Maharashtra Politics Live Update : मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवाराचे नाव आज निश्चित होणार, विधान परिषद निवडणुकीसाठी प्रचाराला वेग, काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आपल्या परिवाराला भेटणार, यासह महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

येणारा काळ मुख्यमंत्र्यांचं नावं म्हणून शिंदे साहेबांच नावं पत्रिकेत असेल - बच्चू कडू

नवी मुंबई इथं पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावर प्रसंगीच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच नावं नव्हतं. यावर शिवसेना नेते आमदार बच्चू कडू यांनी प्रहार करताना, येणारा काळ शिंदे साहेबांचा असून पत्रिकेवर शिंदे साहेबांचे नाव मुख्यमंत्री म्हणून असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

परळीत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने सपासप वार; एकाविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

बीडच्या परळी शहरातील पंचशील नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी तौहीद खान हत्या प्रकरणातील 'ती' होंडा सिटी कार सापडली

परळीतील तौहीद खान याच्या निर्घृण हत्या प्रकरणा बाबत आता एक नवी आणि धक्कादायक माहिती मिळते आहे. तौहीदची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह ज्या गाडीच्या डिक्कीत ठेवून फिरवण्यात आला, ती संशयित 'होंडा सिटी' कार परळी पोलिसांनी जप्त केली आहे.

राजुर हत्याकड प्रकरणात तत्कालीन एलसीबी पीआय आणि पोलीस निरीक्षकाचे निलंबन

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात घडलेल्या हत्याकांड प्रकरणात हलगर्जीपणा करणे पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचे अमरावती पोलीस महानिरीक्षकांनी निलंबन केले आहे. या निलंबनाने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ वाजली आहे. जळगाव जामोद हत्याकांड प्रकरणातील मृत मुलीची अद्याप ओळख पटलेली नाही. जिवंत शिवानीला मृत जाहीर करून तिच्या वडील आणि भावाला न केलेल्या खुनाबद्दल अटक करण्यात आली होती. त्यामुळेच या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अभिजीत पाटील, नारायण पाटील यांनी भाजप पूरक भूमीका घेतली असली तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा आहे. जिल्हातून पुरोगामी विचार संपता कामानये यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची भेट घेऊन पक्षाच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही असे सांगितल्याचे ही आमदार खरे यांनी सांगितले.

सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी...

सांगली शहरामध्ये मान्सून पूर्व पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पाऊसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे.सकाळी उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे चित्र काहीसं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगली शहरांमध्ये अनुभवायला मिळत आहे.आज सायंकाळी देखील विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.

Bacchu Kadu : गोंदियामध्ये बोलताना बच्चू कडू यांनी दिला राज्य सरकारला अल्टिमेटम

लाडकी बहीण यायोजनेतून सरकारी आकडेवारीनुसार तब्बल 80 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. परंतु अशा देखील काही महिला आहेत, ज्यांची केवायीस प्रक्रिया देखील झाली आहे, त्या पात्र देखील आहेत, मात्र त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, अशा महिलांसाठी आता आमदार बच्चू कडू मैदानात उतरणार आहेत. ज्या महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, मात्र त्यांचे पैसे मिळत नाहीत, अशा महिलांना तातडीने पैसे मिळाले पाहिजे अशी मागणी गोंदियामध्ये बोलताना बच्चू कडू यांनी केली आहे. तसचे त्यांनी या मुद्द्यावर प्रशासनाला 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

Thalpathi Vijay : थलपथी विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर केली टीका

तामिळनाडूच्या राजकारणात राजकीय शाब्दिक चकमक पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. डीएमके अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील राजकारणावर मोठं भाष्य केलंय. थलपथी विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय. एका कार्यक्रमात बोलताना एम. के. स्टॅलिन म्हणाले की, विजय यांचे सरकार तीन महिने सुद्धा टिकणार नाही, एम.के. स्टॅलिन हे विजय आणि टीव्हीके सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.

कोकण विधान परिषदेसाठी मी इच्छूक होतो;पण एकदा आदेश आला की... : राजन तेली

विधान परिषदेसाठी मी इच्छूक होतो. पण शिवसेनेत एकदा आदेश आला की आम्ही अनिकेत तटकरेंचं प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्णय घेतला. मी नाराज असतो तर मी आज अकोल्यात नसतो. शिवसेनेत ४० वर्षे काम करताना मी १५ वर्षे आमदार होतो, त्यामुळे मी आमदार म्हणून समाधानी आहे. पण सध्या मला वाटतं की मी आता पक्षासाठी काम करावं. म्हणून अकोल्यात शिवसेना वाढीचं काम करत आहे. आमचं काम पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या कामाचा सन्मान करतील, असा विश्वास राजापूरचे माजी आमदार राजन तेली यांनी बोलून दाखवला.

पुण्यातून अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने सुटका

पुण्यातून अपहरण झालेल्या तरुणाची सुपा पोलिसांनी पाठलाग करून फिल्मी स्टाईलने सुटका केली आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

प्रस्थापितांना घरी बसविण्यासाठी मी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यास तयार : प्रा. लक्ष्मण हाके

प्रस्थापितांना घरी बसविण्यासाठी मी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासाठी तयार आहे, हे मी जबाबदारीने बोलतो, असे विधान ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

तुम्ही किती लोकांना पाकिस्तानी म्हणणार आहात? : अभिजीत दिपके

मी पुन्हा अमेरिकेत जाणार नाही. देशात किती लोकांना तुम्ही पाकिस्तानी म्हणणार आहात. देशात फक्त भाजपच भारतीय आहेत का? ‘जंतर मंतर’वरील आंदोलन म्हणजे आम्ही घाबरणार नाही, हा संदेश आहे. आता मी एकटा नसून लाखो तरुण माझ्यासोबत आहेत, असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला काय समस्या आहे? : अभिजीत दिपके

तुम्ही युद्ध थांबवू शकता, तर पेपरफुटी का थांबवू शकत नाही. शिक्षणव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला काय समस्या आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत. आम्ही आता देशातील प्रत्येक मुद्दा उचलणार आहोत. त्यामुळे आम्ही संपूर्ण देशभर आंदोलन करणार आहोत, असे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सांगितले.

राज्यातील 353 पैकी 181 तालुक्यांवर दुष्काळाचे सावट; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला फटका

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी १८१ तालुक्यांवर यंदा दुष्काळाचे सावट आहे. यातील बहुतांश तालुके हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आहेत. सुमारे ४१ तालुक्यांत ५०० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडणार आहे, असा अंदाज मुंबई आयआयटीच्या भारत फोरकास्ट सिस्टिमकडून वर्तविण्यात आलेला आहे.

NCP Meeting राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटीची बैठक, राज्यसभेच्या जागेबाबत निर्णय होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संध्याकाळी ६ वाजता कोअर कमिटीची बैठक देवगिरी निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्याबाबत बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकतो. बैठकीला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार असून मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्यासाठी घातलेली अट आणि भाजप हायकंमाडचा निरोप याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

Navneet Rana  नवनीत राणांचा पत्ता, राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाहीच 

नवनीत राणा यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. राणा यांनी दोनवेळा सुनेत्रा पवारांची भेटही घेतली. मात्र, नवणीत राणा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांचेच नाव निश्चित होण्याची शक्यता वाढली आहे,

ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवांसाठी करार

राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ‘उडान’ प्रकल्पांतर्गत ही सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दोन स्वयंसेवी संस्थांमध्ये पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था, सौसर (मध्य प्रदेश) आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्याने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

Shiv Sena : साहेबराव कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश

विधान परिषद निवडणुकीत यवतमाळमधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळेंनी माघार घेत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर काँग्रेसने कांबळेंचे निलंबन केले. आता साहेबराव कांबळे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Maharashtra rain update : महाराष्ट्रात पाऊस दाखल, पण जोर कमी राहणार

दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक नसेल.

Baramati News : सुनेत्रा पवारांकडून बारामतीतील नुकसानीची पाहणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती शहर आणि परिसरात वादळी पावसाने प्रभावित झालेल्या भागाची पाहणी केली. उन्मळून पडलेल्या झाडांचे मुळासकट पुनर्रोपण करण्याचे तसेच पावसाळ्यापूर्वी नव्याने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

TMC Yusuf Pathan : ममता बॅनर्जींनी राजीनामा मागितल्याचे वृत्त निराधार; युसूफ पठाण यांचे स्पष्टीकरण

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या एका मोठ्या चर्चेला पूर्णविराम दिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युसूफ पठाण यांच्याकडे त्यांच्या खासदारकीचा राजीनामा मागितल्याचा दावा केला जात होता, जो युसूफ पठाण यांनी पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले.

Sonam Wangchuk on CJP Protest : अभिजीत दिपकेंना अटक केल्यास.., सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला इशारा

नीट पेपर लीक आणि देशातील परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आज दिल्लीत सुरू असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. लडाखचे सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारला थेट आणि मोठा इशारा दिला आहे. जर आंदोलनात 'CJP'चे संस्थापक अभिजीत दिपके किंवा इतर कोणत्याही कार्यकर्त्याला अटक केली, तर मी थेट 42 दिवसांचे 6 आठवडे अन्नत्याग उपोषण सुरू करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Pune Update : तुळापूर इथल्या रेव पार्टीत लाखो रुपयांची विदेशी दारू, गांजा, तांबखू अन् हुक्का पोलिसांकडून जप्त

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर या परिसरातील एका आलिशान बंगल्यात काल मध्य रात्री रेव पार्टी सुरू होती. पुणे पोलिसांना या बाबतची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी मध्य रात्री अचानक छापा घालण्यात आला. 100 पेक्षा अधिक तरुण-तरुणी या ठिकाणी सहभागी होत्या. शनिवारी रात्री 11 वाजेपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आयोजकांनी परवानगी घेतली होती.परवानगी संपल्यावर ही पार्टी सुरु होती. 21 वाया पेक्षा कमी वयाची मुले मुली ही या रेव पार्टीत सहभागी झाले होते. या प्रकरणी ज्यांनी हा बंगला उपलब्ध ज करून दिलालंय त्यांची ही तपासणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य, गांजा, हुक्का शिशा पॉटआणि इतर काही तंबाकूजन्य पदार्थ सापडले असून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांच्या आधारे गुन्ह्या दाखल केला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

Solapur News : शक्तिपीठ महामार्गाविरोधात करकंब गाव बंद; व्यवहार ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत

शक्तिपीठ महामार्गाला सोलापूर जिल्ह्यात मोठा विरोध वाढू लागला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे आज गाव बंद ठेवून विरोध केला. येथील शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. बाजारपेठेतील बंद ठेवल्याने गावातील व्यवहार ठप्प झाले.

Market Update : भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कांदा फेकून देण्याची वेळ

कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. उत्पादन खर्चही पदरी येत नाही, त्यात माल कुठे आणि कसा साठवायचा हा प्रश्न डोळ्यासमोर आहे. त्या परिस्थितीत कांदा टाकून देण्याचा पर्याय शेतकरी निवडत आहेत. कष्टाने पिकविलेले पीक मातीमोल झाल्याने मेंढ्यांना चारा म्हणून देण्याची वेळ आली आहे. कांद्याचा प्रश्न आणि चाऱ्याची टंचाई, अशा दुहेरी संकटांना शेतकऱ्यांना सध्या सामोरे जावे लागत आहे. उंडवडी सुपे परिसरात मेंढपाळाने 700 मेंढ्यांच्या पोटासाठी चक्क ट्रकभर कांदा खाऊ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Yavatmal Politics Update : विधान परिषदेला माघार घेणारे साहेबराव कांबळे आज एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार

काँग्रेस यवतमाळ विधान परिषद निवडणूकतीतून माघार घेणारे साहेबराव कांबळे एकनाथ शिंदे शिवसेनेत आज प्रवेश करणार आहे. काँग्रेसच आणि प्रहारचे पदाधिकारी कांबळे यांच्यासोबत हा पक्ष प्रवेश करतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल नंदनवन इथल्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश कार्यक्रम होईल.

Baramati Update : पाटस गोळीबार प्रकरणातील आरोपींची यवत पोलिसांनी काढली धिंड; 18 आरोपींवर गुन्हा दाखल

दौंड तालुक्यातील पाटस इथं गरदडे कॉम्प्लेक्ससमोर गोळीबार करत दहशत वजवणाऱ्या आरोपींची यवत पोलिसांनी भर रस्त्यावरून धिंड काढत कायद्याचा धाक दाखवला आहे. या प्रकरणात तब्बल 18 संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले असून त्यापैकी दहा संशयित आरोपींना यवत पोलिसांनी अटक देखील केलेली आहे.

Solapur MLC Election : शिवसेना ठाकरे सेना अन् शरद पवार राष्ट्रवादीचा पाठिंबा; भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा मोठा दावा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचे समोर आले आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर, अभिजीत पाटील यांनी भाजपला पूरक भूमिका घेतली असतानाच, कुर्डुवाडी नगरपालिकेच्या शिवसेना ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, असा मोठा दावा उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या दाव्याने महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.

नवनीत राणांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

माजी खासदार नवनीत राणा यांनी मुंबईत 'देवगिरी' निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. ज्यामुळे राणांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, रिसॉर्टवर छापा

पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत एका रिसाॅर्टवर छापा टाकला. अंमली पदार्थांच्या वापर तेथील पार्टीत केल्याचा संशय पोलिसांना आहे. या छाप्यामध्ये तरुणी-तरुणींसह अनेकांना ताब्यात घेण्यात आले. यातील अनेक जण आयटीयन्स असल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी

तालुक्यात शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसामुळे काऱ्हाटी परिसरात केळी पिकाचे नुकसान झाले, या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रत्यक्ष केळी पीक क्षेत्रावर जावून झालेल्या नुकसानीबाबत पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून राज्यशासनाच्यावतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

महागाईचा फटका, घरगुती सिलेंडर महागला

सर्वसामन्यांचं बजेट कोलमडणार आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत सिलेंडरची किंमत 941.50 रुपयांवर गेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com