Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विधान परिषद निवडणूक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बैठक, अब्दुल सत्तारांच्या मुलगा माघार घेण्याची चिन्हे यासह राज्यभरातील दिवसभरातील सर्व राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

फ्लॅटसाठी ३ लाख आणि 'अधिक मासात' सोन्याच्या अंगठीची मागणी; पुण्यात २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी गोरख सोनवणे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मे २०२६ मध्ये 'अधिक मास' असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते. मात्र,"आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही,"असा हट्ट गोरखने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली, अशा प्रकारे छळ झाल्यानंतर मुलीनं आत्महत्या केली.

गोकुळ गिते यांची मंत्री उदय सामंत यांच्यांशी फोनवरून चर्चा

नाशिक : विधानपरिषद निवडणुकीत घडामोडींना वेग आला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना भेटीसाठी उदय सामंत यांचा फोनवरुन निरोप मिळाला. गोकुळ गीते उदय सामंत यांची भेट घेणार की नाही ? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. गोकुळ गीते यांचं शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Prakash shendge : प्रकाश शेंडगे यांनी केली मोठी घोषणा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे नुकतेच उपोषणाला बसले होते. ते भर उन्हात उपोषणाला बसल्याने त्यांच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. ज्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रही द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, आता याच मागणीवर ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 11 तारखेला आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी जाहीर केलं आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक : राजू शेट्टी

राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करत जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'च्या अत्यंत जाचक आणि त्रुटीपूर्ण निकषांमुळे राज्यातील तमाम शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ एक आकड्यांची जुगाड असून, यामागे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आणि फसवणूक सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

अकोल्यात कृषी विभागाची मोठी कारवाई: जिल्ह्यातील 7 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 3 जणांचे परवाने निलंबित

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कृषि निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने मोठी कार्यवाही. तपासणी आणि सुनावणीअंती 7 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी झाले रद्द. त्याचप्रमाणे 3 केंद्रांचे परवाने 2 महिन्यासाठी निलंबित. तर इतर 6 केंद्रांना त्रुटीं बाबत दिली सक्त ताकीद. या कारवाईमुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या केंद्रचालकांमध्ये मोठी खळबळ.

ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याबाबत घाईघाईने कोणताही निर्णय नाही : ॲड. आशीष शेलार

ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

डी के शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

कर्नाटकमध्ये अखेर सत्ताधारी काँग्रेसमध्ये खांदेपालट झाले असून डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी येथील ग्लास हाऊसमध्ये झाला. यानंतर आता कर्नाटकमध्ये शिवकुमार पर्व सुरू झालं आहे.

कर्जमाफी शासन आदेशाची अकोल्यात होळी 

कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळची कर्जमाफी आज पर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली व खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी किसान सभेने या आदेशाची राज्यभर होळी करण्याची हाक दिली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे यानुसार अध्यादेशाची होळी करण्यात आली. उद्या व परवा सलग दोन दिवस राज्यभर हे होळी आंदोलन सुरू राहणार आहे.

कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक : डॉ अजित नवले

कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळची कर्जमाफी आज पर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली व खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, ज्यांची संख्या तब्बल 32 लाख 29 हजार इतकी आहे, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे. अत्यल्प पगारावर राबणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता 2 लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50 हजारावर बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे.

NCP news : महागाईविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन

वाढत्या महागाईविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवी मुंबईत आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड या आंदोलनात सहभागी झाले होते.

TMC news : तृणमूल काँग्रेसमधील सर्व नियुक्त्या बरखास्त

तृणमूल काँग्रेसमधील ५८ आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर पक्षांतर्गत सर्व समित्या, सेल, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बरखास्त केल्या आहेत.

नाशिकमध्ये गीते बंधू संपर्काबाहेर; उदय सामंतांचे शोधमोहीम प्रयत्न सुरू

नाशिकमधील बंडखोर नेते गणेश गीते आणि गोकुळ गीते सध्या संपर्कात नसल्याची चर्चा रंगली आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत. मात्र गीते बंधूंचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याशी संपर्क साधून माघारीसाठी समजूत काढण्याचे प्रयत्न सामंतांकडून सातत्याने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

रायगड विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट; जुईली दळवी यांनी घेतली माघार

रायगड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीतील अंतर्गत समन्वय, तसेच विविध स्तरांवर झालेल्या चर्चांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दळवी यांच्या माघारीमुळे निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Vijay Wadettiwar :  कर्जमाफी हा फक्त दिखावा; शेतकऱ्यांना लाभ नाही : विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांच्या हिताची नसून केवळ लोकांना दाखवण्यासाठी केलेला उपक्रम असल्याचा आरोप त्यांनी केला. या निर्णयामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होणार नाहीत, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ घोषणा करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

Thane News : ठाण्यात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, एक कोटी रूपयांचे गावठी दारूचे रसायन नष्ट

पुण्यातील विषारी दारू कांडाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. ⁠ठाण्यातील अंजूर खाडी, देसईगाव खाडी आणि असीमघर खाडीत ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल 1 कोटी रुपयांची गावठी दारूसाठी तयार करण्यात आलेले रसायन नष्ट करण्यात आले.

Beed Politics : शेतकऱ्यांच्या प्रत्येक दुःखात आवाज उठवण्याचे काम करणार; पंकजा मुंडे

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे शेतकरी होते. मात्र आज शेतीची अवस्था बिकट झालेली आहे. मी शेतकऱ्यांना आवाहन करते, मी सुद्धा स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या प्रत्येक दुःखात आवाज उठवण्याचे, मी काम करणार आहे. हा माझा आजच्या दिवशीचा मोठा संकल्प. पण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून स्मृती समाधी स्थळावरून मोठी घोषणा केली आहे. माझा प्रत्येक श्वास हा कष्टकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहे. कुणीही घाबरू नका. एकमेकांना मदत करण्याची भावना ठेवा. जो कोणी एकमेकांची मदत करील त्याच्यावर माझी दृष्टी असेल, हीच मुंडे साहेबांची शिकवण आहे आणि स्वाभिमानाने जगा, मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

Yavatmal MLC Election : मविआला झटका, यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून साहेबराव कांबळे यांची माघार

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी यवतमाळ विधान परिषद निवडणूकीतून माघार घेतल्याने मविआला मोठा झटका बसला आहे. संख्याबळ जुळत नसल्याने मी निवडणूकीतून माघार घेत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. काँग्रेसवतीने तिकीट दिली त्याबाबद्दल नेत्याचे आभार मानले. जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज मागे घेतला आहे.

Dharashiv Update : येडेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात टोळक्याची गुंडगिरी; देवीच्या दरबारात रॉड ,दगड, बेल्टने महिला भाविकांना मारहाण

धाराशिव इथल्या येरमाळामधील येडेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात टोळक्याची गुंडगिरी वाढली आहे. शंभर रुपयांच्या पार्किंगच्या पैशासाठी भाविकाला मारहाण केली. रॉड ,दगड, बेल्ट याने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, देवीच्या दरबारात महिला भाविकालाही जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. गावगुंडांकडून भाविकाला बेदम मारहाण झाली असली, तरी पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे.

Pandharpur News : मेंढरं चरायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विघ्नेश सज्जन शेजाळ आणि अनंत महादेव नलवडे, हे दोघेही मित्र मेंढरं घेऊन चरण्यासाठी शेतात फिरत होते. अशा मध्येच विहिरीत पोहण्यासाठी गेल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला असावा, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली आहे.

Farmer News : कांद्याला भाव मिळेना, शेतकऱ्यांनी नाशिक सटाणा बाजार समितीत उपसले आंदोलनाचे हत्यार

नाशिकच्या सटाणा बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे आमरण उपोषणाला सुरू केली आहे. वारंवार पडलेले बाजार भाव, निर्यात बंदी, निसर्गाचा असमतोलमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांद्याला हमी भाव द्यावा, निर्याद बंदी उठवावी, अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आलेले अनुदान खात्यावर वर्ग करावे, कांदा पिक पाहणी-कापणी प्रयोगाची चौकशी करावी. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा. नाफेडमार्फत प्रतिक्विंटल 3000 रुपये प्रतिक्विंटल भावाने सरकारने खरेदी करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

Sharad Pawar NCP : सुळे, आव्हाड अन् पवार यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; महागाईविरोधात नवी मुंबईत आक्रमक आंदोलन

महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबईत काढण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आक्रमक आंदोलनादरम्यान खादार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनल्यामुळे आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.

Ahilyanagar Accident : चालत्या बसची चाके निखळली, अपघातात दहा जण गंभीर जखमी

अहिल्यानगरमध्ये तिसगाव-शेवगाव मार्गावर वृद्धेश्वर कारखाना परिसरात एसटीचा भीषण अपघात झाला. एसटी बसचे टायर निखळल्यामुळे बस रोड सोडून खड्ड्यात गेली. अपघात एवढा भीषण होता की, प्रवाशांनी मृत्यूचा थरार अनुभवला. या अपघातात एसटीची दोन्ही चाके तुटली! अपघातात एसटी बसमधील 10 प्रवासी जखमी भीषण झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखले करण्यात आले आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती सुमारे आली आहे.

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ विरोधात शेतकरी एकवटले; मोजणी करण्यास विरोध

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात पंढरपुरातील शेतकरी एकवटले आहेत. करकंब इथं शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध केला आहे. सोलापूर जिल्ह्यात शक्तिपीठ विरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. काल माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आज पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांनी शक्तिपीठ विरोधात घोषणाबाजी करत, मोजणीस विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

मुंबई ‘एपीएमसी’चे संचालक मंडळ बरखास्त; राष्ट्रीय बाजार समितीची अधिसूचना जारी, मंत्री जयकुमार रावल नवे अध्यक्ष

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) संचालक मंडळ अधिकृतपणे बरखास्त करण्यात आले असून, या बाजार समितीचे रूपांतर आता एका व्यापक ‘राष्ट्रीय बाजार समिती’मध्ये झाले आहे. या पुनर्रचित राष्ट्रीय बाजार समितीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी आज नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मुख्य कार्यालयात कार्यभार स्वीकारला. या प्रशासकीय परिवर्तन अंमलबजावणीसाठी पणन संचालक विकास रसाळ यांनी तात्पुरते प्रशासक म्हणून यापूर्वीच कारभार हाती घेतला होता.

तेलंगणातील एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना उध्वस्त

तेलंगणा राज्यात सुरु असलेला एमडी हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना मिरा भाईंदर, वसई विरार पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा क्र.४ ने उध्वस्त केला आहे. कारखान्यातून तीन किलो एमडी सह हजारो लिटर जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे सहा कोटी आहे.

अब्दुल सत्तार यांना आमदार गायकवाड यांचा पाठींबा

आमदार संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना पाठींबा दिला आहे. मित्रपक्षच शिवसेनेच मुंडके उडवत असल्याचे विधान सत्तार यांनी दिले होते. याबाबत बोलताना गायकवाड म्हणाले, आमदार अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी आहे. माझ्या मतदारसंघातही मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विषारी दारु प्रकरण चार पोलिस निलंबीत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये विषारी हातभट्टी दारूमुळे २४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील आणखी 4 जण निलंबित कऱण्यात आले आहेत.पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील आत्तापर्यंत २९ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मालेगाव प्रभारीपदी शादाब सय्यद 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने युवा शाखेच्या प्रभारी पदांच्या नियुक्त्या केले आहेत. यामध्ये मालेगावची जबाबदारी तिसऱ्यांदा शादाब सय्यद यांना देण्यात आली आहे. महापालिकेच्या राजकारणात राजकीय संधी चाचपडणाऱ्या या पक्षापुढे नवे आव्हान आहे.

गुजरातामध्ये महाराष्ट्रातील बसचा अपघात, सात जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये राष्ट्रीय महामार्ग 56 वर बारडोलीकडून व्याराकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र पासिंग असलेल्या दोन प्रवासी बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे एका बसला आग लागली, तर दुसऱ्या बसमधील प्रवासी जखमी झाले. यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

MLC Election : निवडणुकीत पैशाचा गैरवापर, तक्रार करण्याचे आयकर विभागाचे आवाहन

विधानपरिषद निवडणुकीतील या कथित 'लक्ष्मीदर्शना'वर आणि मतदारांच्या पळवापळवीवर आयकर विभागाचा हा २४ तासांचा खडा पहारा ठेवला आहे.जर कोठेही निवडणूक प्रक्रियेला गालबोट लावणारे गैरप्रकार किंवा पैशांचे वाटप सुरू असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिक खालील पत्त्यावर आणि क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप क्रमांक : ९४०४५६९४७६

ई-मेल आयडी: pune.pdit.inv@incometax.gov.in

पत्ता : नियंत्रण कक्ष, खोली क्रमांक ८२६, आठवा मजला, आयकर सदन, बोधी टावर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे - ४११०३७.

Karnataka Oath Ceremony : डी के शिवकुमार मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार

कर्नाटकमध्ये आजपासून नवीन अध्याय सुरू होत असून डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, उद्धव ठाकरेही या शपथविधीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डी. के. शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा केली. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाला अंतिम स्वरूप देण्यावर भर देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com