

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाची आज मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून झाल्या असल्याने पुराव्यांचे कामही पूर्ण झाले आहे.आरोपीच्या जबाबासाठी न्यायालयाने १८ जुलै तारीख निश्चित केली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यंदाही नाफेड एनसीसीएफ मार्फत दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवत खरेदी सुरू असून या खरेदी बाबत माहिती घेण्यासाठी व सूचना देण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिव आणि नाफेड एनसीसीएफचे जिल्ह्याचे मॅनेजर यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी थेट बाजार समितीत शासकीय खरेदी बाबत माहिती शेतकऱ्यांना समजावी यासाठी मोठा फलक लावावा अशा सूचना केल्या.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणाऱ्या 444 उमेदवारांच्या नोकर भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. या भरतीत भ्रष्टाचाराच्या आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यानंतर ता ही स्थगिती मिळाल्याने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल पवार यांच्यावर दिवसाढवळ्या नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुरुवारी नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हा हल्ला केला. या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून, प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठ्या अनर्थातून बचावले.
भिवंडी TET पेपर लीक प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणात तीन नवीन आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्याला जम्मूमधून अटक करण्यात आली. तर या रॅकेटशी संबंधित असलेले सोनू सिंह आणि मिथुन सिंह या दोघांना बिहारमधील पटन्यातून ताब्यात घेण्यात आले. अटक केलेले दोन्ही आरोपी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता यांचे निकटचे साथीदार आहेत.
राज्यात महिलांच्या नावावर शेतजमीन असण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे राज्यात कागदोपत्री महिलांचा शेतकरी म्हणून ओळख मिळण्याचेही प्रमाण कमी आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता सरकारने सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यावेळच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 ला मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता राज्यातील महिला शेतकऱ्यांना कागदोपत्री शेतकरी महिला अशी ओळख मिळणार आहे.
Mumbai News : राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडले आहे. हे विधेयक मांडल्यानंतर दत्ता भरणे यांनी विधेयकामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली. राज्यातील महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारं हे विधेयक आहे. या विधेयकामुळे महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. तसं करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे, असे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले. या विधेयकावर चर्चा करताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भरणे यांना चांगलाच टोला लगावला. मामा विधेयक मांडताना अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी कृषी मंत्र्यांना लगावला. त्यावेळी सभागृहात एकच खसखस पिकली.
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. तसेच मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली.
मॅनहोलवर जाळी बसविण्याचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. हे काम करताना कंत्राटदाराकडून सुरक्षितता पाळण्यात आली नाही. ही अतिशय गंभीर घटना आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर राजकारणात तापले आहे. आमदार आदित्य ठाकरेंनी त्यावरून टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईकरांची सेवा करण्यासाठी भाजपकडे वेळ नाही. महापौरांना मुंबईकरांची काळजी नाही. मुंबईच्या महापौरांना फक्त बांग्लादेशची काळजी आहे. फेकनाथ मिंधे जबाबदारीपासून पळतात. मिधेंचे ऑपरेशन फडणवीस सुरू आहे.
विधान परिषदेत मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासावर सखोल चर्चा झाली. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि उपक्रमांची माहिती दिली. उदय सामंत यांनी सांगितले की, मराठीसाठी एआय (AI) आधारित शब्दकोश तयार करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भाषेच्या विकासासाठी केला जाणार आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मराठी भाषा अधिकारी आणि गावनिहाय भाषा अधिकारी नियुक्त करण्याची योजना, जेएनयूमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्ययन केंद्राची स्थापना, तसेच मराठी साहित्य आणि भाषेच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर अस्लम शेख नावाचा व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडला. साधारण 3 तासांनंतर मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले. परंतु दुर्देवाने सदर व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी विहीर, शेतघर, गोठा आणि इतर शेतीकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजावर आता स्वामित्व आकारले जाणार नाही. तसेच ट्रॅक्टर आणि बैलगाडीवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.
जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक गौण खनिज उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत विधान परिषदेत चर्चा झाली. आमदार सत्यजीत तांबे यांनी ग्रामीण आणि शहरी रुग्णालयांतील सुविधांबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. तसेच आयुष्मान भारत व जनसेवा योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि अपेक्षित सुधारणांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
खैरानी रोड परिसरातील धक्कादायक घटना, 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये माणूस पडला. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरु.
बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या मराठी पुस्तकातील लोकनृत्यांच्या समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पुस्तकात पाच लोकनृत्यांचा उल्लेख असला तरी त्यापैकी फक्त एकच महाराष्ट्रातील आहे. राज्यातील समृद्ध लोककला परंपरा असताना इतर राज्यांतील नृत्यांना अधिक स्थान दिल्याने शिक्षणतज्ज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. बिश्नोई गँग धमक्या देत असून आमदारांना पुरेशी सुरक्षा नसल्याचे पटोले यांनी विधानसभेत सांगितले.
महायुतीमधील 13 घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला 13 ही पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. दरम्यान, या बैठकीत एकसंघपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा करत दिलासा दिला असून, त्याचबरोबर शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीही सुरू ठेवली आहे. त्यापैकी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ ही योजना पुणे जिल्ह्यात यशस्वी ठरत असून, आतापर्यंत ५ हजार ६५४ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज उपलब्ध होत असून सिंचन अधिक सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर झाले आहे.
जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील १८८, बारामती ६३५, भोर २३, दौंड ६५०, हवेली १८२, इंदापूर ७३८, जुन्नर ४२९, खेड २०१, मावळ १०, मुळशी २२, पुरंदर ५११, शिरूर १,९८४ आणि वेल्हा ११ अशा एकूण ५ हजार ६५४ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ मिळाला आहे.
'यल्ला यल्ला रेस्टॉरंट' आणि 'आईच्या गावात' या दोन छत्रपती संभाजीनगरमधील मोठ्या हॉटेल्सवर एफडीएच्या पथकाने छापे टाकले.हाॅटेलच्या किचनमध्ये बुरशी आलेले अन्नपदार्थ, रासायनिक रंगांचा बेसुमार वापर आणि ग्राहकांची उघड फसवणूक होत असल्याचे या छाप्यात उघड झाले. या गंभीर त्रुटींमुळे दोन्ही हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबीत करण्यात आले आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण, सुरक्षितता आणि मुलभूत सुविधांची प्रभावी अमलबजावणी ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, वारकऱ्यांच्या सेवेमध्ये हलगर्जीपणा करु नका, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिल्या.
श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री क्षेत्र आळंदी येथन संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक स्वरुपात नियोजन पूर्ण केले असून, त्याकामांची कामांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पाहणी पालखी मार्गावर जावून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळू लागले आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाकरिता गणना अर्ज छपाई त्याचे जिल्ह्यात वितरण करण्यात येत आहे, याबाबत राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना सूचना देण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित राजकीय पक्षांसोबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, यांच्यासह राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, बहूजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नॅशनल पिपल्स पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. गेल्या १० वर्षातील खडकवासला धरणात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनाला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील एक हजार 216 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.