Maharashtra News Live Update : केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, ओम राजेनिंबाळकर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

Maharashtra News Live Update : खासदार संजय दिना पाटील यांचे वादग्रस्त विधान, पावसाळी अधिवेशन यासह राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, ओम राजेनिंबाळकर,  खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. याचदरम्यान, ओम राजे निंबाळकर हे खासदार श्रीकांत शिंदे,श्रीरंग बारणे यांच्यासह एकत्रित तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्याचं समोर येत आहे. या दर्शनासाठी ओम राजे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह चंद्रहार पाटील यांनीही तब्बल 11 किमी पायपीट केल्याची माहिती समोर येत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला असल्याचे पुढे आले आहे. हे दोघेही मुंबईहून नागपूरला एकाच विमानातून गेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार सोडून गेलेल्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. त्यासाठी ठाकरे हे सध्या नागपूरला रवाना झाले आहेत. योगायोगाने मुख्यमंत्री फडणवीस हेही त्याच विमानातून नागपूरला गेले आहेत.

Vijay Vadettivar: माझ्या संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत

काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. माझ्या संदर्भात अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगून विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची साथ सोडणार असल्याची चर्चा फेटाळून लावली आहे. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आणखी जोरदार चर्चा सुरू झाली.

हा मराठा समाजाचा कार्यक्रम; तुम्ही तिथं बसल्यानंतर वाद निर्माण होईल : अभिमान्यू पवार म्हणाल्याचा मेधा कुलकर्णींचा दावा

सारथीच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यानंतर प्रोटोकॉलनुसार खासदार म्हणून पहिल्या रांगेत बसण्याचा अधिकार माझा आहे, असे अधिकारी सांगत होते. मात्र, आमदार अभिमान्यू पवार यांना त्या खुर्चीवर बसायचे हेाते. त्यामुळे ‘हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, त्यामुळे तुम्ही तिथं बसल्यानंतर वाद निर्माण होईल,’ असे आमदार पवार मला म्हणाले, असा दावा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला.

धनंजय मुंडेंनी घेतली विलास घुलेंच्या कुटुंबीयांची भेट

केज तालुक्यातील टाकळी येथे हॉटेलमध्ये सुरू असलेला वाद सोडवायला गेलेल्या हॉटेलचालक विलास घुले या तरुण हॉटेलचालकाचा टोळक्याने चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचेही नाव चर्चेत आहे. मात्र हे सर्व आरोप खासदार सोनवणे यांनी फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील नऊ आरोपी अटकेत आहेत. दरम्यान, विलास घुले याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे त्यांच्या घरी पोचले आहेत.

समाज कल्याण वस्तीगृहाची संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी; मंजूर केला होता पाच कोटींचा निधी

सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगर पालकमंत्री संजय शिरसाट हे समाज कल्याण वस्तीगृहाची पाहणी करत आहेत. मंत्री झाल्यानंतर संजय शिरसाठ यांनी पहिली भेट याच वस्तीगृहाला दिली होती त्यावेळी वस्तीगृहाची दयनीय अवस्था बघून पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याच पाच कोटी रुपयांच्या निधी मध्ये काय कामे झालीत आणि वस्तीगृहाची परिस्थिती कशा पद्धतीने सुधारली हे पाहण्यासाठी आज पालकमंत्री पाहणी करत आहेत.

धरण साखळीतील परिस्थिती चिंताजनक! खडकवासला धरण साखळीत यंदा 7.46 टीएमसी पाणी कमी

खडकवासला : खडकवासला धरण साखळी परिसरात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावसाची तुरळक हजेरी कायम असून पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस नोंदविला आहे. मात्र पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ अद्याप दिसून आलेली नाही.

नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी; दोषी अधिकारी होणार थेट बडतर्फ 

नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी महसूल विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.

दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

तसेच 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या कालावधीत मुद्रांक शुल्काशी संबंधित सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलामार्फत सखोल चौकशी होणार आहे.

या तपासातून राज्याच्या तिजोरीला 10 ते 20 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचा मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली

राम मंदिर चोरी प्रकरणात मोठी घडामोड; चंपत राय यांचा महासचिवपदाचा राजीनामा

अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित चोरी प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच ट्रस्टमधील आणखी दोन सदस्यांनीही पदाचा राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे मंदिर ट्रस्टच्या कारभाराबाबत विविध चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

सारथीच्या माध्यमातून मराठा युवकांना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराचा नवा मार्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देताना मराठा समाजातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. विविध कौशल्यविकास कार्यक्रमांमुळे सुमारे 1.75 लाख उद्योजक घडले असून, 506 अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्क सवलतीचा लाभ देण्यात आला आहे.

सामंतांच्या ऑफरवर वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण; काँग्रेसशी निष्ठा कायम असल्याचा पुनरुच्चार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंत यांच्या ऑफरबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी पक्षांतराच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सत्ता किंवा पदासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच बदनामीचे राजकारण थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लोहगड दुर्घटनेनंतर केतन अग्रवालच्या कुटुंबाची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी

लोहगड किल्ल्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात सिया गोयलने केतनला कड्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Sanjay Raut : राम मंदिराला शिवसेनेने दिलेली चार किलो वजनाची चांदीची वीट गायब; संजय राऊत यांचा संताप

अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे! असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मंदिराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Solapur News : सोलापूर महापालिकेच्या निवडणूक खर्चात वाढ; स्थायी समिती सभापतींकडून बिलावर आक्षेप

नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीत झालेल्या खर्चावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीतील विविध कामासाठी 1 कोटी 70 लाख असताना पालिकेला चक्क 6 कोटी 70 लाख रुपयांची बिलं सादर केली आहेत. सादर बिलात तब्बल 4 पटीने रक्कम वाढल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. अचानक वाढलेल्या कामामुळे बिलं वाढल्याचा दावा संबंधित ठेकेदाराकडून केला जातोय. यासंदर्भात पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी समिती गठीत करत चौकशीचा आदेश दिला आहे.

Sandeep Deshpande MNS : मनसे नेते संदीप देशपांडे यांचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संदीप देशपांडे यांनी थेट एक फोटो प्रसिद्ध करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री आणि पोलिसांकडे केली आहे. संदीप देशपांडे यांनी, 10 कोटींची केबल चोरी आणि फरार आरोपीचं कनेक्शन सांगितलं आहे. हे असे लोक खरोखर असतील तर ते खासदारांसोबत काय करत आहेत? काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला होता ती गाडी याच व्यक्तीच्या नावावर आहे का? या व्यक्तीचा खासदारासोबत फोटो आहे. माझी माहिती आहे की ही व्यक्ती गुन्हेगारीमध्ये आहे, असा आरोप त्यांनी केला.

Gadchiroli Update : गडचिरोलीतील पाच रुग्णवाहिका दोन वर्षांपासून बंद; गैरव्यवहाराच्या चौकशीची विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची मागणी

गडचिरोली जिल्ह्यातील पाच रुग्णवाहिका गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णवाहिकांच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णवाहिका तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

Sharad Pawar NCP : आमचा एकही खासदार फुटणार नाही; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा एकही खासदार पक्ष सोडणार नाही, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. राजकीय घडामोडी आमच्या पक्षात घडणार नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी राजकीय चर्चांवर पूर्णविराम दिला. शरद पवार बारामती दौऱ्यावर होते. या वेळी युगेंद्र पवार देखील त्यांच्याबरोबर होते.

Sparks again Sea of Hormuz : होर्मुजच्या समुद्रात पुन्हा ठिणगी! जहाजावर भीषण हल्ल्यानंतर शेकडो जहाजे अडकली

जागतिक व्यापार आणि इंधनाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ एका जहाजावर झालेल्या भीषण प्रक्षेपणास्त्र हल्ल्यानंतर या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने या भागातून सुरक्षित जहाजे बाहेर काढण्याची आपली मोहीम तूर्तास स्थगित केली आहे. सुरक्षा सुनिश्चित होईपर्यंत हे काम थांबवले जाईल, असे जाहीर करण्यात आल्याने जागतिक नौकानयन क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे.

Mumbai Crime : किरकोळ कारणातून 15 वर्षीय मुलावर मुंबईत चाकू हल्ला

मुंबई लोकलमधील अलीकडील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, विरारमध्ये पार्किंगला गाडी लावण्याच्या किरकोळ वादातून 15 वर्षीय मुलावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेतील कारगिल नगर, गणेश चौक परिसरातील महाकाली अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. या हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामध्ये आरोपी चाकूने हल्ला करून पसार झाला आहे. शहीद शाह (वय 15), असे गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून, त्याच्यावर विरार पूर्वेतील रेडिएंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Sindhudurg Mahavitaran : स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाची महावितरण कार्यालयावर धडक

कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली धडक मारत स्मार्ट वीज मीटर, वाढीव वीज बिले आणि धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी झालेल्या चर्चेत स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या मुद्द्यावर वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, लोकांच्या संमतीशिवाय मीटर बसविणे अयोग्य असल्याचे सांगितले.

Mumbai Update : मयांक लोहार हत्याप्रकरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मयांकला न्याय मिळवून देण्याची कुटुंबियांना ग्वाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकल मधील हत्या झालेल्या मयांक लोहार यांच्या वडिलांसोबत फोन वरून चर्चा करून सांत्वन केले आहे. सरकार पूर्ण ताकद निशी कुटुंबियांच्या पाठिशी राहणार, असे सांगितले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले आहे.

Farmer News : शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव; युरिया तुटवडा की काळाबाजार?

266 रुपयांची युरियाची बॅग 300 ते 350 रुपयांना विकली जात आहे, कृत्रिम खतटंचाई निर्माण केल्याचा आरोप पवन मावळातील शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी सेवा केंद्रावर युरिया उपलब्ध असूनही तो दिला जात नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट कृषी अधिकाऱ्यांनाच घेराव घालत जाब विचारला. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कृषी अधिकारी आणि खत युरिया विक्री करणारे वितरक यांच्या मनमानी कारभारामुळे पवन मावळातील बळीराजा मात्र त्रस्त आहेत.

मंत्रिमंडळात फेरबदल होणार; राज्यातील 2 खासदारांना संधी

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन खासदारांचे नाव चर्चेत आहे.

स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे सेना आक्रमक 

कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने धडक देत स्मार्ट वीज मीटर, वाढीव वीज बिले आणि धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी झालेल्या चर्चेत स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. .सावरकर सभागृह (दादर) येथे बैठक होणार आहे...या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरल्याचं बोललं जात आहे.

संत उद्धवबाबा मंदिरात चोरट्यांचा डल्ला, चांदीच्या वस्तू लंपास

यवतमाळ जिल्ह्यातील मानकी आंबा येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत उद्धवबाबा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून साडेपाच किलो चांदीच्या वस्तू आणि दानपेटीतील ६० हजार रुपये असा एकूण अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Sangali: महापौरांनी विद्यार्थ्यांकडून घेतला शैक्षणिक आढावा

सांगली महापालिका क्षेत्रातल्या शाळांच्या महापौरंकडून पाहणी करण्यात आली आहे. मिरजेतील महापालिकेच्या शाळेमध्ये महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अचानक जाऊन भेट दिली. यावेळी शिक्षणाचा आढावा थेट विद्यार्थ्यांच्याकडूनच महापौर धीरज सूर्यवंशी यांनी घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com