
काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी जून महिन्यात सरकार कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आज पुण्यातील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, यावेळी फडणवीसांनी म्हटले की, ‘कर्जमाफीच्या संदर्भात आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे, या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे, काही जिल्ह्यांची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत. ‘
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे, ते 30 मे पासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सातत्याने मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक गोष्टी केल्या आहेत. यामध्ये सरकारने सारथी सारखी संस्था निर्माण केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक मराठा तरुण स्पर्धा परीक्षेत उत्तम यश संपादन करत आहेत. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून रेकॉर्ड इतके उद्योजक मराठा समाजातून आपण तयार केले आहेत. शिक्षणाच क्षेत्र असो, सगळ्या स्कॉलरशिप आपल्या सुरू आहेत. ज्यांना होस्टेलमध्ये जागा मिळत नाही, त्यांच्यासाठी निर्वाह भत्त्याची योजना आपण चालवतो. नवीन होस्टेल तयार करत आहोत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी तपास यंत्रणांनी आता पालकांची चौकशी सुरू केली आहे. नांदेडमधील एका पालकाने आपल्या पाल्यासाठी पाच लाख दिल्याचा संशय आहे. संंबंधित पालकाची चौकशी केली जात आहे.
राज्यात सध्या भरपूर वीजसाठा असून कुठेही विजेची कमतरता नाही. ऊर्जा संकट सध्या नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांनी आज स्पष्ट केले.
हिंगोलीमध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर आंदोलन केले. जिल्ह्यातील सुमारे २० पंपावरील साठा संपल्याचा दावा केला जात आहे. शेतीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील छत्रपती श्री संभाजी महाराज उद्यान येथील स्वराज्यरक्षक, धर्मवीर, बुधभूषण ग्रंथाचे रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
आरक्षणाच्या नव्या नियमांचा अभ्यास असता तर विरोध केला असता. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही. सरकारच्या या धोरणाला मंत्री संजय राठोड यांनी विरोध दर्शविला आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. माझं मंत्रिपद वाचलं म्हणून मी सूस्त राहणार नाही. भूमिका घ्यायला हा संजय राठोड मागंपुढं पाहणार नाही, असंही त्यांनी सांगितले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत, त्यामुळे ही तुटलेली मनं एक होण्याची शक्यता नाही. पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर जेव्हा उभा राहतो, त्यावेळी अशा गोष्टी, काही कारणं लावून पुन्हा उद्रेक होणार आहे, अशी भविष्यवाणी महायुतीमधील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे.
नीटचा २०२४ पेपर फुटला, पण पेपर रद्द झाला नाही. मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. पण सीबीआयाने चौकशी सुरू केली. पण त्यावेळी सरकारने चौकशीसाठी एक समिती नेमली. तसेच, नीट २०२६ पेपर फुटला, परीक्षा रद्द केली. मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. सीबीआय पुन्हा तपास करत आहे. चौकशीसाठी आणखी एक समिती स्थापन केली जाईल. मोदीजी देश तुम्हाला प्रश्न विचारतोय, उत्तर द्या. पेपर वारंवार का फुटतोय? परीक्षा पे चर्चावर तुम्ही गप्प का आहात.?फेल ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांना बडतर्फ का करत नाही?
पुण्यातील जमिनीच्या वादातून ज्येष्ठ सिने अभिनेत्री उषा चव्हाण यांनी राज्य सरकारचे पुरस्कार परत देण्याची घोषणा करत संताप व्यक्त केला आहे. न्यायालयीन वादात असलेली कुटुंबाची संपत्ती अजूनही विभाजित आहे. आमच्या हिश्याची जमीन पुणे महापालिकेने परस्पर एका बिल्डरला दिली आहे. त्याबाबत माझा मुलगा महापालिकेत गेला होता. त्या ठिकाणी अपमानास्पद काही गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे आम्ही आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मामाकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे स्थानकात अत्याचाराची घटना घडली आहे. नसरापूरमधील घटना ताजी असतानाच पुन्हा तशाच प्रकारची घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांपी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
नंदुरबारच्या धडगावमध्ये इंधन संपणार अशा केवळ एका अफवेने मोठा गोंधळ निर्माण झालाय. पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या एक-दीड किलोमीटर लांब रांगा लागल्यात. भर उन्हात नागरिक डिझेल आणि पेट्रोलसाठी तासनतास ताटकळत उभे आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोक हातात प्लास्टिकचे ड्रम आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन इंधन भरण्यासाठी गर्दी करतायंत शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात इंधन टंचाईचे सावट असून नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे..
TCS धर्मांतर प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आलाय. या प्रकरणी SIT कडून 900 पानांचे पहिले आरोपपत्र पुढील 2 दिवसात दाखल करण्याची शक्यता आहे. TCS प्रकरणातील मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांतील एकूण 9 गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यात आलाय. तपास यंत्रणांकडून सध्या आर्थिक व्यवहारांची आणि पुराव्यांची छाननी सुरू आहे. दरम्यान, साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता असल्याने सत्र न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळलेय.....
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत आलीय. तांत्रिक पेचामुळे आमदारकी अडचणीत आल्याची माहिती समोर येतेय. झिशान सिद्दीकी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या AB फॉर्मवर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी आहे. मात्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आयोगाला दिलेल्या अधिकृत पत्रात तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय... पत्रातील ही तांत्रिक त्रुटी तटकरेंच्या स्वाक्षरीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरलीय.. त्यामुळे झिशान सिद्दीकींचं पद धोक्यात येणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय..
अजित पवार राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक बदलांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पक्षातर्फे करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या पदांवर कायम असून त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणेच पूर्ण अधिकार आहेत, असे स्पष्टीकरण पक्षाने दिले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गतच असलेले संभ्रमाचे वातावरण निवळले आहे.
पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले असून शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेडातील विद्युतनगर भागात धडक कारवाई केली. इथल्या कदम कुटुंबीयांच्या निवासस्थानी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी आणि झाडाझडती घेतली. मुलीसाठी पाच लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप या कुटुंबावर आहे. लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे हे पथक थेट नांदेडात दाखल झाले होते.
राज्यात तीव्र पडसाद उमटवणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. अशोक खरात याला त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या होत्या. तेव्हापासून सुरू झालेल्या तपासाचा विळखा आता अधिकच घट्ट झाला आहे. गेल्या दोन महिन्यात या प्रकरणात केवळ अंधश्रद्धाच नव्हे, तर महिलांवरील लैंगिक अत्याचार, कोट्यवधींची आर्थिक फसवणूक, पतसंस्थांमधील बोगस खाती आणि राजकीय कनेक्शनपर्यंतचे अनेक धागेदोरे समोर आले आहेत.
जनतेला पेट्रोल डिझेल कमी वापरा म्हणून उपदेश करणाऱ्या सरकारने, तेल कंपन्यांना निर्यात कमी करा असं सांगायची हिंमत का दाखवली नाही?
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 16, 2026
१ लाख ३२ हजार कोटींचं कच्चं तेल आयात करायचं, त्यातील ५२ हजार ८७६ कोटींचं तेल परदेशात विकायचं आणि मग देशातील नागरिकांच्या खिशातून महाग पेट्रोल डिझेलच्या… pic.twitter.com/mv4r1vVC2z
जनतेला पेट्रोल डिझेल कमी वापरा म्हणून उपदेश करणाऱ्या सरकारने, तेल कंपन्यांना निर्यात कमी करा असं सांगायची हिंमत का दाखवली नाही? 1 लाख 32 हजार कोटींचं कच्चं तेल आयात करायचं, त्यातील 52 हजार 876 कोटींचं तेल परदेशात विकायचं आणि मग देशातील नागरिकांच्या खिशातून महाग पेट्रोल डिझेलच्या नावाखाली पैसे वसूल करायचे. म्हणजे नफा कंपन्यांचा आणि लूट सामान्य माणसाची, असा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. भारतीय जनता पार्टी सरकारला जनतेच्या खिशाची नाही तर उद्योगपतींच्या तिजोरीची जास्त काळजी आहे, हे पुन्हा स्पष्ट झालं. स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी देशभक्तीच्या घोषणा दिल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला अक्षरशः पिळलं जातं, अशीही टीका वड्डेटीवार यांनी केली आहे.
धुळ्यातील साक्री तालुक्यामधील वर्धाने व उभरांडी शिवारात एका महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळला. शिरपूर इथल्या दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच 24 तासांत ही दुसरी घटना समोर आली. या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित भोंदू बाबाला अटक केली आहे. भडगाव (वर्धाने) टेंभे फाट्याजवळ जयश्री काकुस्ते (वय 25) या विवाहितेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगावर दुचाकी टाकलेली होती व तोंड रुमालाने बांधलेले होते. घटनास्थळी तिचा मोबाईल व पर्स सुरक्षित असल्याने लुटीचा हेतू नसल्याचे पोलिसांनी सांगितले. जयश्री ही खासगी कंपनीत कलेक्शनचे काम करत होती. निजामपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून योगेश उर्फ भैय्या खैरनार याला ताब्यात घेतले. तो स्वतःला ‘महाराज’ म्हणवत मठात भविष्य सांगण्याचे काम करत होता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नियुक्तीच्या वादावरून चर्चांना तोंड फुटलं आहे. पक्षात काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री उशिरा पार पडलेल्या या गुप्त बैठकीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भांडुपच्या प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आशा कोपरकर त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि चालकावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर या नगरसेविका आहेत. पतीशी संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेचे अपहरण, मारहाण आणि धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेनं भांडुपच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चार ठिकाणी छापा घालत चार लाख 40 हजार 296 रुपये किमतीचा गुटखा व पानमसाला आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 22 लाख रुपये किमतीची तीन वाहने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली आहे. शरद सिताराम वडवकर (रा. लोणी व्यंकनाथ) व नागेश नीलकंठ सुमकवर (रा. श्रीगोंदा) या दोघांना कारवाईत अटक केली आहे.
देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय अन्वेषण विभागाने नाशिकमधून अटक केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शुभमच्या थेट संपर्कात असलेले नाशिकमधील अनेक मोठे मासे आता 'सीबीआय'च्या रडारवर आले असून, यात काही प्रतिष्ठित क्लासचालकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारकडून या प्रकरणात न्याय होताना दिसत नाही. कोणताही पुरावा नसलेल्या टीसीएस प्रकरणात घरे पाडली जातात. संशयतांना अडकवण्यासाठी सर्व यंत्रणा काम करते. मात्र पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणात फक्त कोठडी मिळते? त्यांची घरे कधी पाडणार, असा सवाल माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे.
आमदार अनिल पाटलांकडून अंमळनेर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान, रुग्णालयातील अस्वच्छता तसेच सुविधांवरून अनिल पाटलांनी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. रुग्णांनी या रुग्णालयात मरायला यायचं का? या शब्दात आमदार अनिल पाटील यांनी संताप व्यक्त केला.
भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि कारचालकावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर एका महिलेचे अपहरण मारहाण आणि धमकवल्याचा आरोप आहे. पतीशी संबंध असल्याच्या संशयातून आशो कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महिलेचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
पुणे जिल्ह्यात बालसंस्काराचे मुख्य केंद्र असलेल्या अंगणवाडी केंद्रांच्या पायाभूत सुविधांबाबत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. डिजिटल आणि स्मार्ट अंगणवाड्यांच्या गप्पा मारल्या जात असताना, प्रत्यक्षात जिल्ह्यातील तब्बल ३२३ अंगणवाडी केंद्रांना स्वतःची हक्काची जागाच उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात दौऱ्यावर आहेत. महापालिकेंच्या विविध कामाचे भूमिपूजन, लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुण्यात विविध कार्यक्रमाये आयोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.