Maharashtra Politics Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE 21 May : नसरापूर अत्याचार प्रकरणाची आजपासून विशेष न्यायालयात सुनावणी होणार, यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

ब्रह्मपुरी हे विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं! तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद

विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. आज ब्रह्मपुरी हे विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं असून येथे तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर 46.8 अंशांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर नागपूरमध्ये 46 अंश तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे.

अमरावतीमध्ये 45.8, गडचिरोली आणि वर्धा येथे 46.4, गोंदिया 45.2, यवतमाळ 45 आणि भंडारा 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे. अकोला 44.9 अंशांवर पोहोचलं असून बुलढाणा आणि वाशीममध्येही उष्णतेचा तडाखा कायम आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भात ‘हीट वेव्ह’ कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात कारवाईसाठी गेलेलं सीबीआयचं पथक लिफ्टमध्ये अडकलं 

सीबीआयकडून नीटपेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घरी, हॉस्पिटल आणि बाजूच्या अपार्टमेंटमध्येही कसून झाडाझडती घेण्यात आली. याचदरम्यान शिरुरे यांच्या घराशेजारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये चौकशीसाठी जात असताना सीबीआय पथक लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सीबीआय पथक लिफ्टमध्ये अडकल्याचं समोर आलं. पण काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत झाला अन् सीबीआयचं पथक लिफ्टमधून बाहेर आलं.

पिंपरी चिंचवडमध्ये मॉलवर गोळीबार करणाऱ्या बिष्णोई टोळीतील शूटर्सला पोलिसांनी हरिद्वारमधून उचललं

पिंपरी चिंचवडमधील एजे फर्निचर मॉलवर शुक्रवारी रात्री गोळीबार करणाऱ्या बिष्णोई टोळीतील शूटर्सच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिस पथकाकडून सलग पाच दिवस मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणामार्गे उत्तराखंड असा पाठलाग केला.अखेर पोलिसांनी हरिद्वारमध्ये जाऊन आरजू बिष्णोई टोळीच्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या.

सीबीआयचं नीट पेपरफुटी प्रकरणात कठोर पाऊल; मोटेगावकर, मांढरेंच्या स्वाक्षरीचे नमुने घेणार

महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवून दिलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं आता कठोर पाऊल उचललं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर आणि मनिषा मांढरे यांच्या स्वाक्षरीचे नमुने घेण्यासाठी सीबीआयनं न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.यामुळे या प्रकरणात मोठ्या आर्थिक व्यवहारांसह अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या स्वाक्षरींचे नमुने फॉरेन्सिक विभागाकडून तपासले जाणार आहेत. 

Pune Police : विकास लवांडे यांना अटक

शऱद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात धार्मिक भावना भडकविल्याची तक्रार करण्यात आली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट, पुढील सुनावणी 4 जूनला होणार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही 4 जूनला होणार आहे. या प्रकऱणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघाडल्याचं समोर आलं होतं. त्याला जेलमध्येच सलाईन देण्यात आले होते. याचदरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

भोंदू राजेंद्र गडगेच्या लेकीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भोंदू राजेंद्र गडगे याच्या लेकीसह दोघांचा अटकपूर्व जामीन संगमनेर कोर्टाने फेटाळून लावला आहे. गडगे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस याप्रकरणी त्याच्या लेकीचा शोध घेत आहेत. तंत्रमंत्राच्या मदतीने आजार बरा करत असल्याचा दावा गडगेकडून केला जात होता.

महाराष्ट्रात अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर

अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याची माहितीआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा याच्या वापरामुळे होईल. यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेसोबत करार करण्यात आला आहे.

NEET paper leak : लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात

नीट पेपरफुटीप्रकरणी लातुरमधील डॉक्टर मनोज शिरुरेला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. नीट प्रश्नपत्रिकेसाठी शिरूरेने लाखो रुपये मोजल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या संपर्कातील दोघा विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.

Abhijeet Dipke news : अभिजीत दिपके यांचे अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न

सोशल मीडियात कॉकरेच जनता पार्टी ही चळवळ सुरू करत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या अभिजीत दिपके यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न होत आहे. सीजेपीचे अकाऊंटही हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती दिपके यांनी दिले. सीजेपीचे एक्स अकाऊंट भारतात काही तासांपूर्वीच बंद करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही : सुनील तटकरे

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी भेट घेतली आहे. त्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. आमच्या पक्षाची त्या भेटीत चर्चा होण्याचे कोणतेही कारण नाही, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

चाळीसगावमध्ये वृद्धाकडून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ६५ वर्षांच्या वृद्धाकडून करण्यात आला आहे. चाळीसगाव-नागाद रस्ता अडवून ग्रामस्थांनी रास्तो रोको आंदोलन केले आहे. संतप्त जमावाने आरोपीच्या घराची तोडफोड केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विधान परिषद निवडणुकीचे मतदार हे कर्जमाफीचे घटक नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

शेतकरी कर्जमाफी ही विधान परिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच घोषित केलेली आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदार हे कर्जमाफीचे घटक नाही. पण आवश्यकता असेल तर परवानागी घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

कृषी निर्यातीमध्ये महाराष्ट्राची देशात सर्वाधिक चांगली कामगिरी : देवेंद्र फडणवीस

कृषी निर्यातीमध्ये महाराष्ट्र सरकारने चांगलं काम केलेले आहे. देशातून निर्यात झालेल्या एकूण निर्यातीपैकी द्राक्ष ९४ टक्के, डाळिंब ८५ टक्के, केळी ८६ टक्के, कांदा ८५ टक्के, भाजीपाला १० टक्के, आंब्याचा पल्प : ३३ टक्के निर्यात झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्राने कृषी निर्यातीमध्ये देशात सर्वाधिक चांगली कामगिरी केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खरीप हंगामासाठी 28 लाख टन बियाणे उपलब्ध करून दिलं आहे : देवेंद्र फडणवीस

अल निनोचा सर्वाधिक परिणाम पश्चिम विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात शेतकऱ्यांना दर्जेदार असे २८ लाख मेट्रीक टन बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात जास्तीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. खत पुरवठ्याकडे सरकारचे लक्ष असून खताची लिंकिंग केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

पुण्यात तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिड हल्ला

पुण्यात तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडचा हल्ला करण्यात आला आहे. ‘तू माझी नाही झाली, तर कोणाचीही नाहीस’ असं म्हणत तरुणीवर हल्ला करण्यात आलेला आहे. या प्रकरणी ॲसिड फेक करणाऱ्या माथेफिरूला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे.

विकास लवांडे यांना पुण्यात अटक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माझ्यावर नऊ मे रोजी हल्ला झाला होता, त्याच्या आदल्या दिवशी संग्राम भंडारे यांची भाजपची कार्यकर्ती नलिनी वायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मला पोलिस लोणी काळभोरला पोलिस घेऊन जात आहेत, असे विकास लवांडे यांनी सांगितले.

फडणवीसांची तक्रार करण्यासाठी शिंदे दिल्लीत आले होते : संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला आले होते, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

बीडमध्ये आरसीसीच्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी; कुलकर्णीला नगरपालिकेची नोटीस

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे पथक गेल्या दोन दिवसांपासून बीडमध्ये चौकशी करत आहे. आज अंबेजोगाई येथे सीबीआय पथक विद्यार्थ्यांची चौकशी करत आहे. हे विद्यार्थी मोटेगावरकर यांच्या लातूरमधील क्लासचे विद्यार्थी आहेत. तसेच, पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या पी. व्ही कुलकर्णी याला बीड नगरपालिकेने मोठा झटका दिला आहे. बांधकामचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत, त्यामुळे बीड नगरपालिकेने कुलकर्णी याला नोटीस पाठवली आहे. नोटिशीबाबत तीन दिवसांत खुलासा न केल्यास बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे नरगपालिकेकडून सांगण्यात आले.

Raj Thackeray रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे यांना मोठा दिलासा

रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची घडामोड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडूनही या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.

नाशिकच्या कांद्यावर मोदी-मेलोनीचं चित्र

नाशिकच्या कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं चित्र छापल्याची माहिती समोर आली आहे. या अनोख्या प्रयोगामुळे शेतकरी आणि बाजारपेठेत चर्चांना उधाण आलं असून सोशल मीडियावरही हा विषय व्हायरल झाला आहे.

रेल्वे भरती प्रकरणात राज ठाकरे यांना मोठा दिलासा; कोर्टातून निर्दोष मुक्तता

रेल्वे भरती प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात ते इतर 10 जणांसह आरोपी होते. आज ते ठाणे न्यायालयात हजर होणार होते. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणातून त्यांची सुटका झाली आहे. या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ठाणे ते नाशिक वंदे भारतने श्रीकांत शिंदेंचा दौरा

खासदार श्रीकांत शिंदें यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वंदे भारत ट्रेनने ठाणे ते नाशिक असा प्रवास केला. आज त्यांच्या नाशिक दौऱ्यात चांदवड, मनमाड, येवला, नांदगाव आणि मालेगाव मतदारसंघांमध्ये आढावा बैठका पार पडणार आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

India PM Modi and Italy PM Meloni's Images on Onions राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक उर्फ नैय्या खैरे यांच्या विरोधात मसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भुखंड हडपण्यासाठी भूखंड मालकाला धमकी देत 90 लाखांची खंडणी मागण्याचा आरोप त्यांच्या विरोधात आहे.

कोल्हापूर काँग्रेस शहरध्यक्षपदी प्रवीण केसरकर

गेले अनेक वर्ष कोल्हापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष पद घरातच असणाऱ्या माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांना काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्या जागी नवीन शहराध्यक्ष म्हणून नगरसेवक प्रवीण केसरकर यांना जबाबदारी देण्यात आली

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे - अभिजित दीपके

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काॅकरोच पार्टीचे अभिजीत दीपके यांनी केली आहे. साम टिव्हीशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणऱ्या शिक्षणमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

तीव्र उष्णतेमुळे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेचा परिणाम आता धरणसाठ्यावर दिसू लागला आहे. पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट होत असल्याने आगामी काळात पुण्यावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या चार धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये २६.६१ टक्के म्हणजेच ७.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कांद्याचे दर घसरल्याने केंद्राचे पथक नाशिकमध्ये दाखल

कांद्याचे दर घसरल्याने केंद्राचे पथक कालपासून नाशिक दौऱ्यावर आले आहे. हे पथक विविध बाजार समित्या आणि नाफेड खरेदी केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यलयात केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक होणार आहे.

मोठी बातमी! काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटलांची निवड

काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून प्रवीण केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस निवड समितीने ही नावे जाहीर केली आहेत.

ठाण्यातील भाजी मार्केटमध्ये भीषण आग

ठाणे गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील भाजी मार्केटला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांसह 2 ते 3 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिवराज मोटेगावकर काँग्रेसचाच कार्यकर्ता - अभिमन्यू पवार

'नीट' पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड झाल्यापासून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी मोटेगावकर हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, जिथे स्कॅम तिथे काँग्रेस असा थेट आरोप केला आहे. शिवाय मोटेगावकरने लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेत त्या पक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे तो कोणाचा आहे हे स्पष्ट असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. शिरुरेला सीबीआयकडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे याला पुण्यातून अटक केली आहे. शिरुरे याने शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे.

Rampur village sand mining opposition : ​गोदावरी नदीपात्रातील वाळूपट्टा लिलावाविरोधात ग्रामस्थांची आरपारची लढाई

श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर परिसरातील गोदावरी नदीपात्रातील प्रस्तावित वाळूपट्टा लिलावाविरोधात आता ग्रामस्थांनी थेट आरपारची लढाई छेडली आहे. वाळू उपशाला विरोध करणाऱ्या महिलांवर कथित दगडफेक झाल्यानंतर रामपूर आणि नाऊर येथे झालेल्या विशेष ग्रामसभा अक्षरशः वादळी ठरल्या. संतप्त महिलांनी ‘रणरागिणी’चा अवतार धारण करत, “वाळूचा रस्ता तर होऊ देणार नाहीच, पण नदीपात्रातील वाळूचा एक खडाही उचलू देणार नाही,” असा इशारा प्रशासनाला दिला.

नसरापूर अत्याचार प्रकरणाची आजपासून विशेष न्यायालयात सुनावणी

नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणाची सुनावणी आजपासून पुण्यातील विशेष न्यायालयात होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले असून, आजपासून नियमित आणि जलदगतीने सुनावणी सुरू होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com