
पश्चिम बंगालमधील निकालानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांनी फोन केल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष सोबत असल्याचे या सर्व नेत्यांनी सांगितल्याचे बॅनर्जी यांनी नमूद केले आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा भोर वकिल संघटनेने ठराव केला आहे, त्याला संघटनेच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. ही बाब पुणे जिल्हा बार असोसिएशनला कळविण्यात आली आहे. या निर्णयात पुणे जिल्हा बार असोसिएशनही सहभागी झाले आहे, असे भोर बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रेय उरूणकर यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्यात आल्याने कोल्हापूरमध्ये राजकारण रंगले आहे. हा निर्णय भाजपसाठी सोयीचा असल्याचे सांगण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी अडचणीचा मानला जात आहे. यावर हसन मुश्रीफांनी बोलताना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे उत्तर दिले आहे.
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज झाली. त्या बैठकीत अजितदादा पवार यांचं स्मारक मुंबईत उभारण्यात यावं, अशी चर्चा झाली. अजितदादांच्या स्मारकासाठी समिती बनवावी, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली.
लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल देण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाला दिले आहेत. हे आरोप पॅरोलच्या काळात पुन्हा तसेच गुन्हे करतात, त्यामुळे २०१४ ते २०१९ मध्ये लैगिंक अत्याचारातील आरोपींना पॅरोल देऊ नये, असा कायदा करण्यात आला हेाता. मात्र, तो न्यायालयाने रद्द केला होता. आता तसाच कायदा करण्याचे निर्देश फडणवीसांनी विधि आणि न्याय विभागाला दिले आहेत.
जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे भुसावळच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द झाली आहे. जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत गायत्री भंगाळे यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकरे यांचा पराभव करून विजय मिळविला होता.
हिंदुत्वविरोधी भूमिका घेऊन ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगालमध्ये जे झाले आहे, तेच खासदार संजय राऊत यांच्या कृतीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होईल, अशी परिस्थिती आहे. तसे भविष्य मला दिसत आहे, असा दावा शिवसेनेचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण आता मुक्त असून इंडिया आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच बंगालमध्ये आपला पराभव झाला नाही, भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळविला, असा आरोपही त्यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपने केंद्रीय निरीक्षक म्हणून गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती केली आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये अलीकडील राजकीय बदलांनंतर एक महत्त्वाची घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १५ वर्षांपासून बंद असलेले एक मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
पुण्यात लाच प्रकरणामुळे दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. एपीआय वैशाली तोटेवार आणि पीएसआय मनोज बरुरे यांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर निलंबित करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सलग कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
नरसापूर प्रकरणात आरोपी कांबळेच्या पत्नीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. “फाशी नको, नराधमाला ठेचून मारा,” अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे.
'नराधमाला फाशी मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही' ज्योती वाघमारे यांचा ठाम निर्धार देशातील प्रत्येक मुलींनी सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. जो नराधम साडे तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो त्याला राहण्याचा अधिकार नाही. त्याला फासावरच लटकला पाहिजे. मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून एसीमध्ये बसून प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आमदार,खासदार असण्यापेक्षा सोलापूरची लेक आहे. सोलापूरच्या लेकीसाठी न्याय मागताना माजी खासदारकी आडवी येणार नाही. कारण हा संघर्ष करतच मी पुढे आली आहे. त्या महिलांचा आक्रोश आहे की त्या नराधमाला खेचून मारला पाहिजे,भर चौकात फाशी दिली पाहिजे आम्ही त्यांच्या भावनाशी सहमत आहोत.
नसरापूर प्रकरणात आरोपी कांबळेच्या पत्नीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. “फाशी नको, नराधमाला ठेचून मारा,” अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे.
Pune मध्ये नागरिकांकडून एका कलाकृतीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून सांस्कृतिक वारशाच्या जतनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नसरापूर प्रकरणात आज सरकारी वकीलांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सरकारी वकील नियुक्त झाल्यानंतर पुढील सुनावणीत महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
कर्जतचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला राजकीय वाद अखेर संपुष्टात आलाय. खुद्द आमदार महेंद्र थोरवे यांनीच याचे सुतोवाच केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीत तटकरेंनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप थोरवे यांनी वारंवार केला होता. तर तटकरेंनीही थोरवेंच्या विरोधात सुधाकर घारेंना बळ दिले होतं. मात्र, आता हे दोन्ही नेते एकत्र काम करणार असून, रायगडच्या राजकारणात ही मोठी उलथापालथ मानली जात आहे.
धाराशिवमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेल तुटवडा झाला आहे. या मुळे पेट्रोल डिझेल पंप बंद आहेत. तर जिथं इंधन उपलब्ध आहे, त्या पंपावर नागरिकांची मोठी गर्दी आहे. डिझेल नसल्याने शेतकऱ्यांनी पंपावरच ट्रॅक्टर लावले आहे. इंधन तुटवड्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून, तर सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.
नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विविध विषयांवरून दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली. सभेत एकूण 16 विषय मांडण्यात आले होते. मात्र, विरोधकांकडून सर्वच विषयांना विरोध करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा करत पेढे वाटले, यांच्यासाठी इलेक्शनपासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शनने समाप्त होतो. पुण्यातील नसरापूर दुर्घटनेची जाण ठेऊन जल्लोष साजरा केला नसता, तर तुम्हाला माणुसकीची जाण आहे, असं वाटलं असतं. मुख्यमंत्र्यांना गृह खात सांभाळता येत नसेल, तर दुसऱ्या कोणाला तरी द्यावं खाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यात माणुसकी राहिली नसल्याने, त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, असा घणाघात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावणारी टोळी सक्रिय झाली असून, या अगोदर ही ग्रामीण भागातील अनेक तरुणांची फसवणूक या बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने केली आहे. मात्र असाच प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला आहे. एका युवकाची बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. एकाच मुलीचे अगोदर आठ जणांबरोबर लग्न लावण्यात आले. मात्र पैशासाठी पुन्हा उमापूर इथल्या नवव्या नवरदेवासोबत एजंट लग्न लावून दिले आणि लाखो रुपयांची फसवणूक केली.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी इथं अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जनगणना 2027च्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अर्ज फेक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अर्ज बनावट आणि अनधिकृत असून, बँक डिटेल्स जनगणनेत कुठेच भरले जात नाही. त्यामुळे हा फॉर्म फेक आहे. नागरिकांनी सावध राहावे, असे वाशिमच्या जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे.
नसरापूरमधील पीडितेच्या उत्तरीय तपासणीचा अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुलीच्या तोंडात मोजा कोंबला होता. छातीवर मारहाणीचे वळ उमटले होते. यानंतर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला, असे अहवालात म्हटलं आहे.
आपल्या झाडाचे आंबे तोडले म्हणून एका दाम्पत्याने 15 वर्षीय मुलाला अमानुषपणे बेदम मारहाण केली. ही घटना बदलापूरमध्ये घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील तुळशीराम बंगल्याजवळ सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. खाऊ आणायला जाते असे सांगून गेलेली आई आपल्या तीन लहान मुलांना रस्त्यावरच सोडून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या तीन मुलांमध्ये एक मुलगा आणि दोन मुली असून त्यांचे वय साधारणतः 4 ते 5 वर्षांच्या दरम्यान आहे. एका स्थानिक महिलेने शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जयश्री यादव यांना याबाबत माहिती दिली.
पाच राज्याचा निकाल नुकताच लागला आहे. यात काँग्रेसच्या अपयशावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ९९ पराभवांचा टप्पा पार करून “शतकाच्या उंबरठ्यावर” पोहोचलेल्या राहुल गांधी यांचे खास अभिनंदन! आता फक्त एका पराभवाची गरज!… आणि, इतिहास रचला जाईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘विजय नव्हे पराजय!…’
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 5, 2026
राहुल गांधी शतकाच्या उंबरठ्यावर!!
९९ पराभवांचा टप्पा पार करून “शतकाच्या उंबरठ्यावर” पोहोचलेल्या राहुल गांधी यांचे खास अभिनंदन! आता फक्त एका पराभवाची गरज!
… आणि, इतिहास रचला जाईल.
लोकसभा असो किंवा विधानसभा, काँग्रेसला पराभवाच्या मार्गावर नेण्याचं… pic.twitter.com/etSkIi8ijF
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.