Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 May 2026: राज्यासह देश विदेशातील सर्व राजकीय, प्रशासकीय घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कांद्याचा प्रश्न सुटणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतरही मंत्री व सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते. तसेच या बैठकीत दोन लाखांऐवजी दहा लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफनं करावी. याचबरोबर व्यापारी नव्हे,तर शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी व्हावी यांसारख्या विविध मागण्या केल्याचं फडणवीस म्हणाले. या बैठकीत कांदा आणि साखर प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

एमएनजीएलकडून पुण्यात पुन्हा एकदा सीएनजीची दरवाढ, नवे दर लागू

जागतिक पातळीवर उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तीव्र इंधन टंचाईचा फटका भारतासह इतर देशांनाही बसतो आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅस सीएनजीच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच एमएनजीएलनं पुण्यात पुन्हा एकदा सीएनजीची दरवाढ केली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपये 50 पैसे इतकी वाढ करण्यात आली असून आता नवे दर   94 रुपये 75 पैसे प्रति किलो असणार आहेत.

टीसीएस कंपनीनंतर आता मुंबईतील बँकेतही महिलेच्या धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार? पतीची पोलिसांत तक्रार 

नाशिकमधील टीसीएस आयटी कंपनीतील लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणानं मोठी खळबळ उडवली होती. याचदरम्यान, आता मुंबईतील एका नामांकित बँकेतही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या पतीकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत त्याने पत्नीचे बँकेतील कर्मचारी साफीन गोदल याच्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच पत्नी गेल्या काही महिन्यांपासून इस्लाम धर्माचा अभ्यास, बुरखा घालणे, रोजा ठेवणे यांसारख्या अनेक गोष्टी करत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल देण्याच्या सूचना

यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांची पाहणी करून इंधन पुरवठा व साठा व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच इंधन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, सीसीटीव्हीचा डेटा सुरक्षित ठेवावा तसेच इंधन साठ्याबाबतची माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जेएनपीए बंदरातील आयात, निर्यात होणार ठप्प

उरण येथील जेएनपीए बंदरात न्हावा शेवा कंटेनर ॲापरेशन असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा पर्याय निवडला आहे. यामुळे २८ तारखेपासून बंदरात कंटेनरचे लोडींग, अनलोडींग बंद करण्यात येणार असून संपूर्ण आयात निर्यात ठप्प होणार आहे.

जनगणनेचा पुण्यात पहिला बळी? रस्ते अपघातात शिक्षिकेचा मृत्यू; शिक्षकांचा तीव्र संताप

ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जनगणनेच काम करावं लागत असल्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये नाराजीचा स्वर पाहायला मिळत आहे. दरम्यान जनगणनेच्या कामाला दांड्या मारणाऱ्या शिक्षकांवर थेट गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या राज्य शासन आणि शिक्षक यांच्यामधील तणाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच केंद्र सरकारच्या जनगणनेच्या शासकीय कामासाठी घराबाहेर पडलेल्या शिक्षिकेचा भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे घडली आहे.

माथेरान-नेरळ घाट रस्त्यावर जड-अवजड वाहनांना बंदी

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत (MSIDC) माथेरान-नेरळ-कळंब रस्त्याच्या सुधारणेची कामे हाती घेण्यात आली आहेत. तर माथेरान-नेरळ-कळंब रस्ता (एसएच-१०९) किमी ०+०० ते किमी २०+४०० पर्यंतच्या रस्ता सुधारणा कामासाठी तात्पुरती वाहतूक वळविणे शक्य नसल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी सदर मार्गावर जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

काँग्रेस नेत्यांसह पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचाली वेगाने सुरू होण्याची अपेक्षा असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र कमालीची शांतता पाहायला मिळत आहे. महायुतीचे वाढते संख्याबळ, भाजप-शिंदेसेनेची आक्रमक तयारी आणि निवडणुकीत लागणार्‍या ‘रसद’च्या मोठ्या गणितामुळे काँग्रेसचे अंतर्गत वातावरण पूर्णपणे थंडावल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर लागणारा आत्मविश्वास, रणनीती आणि जोश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आचारसंहितेमुळे जून महिन्याचा लोकशाही दिन रद्द

जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे जून २०२६ मधील दिनांक १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

शिवसेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांचा विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीवर निशाणा

विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीने जादुई आकडा दाखवत उमेदवारीचा दावा केला तर राज्यभरात अनेक मतदारसंघात शिवसेनेचे संख्याबळ देखील जास्त आहे तिथे आम्ही दावा करू असा इशारा शिवसेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी दिला आहे. तसेच त्यांनी विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीवर निशाणा साधत वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. नवघरे यांनी हिंगोली-परभणी विधान परिषदेत राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्त असल्याचे सांगत विधान परिषदेवर दावा केला होता.

यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जालना जिल्ह्यातून 10 हजार शिवभक्त जाणार

यंदा होऊ घातलेल्या रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला जालना जिल्ह्यातून जवळपास 10 हजार पेक्षा अधिक शिवभक्त जाणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली, मागच्या पंधरा दिवसापासून या संदर्भात नियोजन सुरू होतं. मूळ वाटी आणि बेशरमाचं फुल दाखवत शिवराज्याभिषेक सोहळ्याच निमंत्रण संभाजी भिडे यांना देण्यात आलं शिवाय संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल तर यानंतर दिसेल तिथे त्याला थेट चोप देऊ असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Devendra fadnavis : कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा

राज्यातील कांदा व साखरप्रश्नी दिल्लीत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहांच्या उपस्थित सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक पार पडली. यावेळी कांदा, साखर प्रश्नाबाबत त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसात त्याबाबत केंद्र सरकारकडून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले. त्यासोबतच व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी व्हावा ही मागणी केली असल्याचे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Vidhan parishd Election : निवडणुकीसाठी 16 उमेदवारांनी खरेदी केले 40 अर्ज

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक १८ जूनला होत आहे. त्यासाठी 16 उमेदवारांनी 40 अर्ज खरेदी केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा तिसरा दिवस आहे. मात्र अद्याप एकही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Gujarat : गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय जहाजातून 1150 कोटींचे कोकेन जप्त

गुजरातमध्ये ड्रग्जविरोधी कारवाईत मोठे यश आले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने मुंद्रा किनाऱ्याजवळ संयुक्त कारवाई केली. यामध्ये एका कंटेनर जहाजातून अंदाजे 1150 कोटी रुपये किमतीचे 115 किलो कोकेन जप्त केले आहे.

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीला समोरे जाताना काँग्रेसमध्ये एकसंघपणा दिसेना; हर्षवर्धन सपकाळ संतापले

विदर्भात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चार जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ काँग्रेसकडे नाही; पण एकसंधपणे ही निवडणूक लढून भाजपला संघर्षाचा संदेस देण्याची मानसिकताही काँग्रेस नेत्यांमध्ये दिसत नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे सहा दिवस शिल्लक असताना उमेदवार ठरविण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये ताळमेळ दिसत नाही. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे विदर्भातील असतानाही स्थानिक नेत्यांवर 'कमांड' मिळविण्यात कमी पडत असून, ते नेत्यांच्या अशा भूमिकेमुळे हतबल झाल्याचे चित्र आहे.

Raigad MLC Election : विधान परिषदेसाठी मंत्री भरत गोगावले आक्रमक

विधान परिषदेची निवडणूक जाहिर झाली असून, महायुतीकडून विकास गोगावले यांना उमेदवारी मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे शिवसेना लोक प्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या विषयी महाडमध्ये बैठक घेत विकास गोगावले यांना उमेदवारी मिळाली नाही, तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी अगर पक्ष वाढीसाठी निर्णय घेतला असेल, पण उमेदवारी देणे हे नेत्यांच्या हातात आहे. मुख्य नेता एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला आणि पदाधिकाऱ्यांना मान्य करवा लागेल, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.

ShivsenaUBT : ​पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळमध्ये ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणारी दरवाढ आणि त्यामुळे वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. काँग्रेस राजवटीत 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार आज सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहे, असा घणाघात माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. यावेळी शिवसैनिकांनी सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

Nashik Update : अवैधरित्या कत्तलखान्यावर राहणार ड्रोनची नजर, मलेगाव पोलिसांचा मोठा निर्णय

नाशिकच्या मालेगावमध्ये उद्या साजरी होत असल्याच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून, महापालिकेने ठरवून दिलेल्या कत्तलखान्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी होणाऱ्या कत्तलींवर नजर ठेवण्यासाठी मालेगाव पोलिस ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवणार आहे. मालेगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहून ड्रोन उडवण्यात येऊन संपूर्ण शहरावर त्याची नजर राहणार आहे. ठरवून दिलेल्या कत्तलखान्या व्यक्तिरिक्त कुठे कत्तली होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Pankaja Munde : गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी आपापल्यागावातच साजरी करा; मंत्री पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

दरवर्षी प्रमाणे 3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असते, सबंध राज्यभरातून परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थक मोठ्या संख्येने येतात. मात्र यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंडे समर्थक व सर्व कार्यकर्त्यांना आपापल्या गावातच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन केलं आहे.

Idris Naikwadi On Nitesh Rane : मंत्री नीतेश राणे एंटरटेनमेंटचे साधन; आमदार इदरीस नायकवडी यांचा घणाघात

भाजप मंत्री नीतेश राणेंना आता कोणी सिरीयस घेत नाही, एंटरटेनमेंट साधन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मंत्री राणेंनी आम्हाला धार्मिक तत्व कसे पाळावे, याचे मार्गदर्शन करण्याची गरज नाही, समाजात दुफळी निर्माण करून हिरो म्हणून पुढे येण्यासाठी त्यांचा सातत्याने बालिशपणाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका देखील अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार इदरीस नायकवडी यांनी केली.

TDP decision : सर्व निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण

आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाने आगामी सर्व निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. अशी घोषणा करणारा टीडीपी हा देशातील पहिला पक्ष ठरला आहे.

Gas Cylinder : सिलिंडरमध्ये गॅसऐवजी पाणी

पुण्यातील जनता वसाहतीतील ग्राहकांची फसवणूक झाल्याचा दावा केला जात आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरमध्ये गॅसऐवजी १० लिटर पाणी असलेला सिलिंडर दिल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे.

Nitin Gadkari Birthday :  नितीन गडकरी यांची वस्त्रतुला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त नागपुरात गडकरींची वस्त्रतुला करण्यात आली. यावेली मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.

NEET Paper Leak : आणखी महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

नीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यातील आणखी महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर आहे. हे महिला प्राध्यापक रसायनशास्त्राची प्राध्यापक असल्याचे सांगितले जात आहे. एनटीएच्या विषयतज्ज्ञांच्या समितीतही या प्राध्यापिकेचा समावेश असल्याचे समजते.

सुनेत्रा पवार घेणार अमित शाहांची भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागेच कारण दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत ही भेट होणार आहे. राज्याचे शिष्टमंडळ गृहमंत्र्याने भेटेल यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील देखील असणार आहेत.

एसआयआर बेकायदेशीर ठरवता येणार नाही - सुप्रीम कोर्ट

एसआयआर प्रक्रिया थांबवावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने एसआयआर बेकयादेश ठरवता येणार नाही असे म्हणत एसआयआरसाठी हिरवा कंदील दिला. तसेच मतदारयाद्यांचा फेरआढावा घेण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार असल्याचे म्हटले आहे.

दिलीप वळसे पाटलांकडून दुर्गम भागातील समस्यांची पाहणी

आमदार दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात असलेल्या दुर्गम भागातील पाणी, वीज आणि विकासाच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. स्थानिकांचे प्रश्न थेट त्या परिसरात जाऊन व लोकसंवादातून समजून घेत कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

Udayanraje Bhosale : आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली सांत्वनपर भेट

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळून आठ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांत्वनपर भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही. मात्र मुलगा आणि भाऊ या नात्याने मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.”

Beed Update : परळीत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोरांकडून कोयत्याने वार

बीडच्या परळी शहरात एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शिवाजी शिंदे वरिष्ठ कार्यकर्त्यावर शहराच्या मोंढा परिसरात एका हॉटेलमध्ये हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. शिवाजी शिंदे हे पत्नीसोबत असताना काही हल्लेखोरांनी हा हल्ला चढवला. या हल्ल्यात शिवाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई इथं हलवण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाचा परळी संभाजीनगर पोलिस तपास करत आहेत.

नितीन गडकरी गडकरींचे नाशिकरांना 220 कोटींचे गिफ्ट, रस्त्या होणार आठ पदरी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांना कुंभमेळ्याचे गिफ्ट दिले आहे. शहरातील नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे विस्तारीकरण होणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. महामार्गाचे सहा पदरीकरण करण्यात येणार आहे. दुतर्फा सर्विस रोड करण्यात येईल. त्यातून द्वारका ते दत्त मंदिर हा आठ पदरी रस्ता होईल यासाठी २२१.५२ कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

भारतातील प्रसिद्ध कंपनी Byju’s चे संस्थापक आणि उद्योगपती बायजू रवींद्रन यांना सिंगापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमधील एका न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून ७०,५०० डॉलरचा दंडही ठोठावला आहे.

नाशिकमधील कश्यपी धरणात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

नाशिकच्या हरसूल रस्त्यावरील कश्यपी धरणात ठोंबरे कुटुंबातील चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नगर येथील सचिन कैलास ठोंबरे, पत्नी आणि दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून धरणात जात असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याला संगीता घाडगे यांनी धाव घेत वाचवले.

अमेरिका-इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटणार

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. शस्त्रसंधी असतानाही अमेरिकेनं इराणवर हल्ले केले आहेत. दक्षिण इराणमधील क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रावर आणि समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या जहाजांना अमेरिकेनं लक्ष्य केलं आहे. दुसरीकडे इंधनांच्या किंमतीमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ झाल्याने सर्वसामान्य चिंतेत आहेत.

डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला जमीन देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर आता त्यावरून राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील नेते हा निर्णय आपल्या पाठपुराव्यामुळे झाल्याचा दावा करत असून डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com