Maharashtra News : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, बिहार मुख्यमंत्रीपद शपथ सोहळा, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

मुंबईतील सर्वात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट! म्हाडाचा मुंबईतील पहिला भव्य टाऊनशिप प्रकल्प गोरेगावमध्ये 

तब्बल 143 एकर जागेवर आधुनिक टाऊनशिप उभारण्याचा आराखडा तयार

230 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना थेट 1,600 चौरस फुटांची घरे मिळणार

केवळ परवडणारी घरे नव्हे, तर आधुनिक आणि सुसज्ज फ्लॅट्स देणार म्हाडा

क्रीडांगणे, सांस्कृतिक केंद्रे, व्यावसायिक हब अशा सर्व सुविधा प्रकल्पात समाविष्ट

मोठ्या एकात्मिक लेआउटमध्ये पुनर्विकासावर भर

SVP नगर, GTB नगर, अभ्युदय नगर, कामाठीपुरा, आदर्श नगर, आराम नगरमध्येही विकास सुरू

C&DA मॉडेल अंतर्गत प्रकल्पाची अंमलबजावणी

प्रकल्पाचे नियंत्रण व मालकी पूर्णपणे म्हाडाकडेच राहणार

खाजगी बिल्डर्सना टक्कर देणारी आलिशान घरे देण्याच्या दिशेने म्हाडाचे पाऊल

मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये मोठा गेमचेंजर ठरण्याची शक्यता

परभणी शहर हादरले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्याच्या घरावर गोळीबार; परिसरात तणावाचे वातावरण

परभणी शहरातील सुजाता नगर भागात गोळीबाराची घटना घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परभणीच्या सुजाता नगर परिसरात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन जण दुचाकीवरून आले आणि त्यापैकी एका व्यक्तीने घरावर तीन राऊंड फायर केले. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

दैवी शक्तीच्या जोरावर अनेक दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा..., संगमनेर तालुक्यातील भोंदू बाबा चर्चेत

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला गडगे महाराज म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीभोवती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असून तो आपला दरबार देखील भरवतोय. दत्तधाम सरकार नावाने या तथाकथित महाराजाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर मंत्रोच्चाराच्या जोरावर कॅन्सर, पॅरेलिसिस, अंधत्व, यासारखे आजार बरे करत असल्याचा दावा तो करताना दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इमारतीवरून पालकमंत्री संजय शिरसाट यांचे वादग्रस्त वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ज्या जागेवर उभी आहे, तो भाग कब्रस्तानचा आहे. इथे मुडदे गाडले जायचे, त्यामुळे महापालिकेला ग्रहण लागले आहे. इथे आत्मे दिसतात, तुम्हाला बेचैन होते. यातून मुक्ती हवी असेल तर महापालिकेची इमारत चांगल्या जागेवर बांधा असे विधान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मस्साजोग सरपंच पदाची निवड बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना अडथळे; 17 तारखेला माघारीची अंतिम मुदत

मस्साजोग सरपंच पदाची निवड बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यामुळे अडथळा निर्माण होत आहे. अश्विनी देशमुख यांच्यासह पाच उमेदवारी अर्ज या पदासाठी दाखल झाले आहेत. येत्या 17 तारखेला माघारीची अंतिम मुदत आहे. तोपर्यंत आणखी काय घडामोडी घडतात? यावर निवडणूक होणार की बिनविरोध? याचा फैसला होणार आहे. तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीवनी देशमुख आणि स्वरुपानंद देशमुख यांनी माघार न घेण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

राष्ट्रवादीच्या संजीवनी देशमुख निवडणूक लढण्यावर ठाम!

संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सगळं गावं उभ राहिलं. आश्विनी वहिनीचं दु:ख मी समजू शकते. पण भावनिक विषय आणि राजकारण हे दोन वेगळे विषय आहे. अश्विनी देशमुख यांनीही दहा वर्ष गावाचा कारभार पाहीलेला आहे. आता त्यांनी संतोष भैय्या यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा कशी होईल? यासाठीचा न्यायालयीन लढा लढला पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादीच्या संजीवनी देशमुख निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे म्हटलं आहे.

अंदमानच्या कारागृहातील सर्व क्रांतिकारक माझ्यासाठी समान : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांची भूमिका

विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल मानहानीच्या खटल्याची सुनावणी सध्या पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. याचदरम्यान सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी अंदमानच्या कारागृहात विनायक सावरकर यांच्या बरोबर जवळपास ५६८ इतर क्रांतिवीरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, हालअपेष्टा सहन केल्या. त्यामध्ये अनेकांनी प्राणही गमावले. मात्र हे सर्व क्रांतिकारक माझ्यासाठी समान असून त्यांच्या त्यागाबद्दल मला अपार आदर आहे, अशी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मांडली.

उष्णतेच्या लाटेमुळे वर्ध्यात शाळांना सुट्टी

राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 17 एप्रिल हा एप्रिलमधील सर्वात उष्ण दिवस ठरू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उष्णतेची लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्यात अंगणवाडी, तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पालिकेच्या सभागृहातच चोरी; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात चोरीची घटना उघडकीस आली आहे. नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून सुमारे 20 हजार रुपये गायब झाल्याचा आरोप आहे. बैठक संपल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. सभागृहात सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. या घटनेमुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात तरुणी अडचणीत?

गोरेगाव येथील नेस्को संकुलातील ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवे वळण आले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिने 2 ड्रग्जच्या गोळ्या घेतल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्जचे सेवन हा कायद्याने गुन्हा असल्याने कारवाई होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मावळ बाजार समिती बरखास्त; राजकीय घडामोडींना वेग 

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या घडामोडींमुळे अखेर समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला. तीन वर्षांपूर्वी निवडून आलेल्या संचालक मंडळात बहुमत असूनही सभापती आणि उपसभापती यांनी पदे न सोडल्याने नाराजी वाढली. या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय बदल घडले असून या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Pune Crime : पुणे हादरलं! अडीच वर्षाच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका 47 वर्षीय नराधमाने अडीच वर्षाच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विजय भोसले नावाच्या नराधमाला अटक केली आहे.

Heat Wave : हवामान खात्याचा अलर्ट, दुपारी 12 ते 4 या वेळेत कामगारांना विश्रांती देणे बंधनकारक

महाराष्ट्रात वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने आणि हवामान विभागाने अलर्ट जारी केल्यानुसार राज्य उष्णता कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यात असंघटित कामगारांना तीव्र उष्णतेपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसार हवामान खात्याच्या अलर्टनुसार दुपारी 12 ते 4 या वेळेत कामगारांना विश्रांती देणे बंधनकारक असेल. तसेच कामाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 करण्याबाबत सुचवण्यात आली आहे. उष्माघात आणि आपत्ती या प्रकारामध्ये देशातील पहिल्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर येतो.

Odisha School Food Poisoning : सरकारी शाळेत 100हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा, एकाचा मृत्यू

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एका सरकारी शाळेत 100हून अधिक विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली विद्यार्थिनी पाचवीत शिकत होती. खराब जेवणामुळे झालेल्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीचार्जही केला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

MPSC exam candidate nipun setu : MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'निपुण सेतू' उपक्रम

राज्यातील एमपीएससी परीक्षा अधिक पारदर्शक आणि गतीमान होण्यासाठी, उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता केवळ अभ्यास आणि परीक्षेवरच लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युपीएससीच्या धर्तीवर आता एमपीएससी परीक्षेतही काही बदल आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत. युपीएससीतील प्रतिभा सेतू प्रमाणे एमपीएससी निपुण सेतू सुरु करण्यात येईल. त्यामुळे परिक्षार्थी युवकांनी एकदा परिक्षा दिली की पुन्हा नोकरीसाठी परीक्षा देण्याची गरज नाही, त्यासाठी एमपीएससी पुर्वी 53 संवर्गासाठी परीक्षा घेत होती, आता 103 संवर्ग तयार करण्यात आले आहेत.

Sushma Andhare PC On Ashok Kharat : खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव

परतवाड्यातील आरोपीच्या घरावर ज्या प्रमाणे बुलडोझर चालवला, त्याचप्रमाणे अशोक खरातच्या फॉर्म हाऊसवर बुलडोझर कधी चालवणार? रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? असे प्रश्न ठाकरेंच्या नेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत.

Devendra Fadnavis : पंतप्रधानांच्या नेतृत्वात, नेतृत्वात देशात वैद्यकीय शिक्षणाचा अभूतपूर्व विस्तार; देवेंद्र फडणवीस

AIIMS Nagpur च्या दीक्षांत सोहळ्यात, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी, पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वात देशात वैद्यकीय शिक्षणाचा अभूतपूर्व विस्तार झाल्याचे म्हटलं. महाराष्ट्रात 15+ नवीन वैद्यकीय महाविद्यालयं, आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यावर भर, प्रत्येक नागरिकाला 5किमी परिसरात आरोग्य सुविधा देण्याचा आराखडा आणि असंसर्गजन्य आजारांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. डॉक्टरांसाठी केवळ ज्ञान नव्हे, तर करुणा देखील अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान आणि करुणेचा संगमच यशाचा मार्ग ठरतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

विरोधकांना कैसे हराया म्हणणाऱ्या सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात

कैसे हराया फेम एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

काकींच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार मैदानात

बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेत्या मैदानात आहेत. तर आपल्या काकींच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी घोंगडी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.

आता सातबारा, ८-अ उतारे थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार

महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. आता सातबारा (७/१२), ८-अ उतारा, मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड), फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्डमधील विविध आवश्यक दाखले थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. ही सुविधा महाभूमी संकेतस्थळावरून थेट मोबाईलवर पोहोचवण्यात येणार असून, यासाठी फक्त माफक शुल्कात म्हणजे केवळ १५ रुपयांत नोंदणी करता येईल. सध्या राज्यात गेल्या काही वर्षांपासून सातबारा व इतर उतारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना जवळच्या सेतू केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रावर जावे लागते.

पुण्यातील पबमध्ये तरुणीचा विनयभंग

पुण्यातील पबमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेंच्या नेत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला

नाशिक शहरातील सिडको परिसरात सोमवारी (ता.१३) रात्री उशिरा शिंदेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर 6 ते 7 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलावून तसा प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो. पक्षाला उभारी देण्यासाठी आणि युवकांना पक्षात अधिकाधिक संधी देण्यासाठी हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती आहे, याला खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.

Nirav Modi : नीरव मोदीला लवकरच भारतात आणणार

पंजाब बँकेची फसवणूक करणारा नीरव मोदीला लवकरच भारतात आणणार आहे. त्यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे, CBIची टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे. त्याला आर्थररोडमध्ये आणणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारंभाच्यात्या प्रमुख पाहुण्या आहेत. संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

Heat Wave Alert:  दुपारी उन्हात बाहेर पडणं टाळा 

महाराष्ट्रावर पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचं संकट आहे, त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडणं टाळा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. 

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची आज सम्राट चौधरी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत बिजेंद्र यादव, आणि विजय चौधरी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com