Maharashtra Politics Live Update : तामिळनाडूत फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट; 16 कामगारांचा मृत्यू

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर नाना पटोलेंची टीका, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर हल्ला यासह देशासह राज्यातील महत्त्वाचे राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu 16 Dead : तामिळनाडूत फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट; 16 कामगारांचा मृत्यू

तामिळनाडूतील विरधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pandharpur Rain Update : खर्डीत पाच ठिकाणी वीज कोसळली; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पंढरपूर तालुक्यातील खर्डी इथं आज सायंकाळच्या सुमारास चार ठिकाणी वीज पडली. बनकर-माळी वस्ती इथं उसात वीज पडून उसाने पेट घेतला, तर गावाशेजारील मुस्लिम कबरस्थान इथं मिरीच्या झाडाजवळ वीज पडून तेथील कडबा पेटला. जळकेवाडी इथल्या नारळाच्या झाडावर, तर बाळू जगताप यांच्या आंब्याच्या झाडावर वीज पडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण एका पाठोपाठ चार ठिकाणी वीज पडल्याने खर्डी ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Iran stops Indian ships Hormuz 2026 : भारताकडे निघालेल्या 14 जहाजांच्या ताफ्याला इराणच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीत रोखले

मध्य-पूर्वेतील होर्मुझ खोलल्याचे जाहीर करून काही तास उलटत नाही तोच पुन्हा इराणने भारतीय जहाजांचा जथ्था रोखून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अशातच गॅस आणि कच्चे तेल घेऊन भारताकडे निघालेली ही जहाजे पुन्हा माघारी गेली परंतू या धावपळीत एक जहाज इराणी नौदलाच्या डोळ्यात धूळ फेकत होर्मुझ पार करून निसटले आहे. कच्चे तेल, गॅस आणि खते घेऊन भारताकडे निघालेल्या 14 जहाजांच्या ताफ्याला इराणच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीत रोखले होते. 14 जहाजांचा ताफा रांगेत जात असताना इराणच्या गनबोट्सनी ताफ्यातील दोन जहाजांवर विना इशारा गोळीबार केला. पीटीआय नुसार, एका भारतीय जहाजाच्या खिडकीला गोळी लागून काच फुटली, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Donald Trump Come To Pakistan : ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती

अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अचानक कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. शहरातील अनेक भाग सील करण्यात आले असून वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. या हालचालींमुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय बैठकीची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः इस्लामाबादला येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम कराराच्या टप्प्यावरच ते पाकिस्तान दौऱ्यावर येतील. सध्या कोणत्या पातळीवर चर्चा होणार आणि कोण सहभागी होणार, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

Mallikarjun Kharge On PM Modi : हा तर डिस्ट्रेस एड्रेस! हताश पंतप्रधान..; मल्लिकार्जुन खर्गेंची जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'X' (ट्विटर) वर लिहिले की, "पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात 59 वेळा काँग्रेसचा उल्लेख केला, तर महिलांचा उल्लेख अत्यंत कमी वेळा केला. यावरूनच त्यांचे प्राधान्य काय आहे हे स्पष्ट होते. त्यांच्यासाठी काँग्रेस महत्त्वाची आहे, कारण काँग्रेस नेहमी इतिहासाच्या योग्य बाजूने उभी राहिली आहे." गेल्या 12 वर्षांत काहीही ठोस करता न आल्याने हताश होऊन पंतप्रधान आता लोकशाही आणि संविधानाचा अपमान करत आहेत, असा आरोप खर्गेंनी केला. महिला आरक्षण विधेयक पहिल्यांदा 2010मध्ये राज्यसभेत काँग्रेसनेच मंजूर केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. भाजपशासित राज्यांत महिलांवरील गुन्हे वाढत आहेत. हाथरस, उन्नाव आणि हरियाणात महिला कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक यावर पंतप्रधान गप्प का? असा सवाल खर्गेंनी विचारला.

Hormuz Strait : इराणनं होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली! अमेरिका-इराण तणाव शिगेला

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणनं Strait of Hormuz ही महत्त्वाची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Iranच्या संयुक्त लष्करी कमांडनं सांगितलं की, सशस्त्र दलांच्या नियंत्रणाखाली सामुद्रधुनीवरील परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे. अमेरिकेनं इराणी जहाजवाहतूक आणि बंदरांवर लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं. जोपर्यंत United Statesकडून इराणवरील नाकेबंदी सुरू राहील, तोपर्यंत होर्मुझमधील वाहतूक रोखली जाईल, असा इशाराही इराणनं दिला आहे. दरम्यान, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या गनबोट्सनी एका टँकरवर गोळीबार केल्याचा दावा ब्रिटिश लष्कराने केला आहे.

Semi conductor Odisha : ओडिशामध्ये देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटचा प्रारंभ

ओडिशामध्ये देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw आणि ओडिशाचे मुख्यमंत्री Mohan Charan Majhi यांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देत ओडिशा आयटी आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील एक महत्त्वाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे. दरम्यान, देशाला सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याचं Narendra Modi यांचं व्हिजन असून, ते पूर्ण करण्यासाठी ओडिशा सज्ज असल्याचं मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी स्पष्ट केलं.

Latur Update : दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन चुलत भाऊ रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाले. यापैकी सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला आहे. तर 11 वर्षीय साईचरण हा अद्याप बेपत्ता आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Congress News : राजकीय वातावरण तापले तीव्र शब्दांत साधला निशाणा

कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या वादानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या घटनेवर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये महिलांना आदर दिला जात नाही आणि हीच त्या पक्षाची संस्कृती आहे. बैठकीत घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून अशा घटना कोणत्याही पक्षात घडू नयेत. कल्याण पूर्वेतील एका सभागृहात आयोजित काँग्रेस बैठकीदरम्यान काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि जिल्हाध्यक्ष राजा भाऊ पातकर यांच्यात वाद झाला.

Devendra fadnavis : पत्रकार परिषदेला महायुतीचे नेते उपस्थित राहणार

महिला आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी संसदेत महिला विधयेक संमत झाले नाही. काँग्रेसने विरोध केल्याने हे विधेयक संमत झाले नाही. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीस त्यांचे म्हणने जनतेसमोर मांडणार आहेत.

'तुम्ही आम्हाला शिवसेनेत घेतलं आणि मदत केली. तुमचे आमच्यावर फार उपकार आहेत'

लक्ष्मी नारायणचं मंदिर कसं उभं राहील, असा आमच्यासमोर प्रश्न होता. पण तुम्ही आम्हाला शिवसेनेत घेतलं आणि जी काही मदत लागेल ती तुम्ही केली आहे. तुमचे आमच्यावर फार उपकार आहेत. तुम्ही येऊन मंदिराचे उद॒घाटन केले, त्याबाबत आभारी आहे, असे रायगडमधील तुकाराम काते यांनी सांगितले.

नाशिक, अमरावती, मुंबईत शाळेच्या नावाखाली स्कूल जिहाद सुरू

नाशिक, अमरावती, मुंबई येथे शाळेच्या नावाखाली स्कूल जिहाद सुरू आहे. बाहेर शाळेच्या नावाचा बोर्ड लावून आतमध्ये मशीद उभी करण्यात आली आहे, असाही आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाची टीम चौकशीसाठी नाशिकच्या टीसीएस कंपनीत दाखल

धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग नाशिक येथील टीसीएस कंपनीत दाखल झाला आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाची तथ्यशोध समिती नाशिकच्या कंपनीत दाखल झाली असून ती कागदपत्रांची तपासणी करत आहे.

देवेंद्र फडणवीस बारामती- राहुरीत प्रचारसभा घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या आणि परवा हे बारामती आणि राहुरी मतदारसंघात दोन प्रचार सभा घेणार आहेत. बारामतीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार ह्या उमेदवार आहेत, तर राहुरीत शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव राहुल कर्डिले हे उमेदवार आहेत.

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातून सहा महिन्यांत 34 मुली गायब

यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यात गेल्या सहा महिन्यात ३४ आदिवासी मुली गायब झाल्या आहेत. गायब झालेल्या मुलीची मानवी तस्करी केली जात आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे. मुलींच्या पालकांना पैशाचे आमिष दाखवून फूस लावली जात असल्याचेही जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी म्हटले आहे.

पोस्टर दाखवणाऱ्या तरुणाला म्हाडाच्या उपाध्यक्षाची धमकी : तुला इथूनच उलचून घेऊन जाईन

गोरेगावातील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या कार्यक्रमात एका तरुणाने पोस्टर दाखवल्यानंतर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल हे त्याच्यावर संतापले. तुम्ही घुसखोर आहात की नाही, हे सिद्ध करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. तू घूसखोर असशील तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन, असे म्हणत संजीव जयस्वाल यांनी संबंधित तरुणाकडे ओळखपत्र मागितलं. या प्रकारामुळे भाषण अर्धवट सोडून जयस्वाल हे परत गेले.

दारू आणि सिगारेट पाजून तरुणीवर अत्याचार 

‘टीसीसी’नंतर नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतरण प्रकरण बाहेर आले आहे. पीडिताच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारु आणि सिगारेट पाजून तरुणीवर अत्याचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी तंजीर इनामदार याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठ्यांना आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार : मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद

मराठ्यांना आरक्षण देण्याचा राज्य सरकारला 105 व्या घटना दुरुस्तीद्वारे अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज मागास नाही, असं म्हटलंलं नाही, महाराष्ट्र राज्य अस्तित्वाद येण्यापूर्वीच मराठा समाज मागास होता, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. त्याबाबतची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Maharashtra News : भोंदू गडगेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

संगमनेरमधील भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे उर्फ दत्तधाम सरकारसह त्याच्या पाच सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर पोलिसांनी गडगेला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री प्रचाराचा मैदानात

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुढील दोन दिवस बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार करणार आहेत. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत.

Ashok Kharat भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला

भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, SITने त्याला लैंगिक शोषणाच्या पाचव्या गुन्ह्यात अटक केली. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हिसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं होत.

Iran India Relations इराणचा भारतासोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार

होर्मुझ जलमार्गामध्ये भारतीय टँकरवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर इराणनं भारतासोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार केलाय. इराणचे सर्वोच्च नेते डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी भारत-इराण संबंधांचे वर्णन 5 हजार वर्षांचा वारसा असा केलाय. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष तीव्र होत असताना, इराणनं भारताला आपला विश्वासू जोडीदार म्हटलंय. 'आम्हाला युद्ध नको, तर शांतता हवी आहे' असे म्हणत इराणनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

Ashok Kharat Case थोड्याच वेळात खरातची कोर्टात हजेरी

भोंदू अशोक खरातला थोड्याच वेळात नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे. SITनं त्याला लैंगिक शोषणाच्या पाचव्या गुन्ह्यात अटक केलीय. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हिसीद्वारे हजर केलं जाणार आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी खरातने डिलीट केलेला मोबाईल डेटा फॉरेन्सिक टीमनं रिकव्हर केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानं डिलीट केलेले फोटो,व्हिडीओ रिकव्हर करण्यात आलेत.

पुण्यातील भिडे पुलाजवळ अज्ञाततरुणाची निर्घृण हत्या

पुण्यातील नदीपात्रातील भिडे पुलाजवळ एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून ही हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खरात प्रकरण घरोघरी पोहचलं यासाठी एकनाथ शिंदेंचे आभार मानले पाहिजेत - श्याम मानव

"अशोक खरातचं आणि एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन असल्यानेच या प्रकरणाचा सर्वार्थाने तपास सुरु झाला. खरात प्रकरण घरोघरी पोहचलं यासाठी एकनाथ शिंदेंचे आभार मानले पाहिजेत. कारण खरात जर एकनाथ शिंदेंचा बाबा नसता आणि रूपाली चाकणकर खरातच्या भक्त नसत्या तर कधीच हे प्रकरण उघड झालं नसतं. शिंदे आणि राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी हे प्रकरण उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या, असा दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी केला आहे.

नेस्को ड्रग्स प्रकरणात आणखी एकाला अटक

नेस्को कार्यक्रमातील एका सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. या सुरक्षा रक्षकाला प्रवेशासाठी लाच दिल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे ZP तील तबांधकाम खात्याच्या सभापतींनीच आणला बाहेरचा आर्किटेक्ट

पुणे जिल्हा परिषदेमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या दालनांबाबत एक वेगळाच प्रकार समोर आला असून, बांधकाम खात्याच्या सभापतींनी स्वतःचा खासगी आर्किटेक्ट आणून दालनाचे इंटेरियर करून घेतल्याने प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ज्या विभागाची जबाबदारी स्वतःकडे आहे, त्याच बांधकाम विभागावरच विश्वास नसल्याचे चित्र या निमित्ताने उभे राहिले आहे.

अमरावतीत जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वाराजवळ आढळला मृतदेह

अमरावतीत जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वाराजवळ आढळला मृतदेह आढळला, हा मृतदेह किशोर वासनिक (वय 65 ) यांचा आहे. वासनिक यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अमरावती चे तापमान काल 44 अंशाच्या वर गेल होता.या रस्त्यावर वाहनाची वर्दळ असताना हा मृतदेह दिसून आला.

अपघात की घातपात, डॉ. जितेंद्र शेळकेच्या मृत्यूवर 'वंचित'चा संशय

‘भोंदू’ अशोक खरातचा निकटवर्तीय डॉ. जितेंद्र शेळके याचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने तीव्र संशय व्यक्त करत, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या घटनेची तुलना त्यांनी मध्य प्रदेशातील गाजलेल्या 'व्यापम' घोटाळ्याशी केली आहे. व्यापम घोटाळ्याच्या तपासादरम्यान संबंधित ४० हून अधिक व्यक्तींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच धर्तीवर, डॉ. शेळकेचा अपघाती मृत्यू संशयास्पद असल्याचे वंचितने म्हटले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर गोळीबार

इराणने निर्बंध लादल्यानंतर इराणच्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केल्याची घडना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ज्या जहाजांवर हल्ला केला आहे. ती जहाजं इराकमधून तेल घेऊन येत होती.

अशोक खरातची अडचण वाढणार, आज पुन्हा कोर्टात हजर करणार

भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात आज SIT पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती आहे.खरात कोणाच्या संपर्कात होता? आर्थिक व्यवहारांचे पुरावे, मनी लाँड्रिंगचे कोड नंबर याचा उलगडा लवकरच होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com