यांच्या एकमतामुळे पदवाटप सुरळीत झाले असून निवडणुकीत कोणताही वाद निर्माण झाला नाही.

पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून अलर्ट जारी!

पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवन्यात आली आहे. काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता असून नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा वाद; मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोवरून टीका

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. विविध राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचे आरोप समोर येत असून सोशल मीडियावर काही फोटोही व्हायरल होत आहेत. यात मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचा फोटो समोर आल्यानंतर ओबीसी आंदोलनाचे लक्ष्मण हाके यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

Shivsena News : शिवसेनेचे संपर्कप्रमुख जाहीर, मराठवाड्यात संदीपान भुमरे, भास्कर आंबेकर यांच्यावरही जबाबदारी!

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील भेटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आॅपरेशन टायगर राबवले जाणार असल्याचे सांगीतले जात आहे. तर दुसरीकडे शिंदेंनी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुख जाहीर केले आहेत. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, जालन्याचे भास्कर आंबेकर, आनंदराव जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Leander Paes joins BJP : लिएंडर पेस यांचा भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे. माजी टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Ashok Kharat Case : खरातवर वनविभागही कारवाई करणार

भोंदूबाबा अशोक खरातवर राज्याच्या वन विभागाकडूनही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अघोरी पुजेसाठी त्याने वन्य प्राण्यांची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे. याअनुषंगाने वन विभागाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. तसे पत्र एसआयटीला दिल्याचे समजते.

Ashok Kharat Case : खरातच्या लेकीला फ्लॅट गिफ्ट, साळुंखेंनी आरोप फेटाळले

अशोक खरातच्या लेकीला भाजप नेते दीपक साळुंखे यांनी ३२ लाखांचा फ्लॅट गिफ्ट दिल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. हे आरोप साळुंखे यांनी फेटाळले आहेत.

Gokul Election : बिनविरोधसाठी महायुतीनं एकत्र बसावं

कोल्हापुरातील गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हायची असेल तर महायुतीनं एकत्र बसावं, असं त्यांनी म्हटले आहे.

PM Modi Gujarat Visit: पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. साणंद येथील एका सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. 20 हजार कोटी रुपयापेक्षा अधिक विविध विकासकामाचे भूमीपूजन मोदीं यांच्या हस्ते होणार आहे.

Nashik: नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय, १२ नवीन घाट उभारणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता गोदावरी नदीकाठी १२ नवीन घाट उभारण्यात येणार आहेत.

Nanded : नांदेडमधील तलवार बाबाला बेड्या

हातात तलावार घेऊन भोंदूगिरी करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील तलवार बाबाला पोलिसांनी अटक केली आहे.

शिर्डीतील 4 एकर जमीन खरेदी प्रकरण, अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Jalna Politics : खोतकर यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; कैलास गोरंट्याल यांना धक्का

2024 च्या विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवडीस आव्हान देणारी कैलास गोरंट्याल यांची निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकर 1 लाख 4 हजार मते मिळवून विजय झाले होते या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा 31 हजार मतांनी पराभव केला होता. आमदार अर्जुन खोतकर हे बाजार समितीत प्रशासक पदावर असून त्यांनी लाभाचे पद धारण केले आहे. याशिवाय त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेले शपथपत्र विहित नमुन्यात नव्हते, असा आक्षेप घेत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने पुण्याच्या भक्ताला गंडवलं; आऊट डोअर व्हिजिटसाठी 5 लाख शुल्क...

पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने श्रीमंत भक्त अशोक खरात याने याचदिवशी आपल्यासोबत यावे, यासाठी आग्रही असत. या सगळ्यांपैकी जो जास्त पैसे देईल, त्याच्यासोबत अशोक खरात जात असल्याची माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आली आहे. पुण्यातील अशाच एका करोडपती भक्ताला अशोक खरात याने पूजा करण्यासाठी गाडी हवी, असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती. ही कार अशोक खरात याने स्वत:च्या नावावर करुन घेतल्याचं समोर येत आहे. व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्म हाऊस अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छूक असत. अशा एका आऊट डोअर व्हिजिटसाठी अशोक खरात हा तब्बल 5 लाख रुपये घेत असल्याचं समोर आलं आहे.

Nishikant Dubey : भाजप खासदार दुबे यांना नाशिक न्यायालयात हजर राहण्याचा आदेश; नेमकं काय आहे प्रकरण...

मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने खासदार दुबे यांना येत्या 7 एप्रिलला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काही काळापूर्वी खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांविषयी बोलताना प्रक्षोभक विधान केले होते. "मराठी माणसाला पटक-पटक के मारेंगे", असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.

Ashok Kharat Case Impact : अशोक खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांवर नागरिकांचा रोष; बुवाबाजीविरोधात संताप उफाळला

विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर बाबांविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या साधूंवरील विश्वास आता पूर्णपणे ढासळला असून नागरिक अधिक सतर्क झाले आहेत. काही तथाकथित महाराजांनी आपली दुकाने बंद केली आहेत. तर काही ठिकाणी भगवे कपडे घालून भोंदूगिरी करणाऱ्यांवर नागरिकांनी थेट लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. पाईट-सावंतवाडी परिसरात एका महिलेची पाच हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या फिरस्त्या बाबाला स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून अशा भोंदूबाबांना दिसताच क्षणी चोप दिला आहे.

Narhari Zirwal : मंत्री झिरवळ व्हायरल व्हिडिओप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल; ट्रान्सजेंडरच्या भावविरोधात तक्रार

राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता मुंबईतील कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडरच्या भावविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न व औषध प्रशासनात नोकरी लावून देण्याची मागणी करत, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून तो 'एडिट' करून किंवा त्यात छेडछाड करून व्हायरल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

Rahuri By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएम सरमिसळ पूर्ण

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची प्रथम सरमिसळ प्रक्रिया आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा टप्पा पूर्ण करण्यात आला. प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेल्या मशीनचे प्रत्यक्ष वाटप करण्यासाठी ही सरमिसळ केली जाते. भारत निवडणूक आयोगाच्या प्रणालीद्वारे विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली. यानंतर राहुरी मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मशीनच्या याद्या जिल्हा मुख्यालयात सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दिल्या जातील.

Tushar Gandhi : मुंबई विद्यापीठात प्रवेशास तुषार गांधी यांना मज्जाव

चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमेय आनंदराज यांना कलिना संकुलामध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनाही प्रवेशास मज्जाव केल्याचं समोर आलं आहे. तुषार गांधी हे बौद्ध भिक्षू भदंत विमांसा यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठात आले होते.

Naxalism : नक्षलवाद मुक्तीवरील भूमिकेचं पंतप्रधान मोदींकडून अमित शाह यांचं कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडलेली नक्षलवाद मुक्तीवरील भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक संदर्भांसह आणि गेल्या दशकातील सरकारच्या प्रयत्नांनी परिपूर्ण असल्याचे कौतुक केले. पंतप्रधानांनी सांगितले की, "अनेक दशकांपासून प्रतिगामी नक्षलवादी विचारसरणीने विविध प्रदेशांच्या विकासावर विपरीत परिणाम केला आहे आणि असंख्य तरुणांचे भविष्य नष्ट झाले आहे. रालोआ सरकारने नक्षलवादाची समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी काम केले आहे आणि नक्षलवाद प्रभावित भागात विकास पोहोचवण्याची खात्री केली आहे." सरकार सुशासन, शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत राहणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.

Global Economy Shadow : इराण-इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे जगाला आर्थिक मंदीचा फटका; IMFने जगाला केलं सावध

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'ने (IMF) सोमवारी जगाला सावध केलं आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून, नुकत्याच सावरू लागलेल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडल्या आहेत. आयएमएफच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. हे युद्ध जागतिक स्तरावर एक 'विषम धक्का' निर्माण करत असून, यामुळे आर्थिक आव्हाने वाढली आहेत, असे म्हटलं आहे.

Fertilizers Shortage : युद्धामुळे भारतातील खरिप हंगामासाठी खत तुटवड्याची भीती

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे भारतात युरिया खताची व खत निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची आयात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात युरियाचा तुटवडा होण्याची भीती आहे. खत टंचाईमुळे केंद्र व राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आहे. दरवर्षी भारतात 600 ते 700 लाख टन रासायनिक खतांची गरज भासते.

Census 2027 : देशव्यापी जनगणना उद्या एक एप्रिलपासून सुरू होणार

तब्बल 15 वर्षानंतर देशव्यापी नव्या जनगणनेची प्रक्रिया एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये जनगणना झाली होती. देशाच्या विविध धोरणनिर्मितीसाठी जनगणना-2027 अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com