Maharashtra Politics Live Update: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा दणका; फलटण येथील यशवंत सहकारी बँकेचा परवाना रद्द

Maharashtra Breaking News Today LIVE 20 May : विधान परिषद निवडणूक, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सांगलीतील दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, अमेरिका-इस्त्रायल युद्ध थांबणार डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा दणका; फलटण येथील यशवंत सहकारी बँकेचा परवाना रद्द

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता याच बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. फलटण येथील यशवंत सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. आरबीआयकडून यासंदर्भातील आदेश 18 मे रोजी जारी केला आहे. ही कारवाई बँकिंग नियमन कायदा 1949 च्या सेक्शन 22 व सेक्शन 56 नुसार करण्यात आली आहे.

शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आली समोर 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्याचं समोर आलं होतं. त्यांनी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. देशाच्या बाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम ते करत आहेत, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, असं पवारांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पवारसाहेबांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. कारण अनेकजण पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करत होते. पण विरोधकांनी विनाकारण टीका करू नये, ते देशहितासाठी काम करत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वांद्रे परिसरात अतिक्रमण हटावला विरोध,पोलिसांवर फेकल्या बाटल्या; लाठीचार्जची कारवाई

मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या गरीब नगरमध्ये अतिक्रमण कारवाई केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरातील झोपडपट्टींसह अनधिकृत बांधकामांवर पश्चिम रेल्वेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली. कोर्टाच्या आदेशानंतर हे सर्व अतिक्रमणे हटवण्यात येत आहे. या कारवाईला विरोध करतानाच रहिवाशांकडून काही जणांकडून पोलिसांवर बाटल्यांसह दगडफेक करण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी आक्रमक पावित्रा घेत त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी जादाची कुमक मागवली आहे.

Maharashtra news : राज्यात डिजिटल जनजागृती वाढविण्यासाठी करार

राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मोबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे राज्यातील नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवांची माहिती पोहोचविणे, पडताळणी प्रक्रिया सक्षम करणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

राज्यात हवामानाचा दुहेरी इशारा! कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उष्णतेची तीव्र लाट

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वारेही वाहू शकतात. दुसरीकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानाचा विचार करून आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देश आर्थिक अडचणीत, तरी पंतप्रधान परदेश दौऱ्यात व्यस्त, राहुल गांधींची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यावर निशाणा साधला आहे. देशात महागाई आणि आर्थिक समस्या वाढत असताना पंतप्रधान परदेशात भेटवस्तू देण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट भेट दिल्याच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात केमिस्टांचा संप; मेडिकल दुकाने बंद ठेवून मोर्चा

ऑनलाइन औषध विक्रीमुळे बनावट औषधे आणि अंमली पदार्थांचा अवैध व्यापार वाढत असल्याचा आरोप करत राज्यातील केमिस्ट आणि मेडिकल दुकानदारांनी संप पुकारला. अनेक ठिकाणी मेडिकल दुकाने बंद ठेवून मोर्चे काढण्यात आले. या प्रकारामुळे तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगत संघटनांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.

मोटेगावकर क्लासच्या पुणे कार्यालय सील; NEET तपासात मोठी घडामोड

NEET पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांनी मोटेगावकर क्लासच्या पुण्यातील कार्यालयावर मोठी कारवाई करत कार्यालय सील केले आहे. या ठिकाणाहून महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती तपासासाठी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून प्रकरणातील तपास अधिक वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

लातूरमध्ये CBIची मोठी कारवाई; मोटेगावकरच्या संपर्कातील पालक-डॉक्टरांची चौकशी

नीट पेपर लीक प्रकरणाच्या तपासासाठी CBIची दोन पथके गेल्या 6 दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहेत. शिवराज मोटेगावकर यांच्या संपर्कातील काही डॉक्टर आणि पालकांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मोटेगावकर क्लासेसजवळील हॉस्टेलचीही तपासणी करण्यात येत असून या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Chhagan Bhujbal : जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम

सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, त्याचे सावट आता आपल्यावरही दिसू लागले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इंधन साठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या देशाकडे पेट्रोल आणि डिझेलचा किती साठा शिल्लक राहिली आहे याची माहिती दिली आहे. आमच्याकडे सध्या केवळ १ महिना पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे,” असा खळबळजनक खुलासा भुजबळांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाची मोठी टंचाई निर्माण होणार का, अशी भीती आता नागरिकांमध्ये पसरली आहे.

Bjp News : मंत्रिमंडळ उपसमितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई: महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. राज्याचे महसूल मंत्री आणि या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे. नॉन क्रिमीलेअरची मर्यादा ८लाखांहून १५ लाखांपर्यंत करण्याची शिफारस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने केली असून या शिफारशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊ, असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

पुण्यातील टोळीयुद्धाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या म्हस्केच्या भावाची बालाजीनगर परिसरात हत्या करण्यात आली आहे. आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धातून चौथी हत्या झाली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के असल्याची माहिती समोर येत आहे. पण बंडू आंदेकर जेलमध्ये असताना ही हत्या झाली कशी? असा सवाल विचारला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाच्या बैठकीला सुरवात, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे उपस्थित 

पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 25 टक्के जलसाठा

राज्यातील 3 हजारांहून अधिक धरणांमध्ये सरासरी 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 44.39 टक्के साठा असून, पुणे विभागात सर्वांत कमी पाणी उरले आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये फक्त 25.26 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना'या' बैठकीला राहणार उपस्थित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत शिंदे स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याविषयी महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील विज्ञान भवन येथे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 (SBM-U 2.0) संदर्भात महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येत आहे.

पुण्यातील बालाजी नगरमध्ये फायरिंग

पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार झाला आहे. यात एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. जुन्या वादातून फायरिंग झाल्याची माहिती पोलिसांनी दिली

वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती ढासळल्याची माहिती आहे. गेले तीन दिवस वाल्मिक कराड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला सलाईन लावण्यात आल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, वाल्मिक कराड याला युरोसिस्टायसिसचा संसर्ग झाल्याची माहिती आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

आरक्षणाचा फायदा घेतलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गात प्रवेश नाकारण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता सरकारने राज्य सरकारने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील विरोधानंतर आता महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

संभाजीनगरमधील भाजपच्या सत्तेला 100 दिवस पूर्ण

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपाने पंचवीस वर्षानंतर पहिल्यादांच स्वबळावर सत्ता मिळवली. 57 नगरसेवकांसह शतप्रतिशत सत्ता आणि तरुण, तडफदार चेहऱ्याचा महापौर देत पक्ष नेतृत्वाने शहवासियांच्या आशा पल्लवित केल्या. दरम्यान, सत्तेत येऊन भाजपला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, शहराच्या विकासाच्या दृष्टिने सक्षम पावले टाकली जात नसल्याची टीका विरोधक करत आहेत.

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहे. महत्त्वाच्या बैठका आणि राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप

देशातील औषध विक्रेत्यांनी आज देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी आणावी, या प्रमुख मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्यातील तब्बल एक लाख 25 हजार विक्रेते या संपात सहभागी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com