

राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाने गंगापूर येथील एका व्यापाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. यात 1 कोटी 81 लाख 6 हजार 800 रुपयांचा कर थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जीएसटी विभागाने दिली. वारंवार नोटीस पाठवूनही त्याची दखल न घेतल्यामुळे संबंधित व्यापाऱ्याची स्थावर मालमत्ता जप्त करत मोठी कारवाई केली आहे. याबाबत सहाय्यक राज्यकर आयुक्त संजीव नागरजोगे यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि विजयदुर्ग ही रो-रो सेवा 1 मार्च 2026 रोजी सुरू झाली आहे. या सेवेमुळे कोकणातील नागरिकांना मोठा फायदा होत असून जलद आणि सुखकर प्रवास पसंतीस उतरताना दिसून येत आहे. याचदरम्यान,राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे रो-रो सेवेला हर्णे बंदर येथे थांबा मिळण्याबाबतची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
एसटीच्या शिवनेरीची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे गेली आहे. कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची याबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, सरकार २०० अत्याधुनिक व्होल्व्हो बसची खरेदी करणार आहे. यामध्ये २०० बसमध्ये ३० स्लीपर इलेक्ट्रिक शिवनेरी बसचा समावेश करण्यात येणार असून याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
बदलापूर 'स्त्री बीज' तस्करी प्रकरणी नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटर अखेर सील करण्यात आलं आहे. या प्रकरणात डॉ. अमोल पाटीलला बदलापूर पोलिसांनी काल अटक केली होती. बदलापूरमध्ये स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आलं होतं. नाशिकच्या परवानगीवर बदलापूरमध्ये फर्टिलिटी सेंटर सुरू असल्याची तक्रार होती. तर तपासात डॉ. अमोल पाटील आणि डॉ. वंदना पाटील यांच्या नावावर परवानगी देण्यात आली होती. संपूर्ण देशभर स्त्री बीज तस्करीसाठी डॉ. अमोल पाटील एजंट म्हणून कार्यरत असल्याचा संशय आहे.
वनजमिनींच्या नोंदीत झालेल्या त्रुटींविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्यात येणार असून विविध दाखल्यांसाठी आलेल्या अर्जांचा निपटारा ‘महाअभियान शिबिर’ योजनेत तीन महिन्यांत केला जाणार आहे.
मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत सत्ताधारी नगरसेवक एकमेकांना भिडले. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी महासभा बोलवण्यात आली होती. सत्ताधारी इस्लाम पार्टी व एमआयएम नगरसेवकांमध्ये, शाब्दिक चकमक होऊन थेट एकमेंकांच्या अंगावर धावून गेले. एमआयएम गटनेता अब्दुल मालिक व महापौर पती खालिद हाजी यांच्या हा वाद झाला. या मुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
राज्यातील गौण खनिज उत्खननासाठी नवीन धोरण पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार असून कोकणासाठी स्वतंत्र वाळू उत्खनन धोरण राबवले जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. बेकायदेशीर उत्खननाविरोधात महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई केली जाणार असून गरजेनुसार वन विभागालाही सोबत घेतले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ठाकरे सेनेने त्यांच्या अटी मान्य केल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेल्या मनसेने आता माघार घेतल्याची माहिती आहे. महापालिका निवडणूक एकत्र लढलेल्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समितीवरून वाद झाल्याचं दिसून आलं होतं.
अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप करताना उडालेला गोंधळ आणि कामगार विभागातील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विशेषतः एका अधिकाऱ्याला मिळत असलेली नियमबाह्य मुदतवाढ यावर लक्षवेधीच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि डीएमकेने जागावाटपाचा तिढा सुटला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी फोनवरून संवाद साधत चर्चा करून आघाडी आणि जागावाटपाला अंतिम स्वरूप दिले. या जागावाटपानुसार काँग्रेस तामिळनाडूमध्ये एकूण 28 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सोबतच काँग्रेसला राज्यसभेची एक जागा देण्याचेही डीएमकेने मान्य केले आहे.
हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर आज एका इराणी युद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान 101 कर्मचारी बेपत्ता आहेत, तर 78 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने दिली.
पुणे जिल्हा न्यायालयाच्या (शिवाजीनगर) आवारात दोन महिला वकिलांमध्ये भरदिवसा हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयीन प्रकरणं मिळवण्याच्या वादातून हा प्रकार घडला असून, यामध्ये एक 42 वर्षीय महिला वकील गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकावर अमरावतीच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची चक्क बनावट स्वाक्षरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळीच्या शाह अंजुमन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक हारुण शाहबाबा शाह या मुख्याध्यापकाने हा धक्कादायक प्रताप केला. 38 हजार 825 रुपयांच्या देयकावर शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून हा प्रस्ताव पाठवला. वेतन पथकाच्या तपासणीत व्हाईटनर व खोडतोड आढळली. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी याबाबत गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती निवडणुकीसाठी मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आमदार वरुण सरदेसाई यांनी संदीप देशपांडे यांची भेट घेतली होती. या दोघातील बैठकीनंतर तिढा सुटला असून मनसेच्या अटी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य आहेत. त्यामुळे आता प्रभाग समिती निवडणुकीसाठी तटस्थ राहणार नसल्याची भूमिका मनसेने घेतली आहे.
राज्याच्या अधिवेशनात BLO ड्युटी रद्द करण्याचा मुद्दा मांडल्यानंतरही शिक्षकांवर काम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केला. अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगत त्यांनी ४ मार्च २०२६ रोजी पुन्हा सभागृहात प्रश्न उपस्थित केला. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी टाकू नये, तसेच कोणत्याही शिक्षकावर गुन्हा दाखल करू नये, असे निर्देश कलेक्टरांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली. पुढे कोणत्याही शिक्षकांना BLO काम देऊ नये, अशीही ठाम विनंती त्यांनी केली.
"परदेशात जिथे-जिथे आपली मराठी मंडळं आहेत, ती सक्रीय करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून आपले जे लोक आहेत, त्यांना मदत करतोय. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गिरीश महाजन त्यांच्याशी बोलले आहेत. आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. यात महाराष्ट्रीयन लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मायदेशात आणण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. “आम्ही WhatsApp नंबर दिलेला आहे. लोक त्यावर संपर्क साधत आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचे श्रेय दिले. त्यांनी उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
विधिमंडळातील पोर्टमध्ये उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये ही शाब्दिक बाचाबाची झाली आहे. विधान भवनातील सभागृहात प्रवेश करण्याआधी जी सही करावी लागते. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. यावेळीच सहीच्या मुद्द्यावर वाद झाल्याचे वृत्त आहे.
सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. इस्त्राईल व अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर त्यामध्ये अनेक लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. याच्या निषेधार्थ माकपने ट्रम्प यांचा पुतळा जाळत घटनेचा निषेध केला.
भाजपकडून राज्यसभेच्या चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये रामदार आठवले, विनोद तावडे यांच्यासह माया इनावते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे.
विलिनीकरणाची चर्चा सध्या नाही, ज्यांच्याशी चर्चा केली तेच आता नाहीत, असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनासाठी परदेशात गेलेल्या कुटूंबाच्या नातेवाईकांनी काल सुटकेचा निश्वास सोडला. युद्ध परिस्थितीत अनेक पर्यटक घरी आल्यानांतर नातेवाईकांनी भरल्या डोळ्यांनी त्यांचे स्वागत केले. पण कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील जवळपास 500 कुटुंब आज युद्ध परिस्थितीमुळे चिंतेत आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी घरातील कर्ता पुरुष सौदी अरेबिया, कु्वैत, दुबई, कतार अशा ठिकाणी असल्याने युद्धाची प्रत्येक ब्रेकिंग कुटूंबाच्या काळात चीर करून जाते. त्यामुळे जवळपास हजारो तरुण परदेशात असल्याने कुटूंबाचा जीव टांगणीला लागला आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे संरक्षण व्हावे यासाठी दुवा केला जात आहे.
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मात्र, यावेळी रामदास आठवलेंना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी महाविकास आघाडीकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहिले आहेत. या बैठकीत उमेदवार निश्चित केला जाणार असल्याची माहिती आहे.
पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित करण्यात आली आहे. युएई गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कालच्या विामानामध्ये विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक भारतात परतले आहेत. त्यानुसार आता पुण्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत काय निर्णय होणार याकडे सर्व वृक्षप्रेमींची नजर लागली आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अमेरिका-इस्त्राईल आणि इराण युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 55 पैशांनी कोसळला आहे
मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे..
संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in/ cons.ramallah@mea.gov.in कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : cons.doha@mea.gov.in सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : community.kuwait@mea.gov.in बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : cw.muscat@mea.gov.in/ cons.muscat@mea.gov.in जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ तसेच ई-मेल : cons.baghdad@mea.gov.in/ cons1.baghdad@mea.gov.in/ pol.baghdad@mea.gov.in, https://x.com/i/status/2027746402575782262 नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.
नागरी विमान वाहतूक मंत्रालय पश्चिम आशियातील काही भागांमधील हवाई क्षेत्राच्या बदलत्या परिस्थितीवर आणि आंतरराष्ट्रीय विमान संचालनावर होणाऱ्या परिणामांवर सतत लक्ष ठेवून आहे. चालू परिस्थितीमुळे भारतीय विमान कंपन्यांची 1,221 उड्डाणे आणि परदेशी विमान कंपन्यांची 388 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
विदर्भातून राज्यसभेसाठी महिला नेत्याला संधी देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहे. संघाची पार्श्वभूमी असलेल्या महिलेला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. या नियमामुळे नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार नसल्याची देखील चर्चा आहे.
इराण-इस्त्राईलयुध्दामुळे सोलापूरमध्ये माजी आमदार नरसय्या आडम हे आज आंदोलन करणार आहेत. इराणच्या समर्थनासाठी हे आंदोलन असणार आहे. इस्त्रायल आणि अमेरिका युद्धखोर असल्याची टीका आडम यांनी केली आहे. तर, भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी इस्त्रायलच्यासमर्थनाथ केली फेसबुक पोस्ट करत इस्त्राईलला पाठींबा दिला आहे.
जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. शरद पवार यांना पाठींब्याबाबत चर्चा झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, आदिती ठाकरे यांनी ट्विट करत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आणि लवकरच होईल. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष जागेबाबत आणि राजकीय जुळवणीबाबत चर्चेसाठी एकत्र येतील.
अयातुल्ला अली खामनेई यांच्या निधनानंतर त्यांचा 56 वर्षीय मुलगा मोजतबा खामनेई यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आलीय. 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्स'ने हा निर्णय घेतलाय. अयातुल्ला अली खामनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा इराणाचा सर्वोच्च नेता बनल्याने इराणमध्ये देखील घराणेशाही आल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.