

भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे अमरावती जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीबाबत राणा यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपचे आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण पोटे आणि जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांना थेट इशारा दिला. "भाजपमध्ये लुडबूड केली तर चोख प्रत्यूत्तर देऊ," असा सज्जड दम भाजप नेत्यांनी भरला.
नंदुरबार शहरात मुलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी २२ वर्षीय युवकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलची तपासणी करताना त्यामध्ये २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी चेतन कोळी (वय २२, रा. नंदुरबार) याच्याविरोधात पालकांच्या तक्रारी आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी कारवाई केली. प्राथमिक तपासात आरोपी मुलांना छोट्या-मोठ्या कामांसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांना एकांतात नेत असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांचा आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मी राजकारणासाठी नाही, तर माझ्या गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागतो; ही माझी जुनीच भूमिका असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढणाऱ्यांसाठी माझं समर्थन कधीच नसल्याचे मोठे वक्तव्य देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते धाराशिवमध्ये बोलत होते.
अहिल्यानगर : भोंदू अशोक खरातसह समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी राहता न्यायालयाने सुनावली. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडली आहेत. या खात्यावरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून शिर्डी पोलीसांच्या कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली होती. राहाता कोर्टाने खरातसह पतसंस्थेचा व्यवस्थापक मिलिंद बनकर याला सुनावली चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज देशमुखच होते पण तेव्हा त्यांचे तिकीट कापायचं काम मीच केलं, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर अमरावतीत भाजपने तडकाफडकी पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे. आमच्या पार्टीचा तिकीट कापण्याचा विषय वरिष्ठ भाजप ठरवतात. आमच्या पार्टीच्या बद्दल कोणी बोलू नये, आमच्या पार्टी बद्दल कोणी बोलत असेल तर सर्व आम्ही एकत्र येणार, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राजेश वानखडे यांनी दिली आहे.
कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा दिला आहे. कुठल्याही शेतकऱ्याला नवीन कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे आमदार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यावर तटकरे यांनी प्रशांत किशोर यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती केल्याची माहिती मला नाही. मला माहिती नाही म्हणजे ते सल्लागार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. मला रणनीतीकारांची गरज नाही, असेही ते म्हणाले आहेत.
टीईटी पेपरफुटी, शालार्थ आयडी घोटाळा आणि राज्यातील बंद पडणाऱ्या सरकारी शाळांच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये एनएसयूआयने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
यावेळी एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध घोटाळ्यांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत, दादा भुसे, हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा केल्याची टीकाही त्यांनी केली.
शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहारांवर तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही एनएसयूआयच्या वतीने देण्यात आला.
वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील विविध महत्त्वाच्या विकासकामांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला. यावेळी ऐरोली नाट्यगृह, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, ऐरोली–काटई पूल तसेच खारघर–तुर्भे लिंक रोड आणि प्रस्तावित टनेल प्रकल्पाची पाहणी करण्यात आली.
यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी खारघर–तुर्भे टनेल हा केवळ नवी मुंबईचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ड्रीम प्रोजेक्ट ठरणार असल्याचे सांगितले. या टनेलमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, प्रवासाचा वेळ व ताण कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पुढील दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गतचा पहिला हप्ता राज्य सरकारने आज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे. पहिल्या हप्त्यामध्ये तब्बल ५ हजार २९ कोटी रुपये सुमारे ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भाजप नेत्यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात अटक करण्यात आलेले भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना नंदुरबार न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने दाखल केलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने विजय चौधरी यांना संभाजीनगरहून धुळ्याकडे जात असताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज त्यांना नंदुरबार जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
तपासासाठी विजय चौधरी यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयात केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने विजय चौधरी यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे देवदेवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी भेटी देण्याचे नियोजन आहे. आज त्यांचा मुक्काम तुळजापूर येथे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून अडवलं जात असल्याच्या आरोपावरून अभिजीत दीपके संतापले. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारत नाराजी व्यक्त केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळल्यानंतर दीपके यांनी संबंधित अधिकाऱ्याला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपात अटक झालेल्या नगरसेवक रमेश म्हात्रेसह अन्य आरोपींना मुंबई हायकोर्टाने जामीन दिला आहे. न्यायालयाने आरोपींना महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश दिले असून, आठवड्यातून तीन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांच्या चर्चेला वेग आला आहे. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत पक्षाच्या राज्य नेतृत्वावर चर्चा केल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. पक्षबांधणी, संघटनात्मक रचना आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
शालेय शिक्षण विभागाने २९ जुलैला निर्णयाद्वारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली होती. यामुळे काही महिन्यांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याची आशा शिक्षकांना होती. मात्र त्यावर आता महत्वाची अपडेट समोर येत आहे. शिक्षकांना आशा लागून राहिलेल्या या पदोन्नती आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि सून गिरिजा राऊत कौटुंबिक प्रकरणात ठाणे न्यायालयात अंतिम जामिन अर्जाची सुनावणी प्रलंबित असून आज दुपारी सुनावणी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात होणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात झाला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनरची भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक झाली. या अपघातात फॉर्च्युनरमधील तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अन्य तिघे जण बचावले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. 12 ऑगस्टपर्यंत त्यांचा हा नियोजित दौरा असून या दौऱ्यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी त्यांनी निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे या दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी येत्या १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून देशातील तरुण पिढीला संबोधित करावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार कोणती ठोस पावले उचलत आहे, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. "१५ ऑगस्ट येत आहे. प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतात. यावेळी आमची इच्छा आहे की पंतप्रधान मोदी यांचं हे भाषण जेन-झी आणि युवांसाठी असावं. त्यांनी आपल्या १५ ऑगस्टच्या भाषणातून सांगावं की, ते जेन झीसाठी काय करत आहेत. तसंच जेन-झीच्या भविष्यासाठी सरकारकडून नक्की काय उपाययोजना केल्या जात आहेत, हे स्पष्टपणे सांगावे.", अशी मागणी दीपके यांनी केली आहे.
नाशिकमधील पत्रकार परिषदेतून राज ठाकरेंने यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. नीट परीक्षा पेपरफुटी तसंच जंतरमंतरवरील आंदोलनावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.
तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज देशमुखच होते. पण तेव्हा त्यांचे तिकीट कापायचे कामही मीच केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्यासमोरच आमदार रवी राणा यांनी कबुली दिली. अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे आणि तो बदल रवी राणा करणार आहे. मी जे बोलतो ते नेहमी सत्य होत असते, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे.
सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. खुशी पवन मुंदडा (मूळ रा. नागपूर) यांचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ड्युटी संपल्यानंतर मध्यरात्री नाश्ता मिळतो का हे पाहण्यासाठी त्या सहकारी डॉ. योगेश लढ्ढा यांच्यासोबत मोपेडवरून बाहेर पडल्या होत्या.
समाजमाध्यमांवर रील तयार करण्याच्या हव्यासापोटी एका 19 वर्षीय तरुणीने बेकायदापणे गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक रोड परिसरात उघडकीस आला. गोळीबाराचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाइलमध्ये जतन करून ठेवल्याने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. नाशिक रोड पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेत तिच्यासह कट्टा पुरविणारा संशयित भूषण गोसावी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून ठेवलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. आरोही मल्लेश डेबेकर (वय 6) आणि आराध्या मल्लेश डेबेकर (वय 4) या दोन्ही बहिणी बुधवार रात्री आई-वडिलांसोबत घरात झोपल्या होत्या. याच खोलीत हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून पोत्यामध्ये कीटकनाशक ठेवण्यात आले होते.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'कनेक्टिंग लिंक'च्या बोगद्यात रात्री दीड वाजता झालेल्या भीषण अपघातात पुण्याच्या वाकडमधील युवा नेते तुषार भूमकर यांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी त्यांची फॉर्च्युनर कार महामार्गावरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकली. या भीषण धडकेत तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावले. तुषार भूमकर यांच्या पत्नीने काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली होती.
धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित कृषी निविष्ठा घोटाळ्यात अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेतील अनियमिततेप्रकरणी चौकशी अंती 17 अधिकारी दोषी ठरले असून, त्यापैकी 15 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे.
काॅक्रोच जनता पार्टी या उपहासात्मक आंदोलकांनी नव्या अभियानाची घोषणा केली आहे. सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक या नावाने देशभर अभियान सुरू करणार असल्याचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.